Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितमन का ना हो तो बहुत अच्छा...

मन का ना हो तो बहुत अच्छा…

मोहिनी घारपुरे देशमुख

स्वतःच्या अंतरंगात जे उमलून येतं ते चांदणं स्वतःवर सुखाची आल्हाददायक पखरण सदैव करतं. माणसाला सुखाची आस असते म्हणून तो जगभर धावतो. पण त्याला हे कळत नाही की, ज्या सुखाची तो आस धरून जगभर धावतोय, ते सुख खरंतर त्याला त्याच्या अंतर्मनात गवसतं.

भौतिक सुखांची आस धरणं आणि त्यांच्या पूर्ततेसाठी आपण नानाविध मार्गाने पैसा कमावणं ही तर जीवन जगण्याची ‘गरज’ आहे, पण या सगळ्या भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन पहाल तरीसुद्धा माणूस सुखी होऊच शकतो; कारण सुख हे मनातून उमलून येतं. चार भौतिक सुखाच्या गोष्टी जवळ नाहीत म्हणून रडत बसणारी माणसं मी पाहिली आहेत, पण याउलट भौतिक सुखाच्या गोष्टी नसूनही जीवनाचा रसरसून आनंद घेणारी माणसंसुद्धा मी भवती पाहिली आहेत.

या माणसांमध्ये नेमकं काय असतं तर, त्यांची सुंदर अंतःप्रेरणा! मग त्यानेच ते आपला आनंद भौतिक सुखाच्या पल्याड जाऊन शोधू शकतात.

दक्षिणेकडील एक आजी गेली कित्तीतरी वर्षं इडल्या विकते. एक रुपयाला एक इडली… तिला आता लोक सांगतात की – अम्मा, आता भाव वाढव, पण ती नकार देते. जनसेवा हाच तिचा धर्म.

या जगात अशी माणसं आहेत म्हणून हे जग सुंदर आहे.

जीवनाची अनेक रूपं… माणसाच्या जगण्याची, त्याला अनुसरून रूपं. आपण काय करतो… आपल्याला ही रूपं ओळखता येत नाहीत आणि म्हणूनच प्रत्येक माणसाचे अंतरंगही आपल्याला समजत नाहीत. ज्यांच्याकडे अपार भौतिक सुखं, तीच माणसं आपल्याला सद्गुणी वाटतात आणि ज्यांच्याकडे काहीच नाही, ती माणसं आपल्याला दुर्गुणी वाटतात. आपल्या मनावर, मेंदूवर कोरलेली ही समीकरणं आहेत. पण यात एक मधला गट आहेच. ज्यात तुम्हाला कष्टकरी, सेवाभावी, आत्मसुखी, दैववादी अशी असंख्य माणसं सापडतील. या माणसांकडे आणि त्यांच्यातील सूक्ष्म फरकांकडे आपलं लक्षं जात नाही. आपण सरसकट सगळ्या श्रीमंत उच्चभ्रूंना ‘फार छान माणसं’ या श्रेणीत टाकतो आणि बहुतांश निष्कलंक, निर्धन माणसांना अनेकदा आळशी, निरुपयोगी आणि भुईला भार, गुन्हेगार वगैरे श्रेणीत टाकून देतो.

हे सरसकटीकरण आपल्या ‘स्वतंत्र’ विचाराच्या आणि ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ जपणाऱ्या भूमी करता अयोग्य विचार आहे, असे वाटते.

याऐवजी माणसांना संधी मिळावी… प्रत्येक माणसाला समान संधी आणि त्याद्वारे त्यांचे जीवन उमलून यावे आणि अशी फुललेली जीवनं पुन्हा आपल्या देशाच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेण्यास सज्ज व्हावीत.

पण, बरेचदा या निष्कांचन लोकांकडे किंवा एकंदरीतच अपयशी माणसांकडे लोक जसं बघतात, त्यांना जसं वागवतात, तेव्हा असं वाटतं की, खरी गरज तर या माणसांना आहे. सगळं चांगलं असताना यश मिळवणं आणि सगळी परिस्थिती विपरीत असताना यश मिळवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

सगळं विपरीत असतानासुद्धा माणसाने नाउमेद न होता मार्गक्रमण करत रहाणे, इथे खरी माणसाची कसोटी लागते. महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील पं. श्री. हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी आहेत –

‘मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो बहुत अच्छा,
क्योंकि फिर आगे जो होता है, वो ईश्वर की मर्जी से होता है!’

खुद्द अमिताभजी कित्तीतरी वेळा या ओळी ऐकवतात आणि त्यांचा गर्भितार्थ सांगतात की, एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली तर उत्तम, पण नाही झाली तर आणखी उत्तम, कारण मग ती गोष्ट जशी घडते ती ईश्वराच्या मनाने घडते’, यातच सार आलं!

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. निखळ सत्य. सहजी न पचणारं. इतरांनी हे करावं असं वाटणारं. तरीही पूर्ण सत्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!