नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…
नव्याने नाटकात काम करायला लागले होते. एकतर, दोन नाटकं करत होते… एक ‘पर्याय’ आणि दुसरं होतं ‘सविता दामोदर परांजपे’. दोन्ही नाटकं तुफान चालत होती. त्यावेळी 17 वर्षांचं वय माझं… रस्त्यात लोक ओळखायचे. खूप मस्त वाटायचं. त्यातच ‘शोध’ नावाची सीरियल केली. अजूनच ओळख वाढत गेली.
नाटकाच्या प्रयोगाच्या अगोदर किमान एक तास लवकर पोहोचायचं, ही मी स्वत:ला लावून ठेवलेली सवय होती. एकदा गिरगावातून दादरला आले. शिवाजी मंदिरला प्रयोग होता. ट्रेन तीन नंबर प्लॅटफॉर्मला आलेली. जिना चढणं आणि उतरणं याचा खूप कंटाळा आला होता. मग शॉर्टकट मारला. उजवीकडे अन् डावीकडे असं दोन्हीकडे बघितलं, ट्रेन दूर दूरपर्यंत दिसत नव्हती. सरळ प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर उडी मारील. दुसऱ्या ट्रॅकवरून प्लॅटफॉर्मपाशी आले. एक माणूस माझ्याकडे बघत होता. मी हात वर केला… त्यानेही हात पुढे केला. मला वर खेचलं आणि घात झाला. त्याने माझा हात धरून सरळ प्लॅटफॉर्मवरच्या रेल्वे ऑफिसमध्ये नेलं. तो माणूस म्हणजे टीसी होता. मी ट्रॅक क्रॉस केला होता आणि तो गुन्हा आहे. बरं, ते मला माहीत नव्हतं नाहीतर, मी कधीही कसलेही नियम मोडत नाही.
हेही वाचा – Appeal : टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी…
माझी तारांबळ उडाली. कारण मला शिवाजी मंदिरला पोहोचायचं होतं आणि ते लोक मला सोडायला तयार नव्हते. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी खूप विनवण्या केल्या… हातापाया पडले… खूप रडले… कोणालाही दया आली नाही. त्यांनी माझं बोलणं पडताळून घेतलं आणि मग 10-15 मिनिटांनंतर दंड घेतला आणि ‘पुन्हा ट्रॅक क्रॉस करायचा नाही, नाहीतर सरळ तुरुंगात टाकू,’ असा दम भरला. त्यानंतर मी कानाला खडा लावला. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस… आजतागायत मी ट्रॅक क्रॉस केलेला नाही.
मित्र-मैत्रिणींनो, हात जोडून विनंती करते. जर कोणाला ट्रॅक क्रॉस करायची सवय असेल, आवड असेल तर थांबा. प्लिज, टॅक क्रॉस करू नका. आता तर प्लॅटफॉर्मवर लिफ्ट, एस्कलेटर ही सुविधाही आहे. त्यामुळे स्वत:च्या जिवाची काळजी घ्या. तुमच्या घरी तुमची माणसं वाट पाहतायत… ही सुद्धा एक प्रकारची आत्महत्याच आहे आणि आपल्याला आत्महत्यामुक्त समाज (Suicide free society) बनवायचा आहे.
हेही वाचा – Suicide Free society… पुढे येण्याची सर्वांचीच जबाबदारी
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://chat.whatsapp.com/IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.