जयश्री महाबळ – ताम्हनकर
8 मार्च, जागतिक महिला दिन. महिलांसाठी विशेष दिवस. नुकताच तो सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या विशेष दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले गेले. तसे हे दरवर्षीचेच आहे. महिलांचा सन्मान, प्रेरणा, नेतृत्व – असे सकारात्मक शब्द वर्तमानपत्रात प्रकर्षाने झळकत असतात. त्याचबरोबर हिंसाचार, अत्याचार आणि महिलांची सुरक्षा असेही शब्द तितक्याच ताकदीने पुढे सरसावत असतात.
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे कर्तृत्व आणि योगदानाला सलाम केला जातो, पण समाजातील काही विकृत आणि पाशवी वृत्तीमुळे महिलांची अवहेलना तसेच छळ आजही थांबलेला नाही. अशा परिस्थितीत दोन प्रश्न मनात नक्कीच डोकावतात. ते म्हणजे – महिलांचे सबलीकरण खरंच झाले आहे का? आणि महिला खरंच सुरक्षित आहेत का?
महिलांनी शिक्षण, व्यवसाय, कला, क्रीडा, अशा अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे आणि उमटवत आहेत. म्हणतात न “एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात”. नाण्याची एक बाजू यश, सन्मान, नेतृत्व, प्रेरणा दाखवत आहे. पण दुसरी बाजू मात्र हिंसा, अत्याचार, अन्याय असे क्लेशदायी सत्य जगासमोर आणते आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी कायदे आहेत. त्यामध्ये परिस्थितीनुसार बदल होत आहेत. पण हे पुरेसे आहेत का?
उत्तर आहे “नाही”. खरी गरज आहे मानसिकता बदलण्याची. फक्त समाजाची नाही तर, महिलांची. महिलाना अबला नाही तर, सबला करण्याचा वसा घ्यायला हवा महिलांनीच. त्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे.
आकाशाला गवसणी घालणं जसे शक्य आहे, तसेच हिंसाचार आणि अत्याचाराला सामोरं जाण्याची ताकद वाढवणे अशक्य नक्कीच नाही.
काय असतील हे बदल?
- आत्मविश्वास : स्वतःवर विश्वास ठेवा. ‘मी करून दाखवेन’ या विचारावर ठाम रहा. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ नक्कीच मिळेल.
- शैक्षणिक आणि आर्थिक साक्षरता : शिक्षण हे महिलांच्या सबलीकरणाचा पाया आहे आणि हा पाया भक्कम असेल तर, त्यावर उभी राहणारी इमारतपण मजबूत राहील. शिक्षणामुळे महिलांना स्वतःचे हक्क आणि जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे समजतील. शिक्षणाबरोबर आर्थिक ताकदही महत्त्वाची. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणेही खूप गरजेचे आहे. त्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करून स्वतःच्या पैशांचे नियोजन करणे अतिशय आवश्यक आहे.
- स्वसंरक्षण कौशल्ये : आजच्या काळात स्वसंरक्षण खूप महत्त्वाचे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःला सक्षम करण्याचा प्रयत्न वाढवण्याची गरज आहे, हे नक्की.
- मानसिक आणि शारीरिक आरोग्य : आजची स्त्री घर आणि ऑफिस अशी दुहेरी भूमिका बजावत आहे. त्यामुळे तिच्यावर जास्त जबाबदारी आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच ती मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. योग, ध्यानधारणा या सवयी अंगिकारून मनोबल वाढवा आणि शारीरिक आरोग्यासाठी स्वतःकडे लक्ष द्या. कामाच्या धावपळीत स्वतःला विसरू नका. स्वतःवर प्रेम करायला शिका.
- नकार देण्याची हिंमत : निर्णय घेण्याची क्षमता वाढवा आणि गरज भासल्यास नकार देण्याचीही हिंमत बाळगा.
महिला सबलीकरणाची स्वतःपासूनच सुरुवात करा. स्वतःमध्ये सक्षम होण्याची जिद्द निर्माण करण्यात यशस्वी झालात तर समाजालाही सकारात्मक दिशा दाखवू शकाल हे नक्की!