दिप्ती चौधरी
मुंबईच्या रस्त्यांवरचे भटके मांजर म्हणून सुरू झालेला आमचा प्रवास आता बंगलोर आणि ह्यूस्टन मार्गे ऑस्टिनला येऊन स्थिरावला आहे. आम्हाला आमचे जुने जीवन आठवते, तेव्हा भारत आणि अमेरिका या दोन देशांत प्राण्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप खूप फरक जाणवतो. अमेरिकेत प्राण्यांबरोबरचे सह-अस्तित्व खुल्या दिलाने स्वीकारले आहे. आम्ही खिडकीत बसलो असताना बाहेरून जाणारे बहुतेक जण आम्हाला टाटा करूनच पुढे जातात. आमच्याकडे कौतुकाने आणि प्रेमाने बघतात, अशी नजर आम्हाला आमच्या गत आयुष्यात फार अभावानेच बघायला मिळाली होती.
इथे बहुतेक जणांनी प्राणी पाळले आहेत आणि ते सगळे कुटुंबाचाच प्रिय भाग असतात. भावनिक आधार देणारे पाळीव प्राणी किंवा सर्व्हिस डॉग म्हणून सुद्धा प्राणी वापरले जातात. म्हणजेच, प्राण्यांचं अस्तित्व हे नुसतं आनंदासाठी नसून खूप खूप उपयोगाचेही आहे, असे इथे मानले जाते.
विद्यापीठाच्या वसतिगृहातही असे पाळीव प्राणी विद्यार्थ्यांबरोबर राहू शकतात. बहुतेक दुकानात आणि इतर सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला तुमचे प्राणी आत घेऊन जाता येतात. विमानतळावरही प्राण्यांसाठी वेगळे खास शौचालय असते. बहुतांश विमानातून तुम्हाला छोटे प्राणी तुमच्याबरोबर घेऊन जाता येतात. Petco आणि PetSmart यासारखी प्राण्यांच्या हरेक गोष्टी ठेवणारी अगडबंब दुकानेही इथे आहेत. या दुकानात फक्त कुत्रा आणि मांजरच नाही तर मासे, पक्षी, सरडा, उंदीर आणि साप असेही प्राणी मिळतात. शिवाय, त्यांच्या खाण्यापासून ते खेळण्यापर्यंत, राहण्यापासून ते आंघोळीपर्यंत लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे उपलब्ध असतात.
हेही वाचा – सुखरूप पोहोचा, तुमची बाळे तुमची वाट बघतायत…
प्राण्यांचे दवाखाने आणि हॉस्पिटलच नव्हे तर, इथे प्राण्यांसाठी इमर्जन्सी रूमही आहेत. मला जेव्हा तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती आणि माझ्या नेहमीच्या दवाखान्यात मला घेऊन जाणे शक्य नव्हते, तेव्हा माझ्या नेहमीच्या दवाखान्यातील नर्सनेच माझ्यासाठी इमर्जन्सी रूम सुचवली आणि आणि मला माझी आई तिथे घेऊन गेली का? हे नंतर विचारले. जेव्हा तिला कळले की मला हवी असलेली वैद्यकीय मदत मला तातडीने मिळाली, तेव्हा तिने माझ्या आईचे आभारही मानले. इथे एकंदरच प्राण्यांना छोट्या मुलांसारखे अतिशय प्रेमाने वागवले जाते.
आमच्या घराशेजारी रुडी नावाचा एक काळा लॅब्रेडोर कुत्रा आहे. रूडी त्याच्या नव्वदीतल्या आजी-आजोबांबरोबर राहतो. रुडीची 92 वर्षांची आजी स्वतःही नीटनेटकी तयार होऊन आणि रुडीला सुद्धा मिळत्या-जुळत्या रंगाचं टाय किंवा स्कार्फ घालून रोज फिरायला घेऊन जाते. एक दिवस आई त्यांना काहीतरी सांगायला गेली असताना रुडी दरवाजातून बाहेर पळाला. घरात फक्त काठी टेकत चालणारे आजोबा होते. आता रुडी घरात परत कसा जाईल, याची चिंता आईला पडली. “मी मदत करू का?” असे विचारताच आजोबा जोरात हसले म्हणाले, “अरे, त्याला थोडा वेळ बाहेर खेळायचे आहे, असे दिसते, थांब…” आणि ते स्वतःच बाहेर आले अंगणात थोडा वेळ त्याच्याशी धावाधावी केल्यासारखे हलकेच खेळले आणि “आता झाले बाळा, चल घरात,” असं म्हणून रुडीला प्रेमाने थोपटत आत घेऊन गेले. आमच्या आईने आमचे सोडाच आमच्या दादा आणि दिदीचे सुद्धा इतके ऐकले नसेल!
कधी कधी आवर्जून आजारी किंवा लुळा-पांगळा प्राणी सुद्धा काही जण पाळायला घेऊन जातात. विद्यापीठात विद्यार्थी दशेतच खूप विद्यार्थी आपल्याबरोबर एखादा छोटा पाळीव प्राणी आणतात किंवा पाळतात आणि त्याची पूर्ण जबाबदारी आयुष्यभरासाठी उचलतात. आमच्या दिदीने देखील तिच्या वसतिगृहातल्या तीन मैत्रिणींबरोबर एक अनाथ बोका दत्तक घेतला. वसतिगृहातील तीन वर्षांच्या काळात या चौघी मैत्रिणींनी त्याची पूर्ण जबाबदारी स्वकमाईतून उचलली. सुट्टीमध्ये देखील तिथे कामासाठी मागे राहिलेल्या, इतर विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी येऊन त्याची काळजी घेत असत. इथे प्राणी पाळणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे, हे इतके सहज आहे की, त्यामध्ये त्या नवख्या विद्यार्थ्याला काहीच वेगळे वाटायचे नाही.
अगदीच कोणी नसेल तर आमची दिदी घरून खास त्याची काळजी घेण्यासाठी रोज तिच्या वसतिगृहाच्या खोलीत जायची. विद्यार्थी दशा संपल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीने त्याला आपल्यासोबत कायमचे घर देण्यासाठी नेले. एका अनाथ जीवाला त्याच्या हक्काचे घर आणि प्रेमाचे माणूस मिळाले.
हेही वाचा – आगाऊपणाबद्दल चांगलीच अद्दल घडली…
तर मंडळी, आम्ही आता या नवीन देशात आणि नवीन वातावरणात रुळलो आहोत. इथे प्राण्यांचे लाड करतानाच त्यांचे मालक त्यांची जबाबदारीही उचलतात. जसे की कुत्रा फिरायला घेऊन गेल्यानंतर त्यांनी केलेली घाण इथे आवर्जून कटाक्षाने उचललीच जाते. सगळे कुत्रे पट्टा लावूनच फिरायला बाहेर काढले जातात आणि एखादा व्रात्य कुत्रा असेल तर त्याला शिक्षक नेमून शिस्त लावली जाते. आपल्या लाडक्या प्राण्याचा इतर कोणाला त्रास होणार नाही, हे आवर्जून बघितले जाते.
मित्रांनो माझी आत्मकथा तुम्ही वाचलीत याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. एका भटक्या बेवारस प्राण्याला सुद्धा भावना असतात, दुःख होते, आनंद होतो, वेदना होतात हेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते.
त्यामुळे यापुढे तुम्हाला जर कुठला भटका प्राणी दिसला तर, त्यासाठी काही नाही केले तरी चालेल पण कमीत कमी त्याला इजा होणार नाही, इतके जरी तुम्ही केलेत, कोणी काळजी घेत असेल त्याला ती घेऊ दिलीत, तर मी तुमचा खूप आभारी राहीन.
तुमचे लाडके,
पिदू आणि दनू
समाप्त
(पिदू या बोक्याची आत्मकथा)
diptichaudhari12@gmail.com