मनीषा गोगटे
दसरा झाल्यावर वेध लागतात ते, दिवाळीचे. हळूहळू घराघरातून फराळाचा घमघमाट यायला सुरुवात होते. या दिवाळी फराळ तयारीतील पहिला पदार्थ म्हणजे अनारसा! कारण त्याला करण्यास जास्त दिवस लागतात.
साहित्य
- जाडे तांदूळ – अर्धा किलो (ज्याचा भात मोकळा होतो, असा कोणताही जुना तांदूळ)
- गूळ – तांदूळ पिठीच्या निम्म्या प्रमाणात
- पातळ साजूक तूप – साधारणपणे दीड टेबलस्पून
- खसखस – साधारणपणे दीड टेबलस्पून
- केळे किंवा दूध – अगदी किंचित
- तेल – अनारसा तळण्यासाठी
हेही वाचा – Recipe : सात्विक पंचामृत केक
कृती
- तांदूळ स्वच्छ धुवून तीन दिवसांसाठी भरपूर पाण्यात भिजवून ठेवायचा.
- पाणी रोज बदलून नवीन पाण्यात तांदूळ भिजवावेत. यामुळे तांदळाला आंबूस वास येत नाही.
- चौथ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीत किंवा रोवळीत उपसून ठेवा. तांदळातले पाणी पूर्णपणे निथळून जाणे गरजेचे आहे.
- पाणी पूर्णपणे निथळले की, मग दीड ते दोन तास सुती कापडावर हे तांदूळ वाळण्यासाठी पसरवून ठेवा.
- दीड ते दोन तासांनी हे तांदूळ मिक्सरमधून फिरवून त्याची पिठी तयार करून घ्यावी. वाटताना तांदळात जराही पाणी घालू नये.
- आता ही पिठी बारीक चाळणीने चाळून घ्यावी.
- या चाळून घेतलेल्या पिठीतील अर्धी वाटी पिठी बाजूला काढून ठेवा.
- उरलेली पिठी वाटीने मोजून परातीत काढून ठेवा.
- आता जितकी पिठी असेल त्याच्या निम्म्या प्रमाणात बारीक केलेला गूळ घ्या. (समजा पिठी तीन वाट्या असेल तर त्याच वाटीने दीड वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यावा.)
- आता पिठी आणि गूळ एकत्र करून चांगले मळून घ्या.
- या भिजवलेल्या पिठात साधारणपणे दीड टेबलस्पून पातळ साजूक तूप घाला. (तूप पातळ हवे, पण गरम नको.)
- आता हे सगळे मिश्रण 3 ते 4 दिवसांसाठी एका हवाबंद डब्यात ठेवून द्या.
- तीन – चार दिवसांनी हे सगळे पिठ फूड प्रोसेसरमधून फिरवून घ्या. (गूळ पिठामध्ये पूर्णपणे विरघळला पाहिजे.)
- आता परत तीन ते चार दिवसांसाठी हे पिठ डब्यात ठेवून द्या.
- तीन चार दिवसांनी अनारसे करायला पिठ तयार आहे.
- अनारसा करताना पिठ कोरडे वाटले तर, अगदी अर्धा चमचा दूध किंवा पेरभर पिकलेले केळं त्यात घालून पिठ मळून घ्या. अनारसा थापण्याएवढे सैल पिठ हवे.
- आता एकीकडे गॅसवर तेल तापायला ठेवा.
- पोळपाटावर खसखस पसरवून घ्या. त्यावर अनारशाच्या पिठाची एक छोटी गोळी ठेवून अनारसा थापून घ्यावा. अनारशाचा आकार छोट्या पुरीएवढा आणि तेवढाच जाड ठेवावा.
- खसखशीची बाजू वर राहील, अशाप्रकारे तापलेल्या तेलात अनारसा सोडावा.
- अनारसा तळताना त्याच्या वरच्या बाजूवर सतत झाऱ्याने गरम तेल हळूहळू टाकावे. याने दोन्ही बाजूंनी अनारसा छान तळून होतो. सोनेरी तांबूस रंग आला म्हणजे अनारसा तळून झाला, असे समजावे
- तळलेला अनारसा एका चाळणीत काढून घ्यावा. चाळणी थोडीशी तिरकी करून ठेवली तर अनारशातले सगळे तेल निथळून जाते.
- अनारसे पूर्ण गार झाले की, हवाबंद डब्यात भरून ठेवा.
पुरवठा संख्या : 4 ते 6 व्यक्तींसाठी
- तयारीस लागणारा वेळ : साधारणपणे 8 ते 10 दिवस
- तळण्यासाठी अंदाजे – 30 मिनिटे
- एकूण वेळ – 10 दिवस, 30 मिनिटे
विशेष आहार माहिती : शाकाहारी
हेही वाचा – Recipe : वेगळ्या चवीचे आंबट-गोड पंचामृत
टीप
- अनारसे करताना पिठ हाताला चिकटत असेल तर, थापताना हाताला थोडी पिठीसाखर लावावी.
- पिठ खूपच पातळ झाले तर, अगदी सुरूवातीला बाजूला काढून ठेवलेली कोरडी पिठी त्यात लागेल तशी मिक्स करावी.
- अनारसा पारंपरिकपणे तुपात तळतात. जर आवडत असेल तर तळण्यासाठी साजूक तूप वापरले तरी चालेल.
- अनारसा अजून जाळीदार हवा असेल तर पिठाच्या गोळीला थोडीशी पिठीसाखर लावून मग ती खसखशीवर थापावी.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


