आराधना जोशी
दिवाळी म्हणजे आनंदोत्सव… गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन सण असे आहेत की, या काळात मनातील उल्हास ओसंडून वाहात असतो. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. चिंता-विवंचनांची जळमटं झाडून टाकून आनंदाचे आकाशदिवे झगमगत ठेवणारा सण. घरासमोर शांतपणे तेवणारी पणती… छानसा आकाशकंदिल… घरात फराळाचा घमघमाट… तर, भल्या पहाटे उटण्याचा अन् सुवासिक तेल, साबणाचा घमघमाट… असे मन प्रसन्न करणारे वातावरण म्हणजे दिवाळी.
पूर्वी रेडिमेड कंदिल आणण्याऐवजी आकाशकंदिल घराघरांत बनवला जायचा. वडिलधाऱ्यांकडून मुलांना आकाशकंदिल तयार करण्याचे धडे दिले जायचे. रंगीत कागद, घरी केलेली खळ यांच्या मदतीने कंदिल तयार केले जात होते. याच्याबरोबरीनेच वाडीतला सार्वजनिक कंदीलही त्याच उत्साहाने तयार केला जायचा. बहुधा ती चांदणीच असायची. त्यासाठी बांबूच्या काठ्या आणल्या जायच्या. दिवाळीच्या चारपाच दिवस आधीच रात्रभर जागून तो कंदिल तयार केला जायचा आणि पहाटे तो आकाशाजवळ पोहोचायचा. अगदी पंधरा – वीस वर्षांपूर्वीपर्यंत हे चित्र पाहायला मिळत होतं. पण हल्ली घरगुती कंदिलांची ही परंपरा मोडीत निघायच्या मार्गावर आहे. आता केवळ रेडिमेड कंदिल दारोदारी उजळताना दिसतात. दारातील तेलाच्या पणत्यांची जागा आता मेणाच्याच नव्हे तर, पाण्याच्या एलईडी पणत्यांनी घेतली आहे. मोठ्या रंगीत दिव्यांच्या तोरणांच्या जागी बारीक एलईडी दिव्यांची तोरणे आली आहेत.
आता तर, आपल्या माणसांत आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा तो ‘व्हर्च्युअली’ साजरा करण्याची सवय नव्या तंत्रज्ञान क्रांतीने आपल्याला लावली आहे. खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण या दोन शब्दांनी आपल्या आनंदाच्या व्याखेची पार उलथापालथ करून टाकली आहे. खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण यात गैर काहीच नाही, ही काळाची गरज आहे. पण त्याच्या नावाखाली हॉटेल, मॉलमध्ये धम्माल करत हुंदडणे, दिखाऊपणासाठी महागड्या आणि ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करणे म्हणजे आनंद अशी वृत्ती दृढ होत चालली आहे. पारंपरिक आनंदाची समीकरणेही त्यामुळे बदलत गेली.
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा लौकिक असलेला दीपोत्सवही आनंदाच्या या बदलत्या व्याख्येतून सुटलेला नाही. पूर्वी दिवाळी म्हटले की, घरातल्या सुगरणींची फराळासाठी किमान महिनाभर आधीपासूनच लगबग सुरू व्हायची. भाजणीचे धान्य आणून, धुवून, वाळवून, मंदाग्नीवर भाजून दळून आणलं की, घरात चकलीच्या भाजणीचा दरवळ दिवाळीची सलामी द्यायचा. शेजारपाजारच्या बायका फराळ करण्यासाठी एकत्र जमायच्या. त्यामुळे या फराळाचं एक वेगळं अप्रूप होतं. आज करिअरच्या चक्रात अडकलेल्या गृहिणींना तेवढा वेळ काढणं अवघड झालं आहे. त्यामुळे असंख्य घरांमध्ये चिवडा, शंकरपाळे, करंजी, रव्याचा तसेच बेसनाचा लाडू यासह अनरसा हा फराळ किलोच्या प्रमाणात घराघरात दाखल होऊ लागला आहे.
आपल्या खाद्यसंस्कृतीत झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे लोकांची ‘रुची’सुद्धा बदललेली आहे. त्यामुळे एकेकाळी लज्जतदार आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या दिवाळी फराळाची चवच बदलली आहे. चॉकलेट चकली, तिखट किंवा बेक्ड करंजी, शुगर फ्री शंकरपाळ्यांबरोबर चक्क पंजाबी चवीच्या फराळाचीही बाजारात विक्री होत आहे.
पूर्वी लहान मुले चिखलमातीचा खेळ करत दिवाळी किल्ले उभारायचे. आम्ही रायगड करतो, तुम्ही सिंहगड करा, अशी स्पर्धा रंगायची. मेथी, मोहरीच्या बिया टाकून किल्ल्यावर हिरवाई फुलवणं, सलाईनच्या बाटल्या वापरून किल्ल्याखालच्या तलावात कारंजी उडवणे यासारख्या कल्पना मुले लढवायची. तेव्हाच्या आनंदाची पर्वणी संपून आता मुलांना ‘रेडिमेड’ आनंद देण्याचा प्रयत्न पालकांकडून होताना दिसतो. गेल्या काही वर्षांपासून रेडिमेड किल्ले बाजारात आले आहेत. घरातल्या बाल्कनीत नाहीतर हॉलमध्ये हे विकतचे किल्ले ठेवले जातात. आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आकाशकंदिल, इको-फ्रेंडली किल्ले करण्याच्या खास कार्यशाळा भरवल्या जातात. अर्थात, या कार्यशाळा फुकट नसतात!
लाल गेरूच्या पार्श्वभूमीवर काढल्या जात असलेल्या ठिपक्यांच्या रांगोळ्यांची जागा डिझायनर चाळणींच्या इन्स्टंट रांगोळ्यांनी घेतली आहे. हाताच्या मुठीने काढल्या जाणाऱ्या लक्ष्मीची पावलं स्टीकर्सच्या स्वरूपात चिटकवली जाऊ लागली. माव्याच्या मिठाईची जागा ड्रायफ्रुटच्या डिझायनर मिठाई आणि इम्पोर्टेड चॉकलेट्सनी घेतली आहे. सोन्याचा वर्ख आणि चांदीची पावडर असलेली आणि चक्क हजार रुपयांच्या घरातील मिठाईसुद्धा बाजारात आणली गेली होती.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
दिवाळी हा एकमेकांना गोड शुभेच्छा देण्याचा सण. प्रत्यक्ष भेट शक्य नसली तर, पूर्वी खास शुभेच्छापत्रं तयार करून ती पोस्टाने आप्तस्वकीय आणि मित्रमंडळींना पाठवली जायची. त्यांची जागा मोबाईलवरच्या एसएमएस आणि शुभेच्छांच्या फॉरवर्डेड ई-मेल्सनी घेतली आहे. आता तर व्हॉटसॲपच्या ग्रुपवर एक शुभेच्छा पेस्ट केली की, सर्व मित्रांना, नातेवाईकांना स्वतंत्र शुभेच्छा पाठविण्याचीही गरज राहिलेली नाही. दिवाळीत नवी साडी, नवा शर्ट, नवा टीव्ही, कार, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल आणि सोने खरेदी केलेच पाहिजे, असा जणू काही कायदा असावा, अशा पद्धतीने लोक झपाटल्यागत ऑनलाइन खरेदी करताना दिसून येतात. त्यासाठी अनेक शॉपिंग साइट्स भरघोस सवलतींचा पाऊस पाडतात. महागाईबद्दल एरवी कंठशोष केला जात असला तरी, परंपरा, संस्कृतीच्या नावाने हा खरेदी उत्सव मात्र तेजीत आहे. ऋण काढून सण साजरा करण्याची ‘परंपरा’ मात्र त्यातून जपली जातेय.
दिवाळी सणाला शास्त्रीय आणि धार्मिक अधिष्ठानही आहे. आयुष्याचा उपभोग व्यवस्थित घेण्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी धनत्रयोदशीला प्रत्यक्ष यमराज आणि देवांचे वैद्य धन्वंतरी यांचं स्मरण करण्याची प्रथा होती. नरकचतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेच्या मदतीने केलेल्या नरकासुराच्या वधाची आठवण करून दुष्ट प्रवृत्तींचं निर्दालन करण्याचा संकल्प केला जायचा. त्यासाठी दुष्प्रवृत्तीचं प्रतीक म्हणून पायाखाली कारीटं फोडण्याची प्रथा होती. वडीलधारी मंडळी ही प्रथा जपण्यासाठी धडपडत असली तरी, आजच्या पिढीतील त्यांची मुले, सुना, नातवंडांना त्यात फारसे काही ‘ग्रेट’ वाटत नाही. मुळात त्या दिवशी अभ्यंग स्नानासाठी सूर्योदयापूर्वी उठण्याऐवजी आता सुट्टीच तर आहे म्हणून घरातील मंडळी उशिरा उठत असल्याचे चित्र अनेक घरांमधून दिसून येते.
दिवाळीपासून वाढणाऱ्या थंडीमुळे अंग शुष्क होऊ नये, यासाठी दिवाळीत तेलाने अंगमर्दन आणि नंतर उटणं लावून गरम पाण्याने स्नान करण्याची परंपरा आहे. परंतु, हे अभ्यंगस्नानही आता एक उपचार म्हणून उरकलं जाते. उटण्याऐवजी त्याच्या सुगंधाचा साबण वापरायला लोकांनी कधीच सुरुवात केली आहे. व्यापारी गणितांनी परंपरेवर मात केल्याचे हे उत्तम उदाहरण! आपल्या आनंदाच्या साऱ्या व्याख्या सध्या ‘लक्ष्मी’शी जोडलेल्या आहेत. त्यामुळे घरात अर्थसंपन्नता राहावी यासाठी लक्ष्मीपूजन मात्र न चुकता जोरात केलं जातं.
हेही वाचा – प्रसिद्धी मिळविण्याचा शॉर्टकट
यमद्वितीया अर्थात भाऊबीज. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे भोजनास गेला, अशी पुराणकथा आहे. त्यामुळे भावाने बहिणीच्या घरी जेवायला जायची परंपरा रूढ होती. भाऊ-बहिणीच्या गोड नात्याचा हा दिवस आजकाल हॉटेलांमधल्या जेवणावळींनी साजरा करण्याचे फॅड आहे. त्यासाठी हॉटेल्सचे ॲडव्हान्स बुकिंगही केले जाते.
मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांनी सण साजरे करण्याचे मार्ग असे बदलले तरी, ग्रामीण भाग मात्र परंपरा जपतोय. ‘दिन-दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ असं म्हणत वसुबारसेपासूनच दिवाळीची सुरूवात होते. पहाटे उठून रांगोळ्यांच्या पायघड्या घालणे, फराळासाठी एकत्र जमणे आणि अन्य धार्मिक रितीरिवाजांनी दिवाळी साजरी होते.
फटाक्यांची डोकेदुखीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून वाढलेली आहे. अमुक एका स्तरापेक्षा आवाजापेक्षा जास्त नको आणि तमुक एका वेळेनंतर फटाके फोडू नयेत, असे नियम असले तरी, सारे सरकारी नियम मोडून रस्तोरस्ती बॉम्बस्फोट सुरू असतात. मोठ्या आवाजाचे फटाके फोडल्याने मोठा आनंद मिळतो, असा काहींचा दृढ समज असतो. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आवाजी फटाके कमी झाले असून आकाशात सप्तरंगाची उधळण करणाऱ्या आवाजविरहीत फटाक्यांची मागणी वाढली आहे. पण त्या फटाक्यांमुळे कानठळ्या बसत नसल्या तरी, वायूप्रदूषण प्रचंड वाढत आहे. नाक, डोळे, घसा आणि फुफ्फुसांना त्याचा त्रास सोसावा लागतो. एकीकडे आनंदाच्या व्याख्येशी नवी समीकरणं जोडली जात आहे आणि त्याबरोबर एक एक जुनी परंपरा निसटत चालली आहे. अर्थात, काळानुसार सण साजरा करण्याची पद्धत बदलणे आणि आनंदाची समीकरणे बदलणे साहजिकच आहे. कारण बदल स्वीकारत प्रगती करणे, हा समाजाचा स्थायीभाव आहे. मात्र आनंदाच्या या नव्या मार्गांवरून चालताना, छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा निर्भेळ आनंद कायमचा निसटू नये, एवढीच अपेक्षा!


