Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितलहानपणीची दिवाळी अन् नव्या कपड्यांची खरेदी

लहानपणीची दिवाळी अन् नव्या कपड्यांची खरेदी

चंद्रशेखर माधव

आमच्या लहानपणी, म्हणजे साधारण 1982-85च्या दरम्यान, दर दिवाळीत आम्ही कापड आणून ते शिवून घेत असू. शर्ट आणि पॅंटचे एकाच प्रकारचे कापड घ्यायचे आणि वडील, मुलांनी त्या कापडाचे कपडे शिवायचे अशी एक फॅशन त्या काळात प्रचलित होती. तयार कपडे घेण्याची फारशी पद्धत नव्हती. सुमारे 1988-90नंतर तयार कपडे घेण्याचे प्रमाण वाढले.

माझ्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची निश्चितच नव्हती, पण खिशात खूप पैसा खेळत होता, असंही नाही. त्यामुळे वडील जे घेऊन देतील ते समाधानाने स्वीकारायचं, असा शिरस्ता अंगवळणी पडला होता. दर दिवाळीला, कापड घेण्याच्या वेळी, आमचे वडील मला आणि माझ्या मोठ्या भावाला बरोबर घेऊन जात. कापड घ्यायचे म्हटले की, आमची नेहमीची ठरलेली दोन-तीन दुकानं होती. माझे वडील वृत्तपत्रात नोकरी करीत असल्याने लक्ष्मी रोडवरील बहुतांश दुकानदार त्यांना ओळखत होते. तिघांनाही एकाच प्रकारचे कापड घ्यायचे असल्यामुळे सगळ्यांना पहिल्या पसंतीतच एखादे कापड आवडले, असे कधीच होत नसे. पण तरीही सर्व मिळून आम्ही कापड पसंत करत असू. एखादे विजारीचे कापड दादाला आवडले तर मला आवडत नसे किंवा एखादे शर्टचे कापड मला आवडले तर, त्याला आवडत नसे. असा खेळ एक तासभर तरी चाले. बरेचदा, कापड पाहून पाहून कंटाळा आला की, मगच एकमत होत असे. सर्वात शेवटी बाबा पुन्हा विचारीत “आवडलं आहेत ना? घेऊ ना?” आमचा होकार मिळाला की, मग ते मोजून आमच्या तिघांच्या साठी तीन-तीन वेगवेगळे तुकडे ताग्यातून कापणे अन् ते पिशवीत भरून पैसे देणे वगैरे सोपस्कार पूर्ण करेपर्यंत अजून 15 मिनिटे तरी जात असंत.

कापड घेतल्यानंतरचे महत्त्वाचे पण अत्यंत कंटाळवाणं काम म्हणजे टेलरकडे जाणे आणि माप द्यायला उभे राहणे. पुण्यात लक्ष्मी रोडवर एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर अत्यंत अरुंद आणि अंधाऱ्या व्हरांड्याच्या शेवटी आमच्या टेलरचं दुकान होतं. एकाच वेळी आम्हा तिघांची मापे द्यायची असत, त्यामुळे तिथं सुमारे तासभर तरी लागे. त्यात तो टेलर आमच्या वडिलांचा जुना परिचित होता आणि तो आमच्या वडिलांसारखाच अत्यंत गप्पीष्ट होता. त्यामुळे पहिली 10 मिनिटं दोघांच्या गप्पा ऐकण्यातच जायची. त्या दुकानाचं नाव ‘उमेश टेलर’ असं होतं, त्या व्यक्तीचे नाव मात्र आता मला आठवत नाही.

त्यांची उंची साधारण 5 फूट किंवा चार फूट 10 इंच अशी होती आणि आम्ही तिघेही सुमारे सहा फूट उंचीचे होतो. त्यामुळे आमची माप घ्यायला लागले की, त्यांची हमखास गडबड उडते असे. आम्ही उंच आणि ते बुटके, त्यामुळे त्यांना एक छोटे स्टूल घेऊन त्यावर उभे राहावे लागे. स्टूल घेतलं तरीही बरेचदा, ते आमच्यासमोर उभे राहून आमच्या डाव्या खांद्यावरून टेप मागे टाकणार आणि आम्ही हात मागे करून ती टेप हातात पकडून उजव्या खांद्यावरून पुढे घेऊन त्यांच्या हातात देणार, असे मजेशीर प्रकार घडत असत. एक माप घेणार खाली उतरणार… काऊंटर जवळ जाणार, माप कागदावर लिहिणार… परत येणार, स्टूलवर उभे राहणार, पुढचं माप घेणार…  असा तो प्रकार बराच वेळ चालत असे.

याच दरम्यान तो मनुष्य आम्हाला “कॉलर 12 आहे, 13 करू का? की साडेबारा पुरे?” असे अगम्य प्रश्न विचारीत असे. बाबा सोबत असल्याने अशा प्रश्नांची उत्तरे तेच देत असत. असा हा कार्यक्रम उरकता उरकता कधी एकदा घरी जातो, असं होऊन जाई.

कालांतराने रेडिमेड कपडे बाजारात यायला लागले. जसे आम्ही मोठे झालो तसे कपडे शिवून घ्यायचं बंद केलं. त्यामुळे आमचा साधा सरळ आणि कष्टाळू उमेश टेलर ही भूतकाळात जमा झाला. पण आजही दिवाळी आली की त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. छान गोष्टी आहेत लहानपणीचा काळ आठवतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!