डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
एक जोडपं ओपीडीत आलं होतं. घर आवरताना पडल्यानं ‘तिच्या’ हाताला मुका मार लागला होता आणि बांगडी फुटून थोडं रक्त निघालं होतं…
“महाराजांच्या पूजेचं सामान माळ्यावर ठेवायला गेले आणि पडले… पण महाराजांच्या कृपेनं किरकोळ जखमेवर निभावलं…” हा तिचा भोळाभाबडा तर्क होता तर, “आपलं काम करताना आपल्या भक्ताला जे साधं पडण्यापासून वाचवू शकत नाही, असे महाराज-बिहराज काय कामाचे?” हा त्याचा कडू प्रश्न होता…
मी आपलं पेशंटचं मनगट नीट तपासून टीटीचं इंजेक्शन दिलं, पण त्यांचा वाद काही थांबेना! त्यामुळं त्यांना एक झेनकथा सांगितली, तुम्हालाही सांगतो…
जपानस्थित ‘याकुशिमा’ नावाच्या एका शांत जंगलात हिरव्यागार टेकडीच्या माथ्यावर एक छोटेखानी झेनमठ होता. झेन गुरू ‘ओसामु’ तिथं उपासना करत तर आजूबाजूच्या गावातून गावकरी आणि आदिवासी त्यांच्याकडं जीवनाचं गूढ जाणून घेण्यासाठी येत. एके दिवशी दोन तरुण ओसामुंकडे आले. एक होता ‘शिरो’ जो आत्यंतिक आस्तिक होता, विश्वाची निर्मिती एका दैवी शक्तीनं केलीय, यावर त्याचा ठाम विश्वास होता. तर, दुसरा होता ‘युतो’ जो कडवा नास्तिक होता आणि त्याचा विश्वास केवळ विज्ञान आणि तर्कावर होता…
हेही वाचा – तुम्ही काम काय करता?
शिरो आणि युतो दोघंही आपापल्या मतांवर ठाम होते. दोघांचीही आपापली मांडणी होती आणि दोघं यावरून एकमेकांशी वाद घालत होते. दोघांनी एकाच स्वरात ओसामुंना विचारलं, ”सांगा ना, खरं काय आहे? विश्वात दैवी शक्ती आहे की, हे सर्व केवळ नैसर्गिक नियमांचा खेळ आहे?”
ओसामुंनी मंद स्मित केलं आणि म्हणाले, ”चला, माझ्यासोबत बाहेर जंगलात चला.”
दोघंही त्यांच्यासोबत चालू लागले, जंगलात एका झाडाखाली ओसामु थांबले; तिथं एक अतिशय सुंदर फूल उमललं होतं आणि त्याच्या शेजारी एक अत्यंत बेंगरुळ असा किडा जमिनीवर रेंगाळत होता…
”या फुलाकडं आणि या किड्याकडं पाहा जरा, शिरो बेटा सांग बरं तुला काय दिसतं?” ओसामुंनी विचारलं.
“मला या फुलात दैवी सौंदर्य दिसतंय; जणू ईश्वरानं स्वतःच्या हातांनी रंगवलंय आणि हा किडा तो ही या ईश्वराचीच निर्मिती आहे, कारण प्रत्येक जीवात त्याचा अंश आहे.” शिरो उत्तरला.
आता ओसामुंनी युतोकडं मोर्चा वळवत विचारलं, ”…आणि तुला काय दिसतंय युतो बेटा?”
“हे फूल म्हणजे सूर्यप्रकाश,पाणी आणि माती यांचा रासायनिक खेळ आहे तर, हा किडा म्हणजे उत्क्रांतीचा परिणाम; लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून तयार झालेला.” युतो पुटपुटला.
ओसामुंच्या चेहऱ्यावर पुन्हा मंद स्मित उमटलं, ”तुम्ही दोघंही एकाच गोष्टीकडं पाहात आहात, पण तुमच्या दृष्टिकोनात फरक आहे! फूल आणि किडा यांना तुमच्या मतांचा वाद माहीत नाही. ते फक्त आहेत, जसे आहेत तसे… तुम्ही तुमच्या मनातून या वादाला जन्म दिलाय. जर तुम्ही आपापले दृष्टिकोन बाजूला ठेवले तर, फूल फक्त फूल आहे आणि किडा फक्त किडा आहे.” त्यांनी दोघांनाही समजावलं.
हेही वाचा – Japanese story : मला ‘शांती’ हवी!
दोघंही गप्प झाले. ओसामु पुढं म्हणाले, ”आस्तिक आणि नास्तिक यांच्यातला फरक हा तुमच्या मनाच्या खिडक्यांमुळं आहे. खिडकी ज्या रंगाची असेल तर, त्या रंगाचं जग दिसेल.”
त्या रात्री दोघंही शांतपणं आपापल्या घरी परतले. त्यांनी वाद घालणं सोडलं आणि फक्त जंगलातील झाडं, फुलं आणि तारे पाहात राहिले… प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी स्वीकारत!
थोडक्यात आस्तिक आणि नास्तिक यांच्यातील भेद हा केवळ ‘दृष्टिकोनात’ आहे; सत्यात नाही… सत्याला शब्दांत बांधण्यापेक्षा त्याला आपापल्या आकलनशक्तीनं अनुभवणं अधिक महत्त्वाचं आहे, अन्यथा निव्वळ भावनिक होत केवळ दगड पूजणारा ‘आस्तिक’ आणि फक्त तांत्रिक कारणं देत थेट क्लिष्ट मानवी मनोव्यापारही नाकारणारा ‘नास्तिक’ यात फरक फक्त लेबलपुरताच!


