नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते…! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…
नाती, बोलीभाषेतली… थोडंसं विचित्र… पण बऱ्याच जणांना माहीत असलेलं…
आता माझ्यासारखे बावळट पण असूच शकतील, ज्यांना बोलीभाषेतील नाती म्हणजे काय? हा प्रश्न पडलाच असेल.
काही लोक बोलता बोलता सहज नाती जोडून मोकळी होतात.
सकाळची घाईची वेळ. नवऱ्याची ऑफिसला जायची घाई… मी इस्त्रीचे कपडे आणायला निघाले तर, इस्त्रीवाले काका आमच्या कपड्यांचं गाठोडं घेऊन घरीच यायला निघाले होते, रस्त्यातच भेटले. सोबत एक बाई होती. तिला जरा वाईट वाटत होतं की, थोड्या वेळापूर्वी ती इस्त्रीवाल्या काकांसोबत भांडून गेली होती. तिच्या नवऱ्याची नवीन पँट हरवली होती आणि आता ती भरून द्या म्हणून ती काकांशी भांडली होती. पण आता ‘ती सापडली’ म्हणून सांगायला आली होती.
अचानक त्यांच्या संभाषणात तिने मलाही ओढलं – “वो क्या है ना… मी कपड्यांचं गाठोड घेऊन घरी गेले. आणि किचनमध्ये गेले. एवढ्यात… आप का भाई वो पैंट लेके बाथरूम में गया…”
हेही वाचा – ‘त्या’ राजस्थानी महिलांची ‘पॉवर बँक’!
‘लो कर लो बात…’ मी मुलखाची बावळट. मला महान प्रश्न पडला की, माझा भाऊ हिच्या नवऱ्याची पँट घेऊन बाथरूममध्ये का गेला?
माझा चेहरा बघून काका म्हणाले, “ताई, ती तिच्या नवऱ्याबद्दल बोलतेय. त्याला तुमचा भाऊ म्हणतेय…”
मी काकांच्या हातातून इस्त्रीचे कपडे घेतले आणि वेड्यासारखी हसत होते…. आजही आठवलं तरी हसू हे येतंच.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या बिल्डिंगमधली एक बाई म्हणाली, “आंटी, आप अच्छे से तय्यार होकर आये तो कितना अच्छा लगा आपको देखकर! मेरी सासू माँ की याद आयी. आप के बेटेने भी आप को देखा. बोले माँ की याद आयी…”
आता आली का पंचाईत!
मी मनाशीच म्हटलं, “माझा मुलगा आला होता? मला न भेटताच गेला?” मला राग आला आणि वाईटही वाटलं.
हेही वाचा – एका लाडवाची गोष्ट!
थोड्या वेळाने ती बाई परत आली अन् म्हणाली, “आंटी, आपका बेटा बहोत अच्छा है… कभी मिलना आप उनसे…!”
बिल्डिंगमधल्या दुसऱ्या एका मुलीने लगेच उलगडा केला… म्हणाली, “मावशी ती तिच्या नवऱ्याबद्दल बोलतेय. त्याला तुझा मुलगा म्हणतेय.”
माझं असे झालं ना की, मोठ्यानं बोलावे – “तुझ्या तोंडाला लागली हळद ती!”
किती हा बावळटपणा. ही अशी नाती लावणाऱ्या लोकांचं बोलणं कसं कळत नाही मला???
होतं असे बरेचदा…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


