कामिनी व्यवहारे
रोजच्या रोज रुचकर, खमंग पदार्थ, तेही नवनवीन पदार्थ बनवणे म्हणजे महिलांसाठी एक परीक्षाच असते. विशेषत:, सुट्टीच्या दिवशी काहीतरी हटके करण्याकडे महिलांचा कल असतो. घरातल्या सर्वांनाच रोजच्या जेवणापेक्षा वेगळं काही तरी खाण्याचा मूड असतो. मग एखादा असा मेन्यू ठरतो की, तोच स्पेशल असतो. अशावेळी घरात वेगवेगळे पदार्थ करत असताना, हिरव्या वड्याची रेसिपी करून बघायला काय हरकत आहे! या प्रोटिनयुक्त वड्यांची कृती पाहुयात.
तयारीस लागणारा एकूण वेळ – सुमारे 7 तास
पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी
साहित्य
- मूग – अर्धी वाटी
- मटकी – अर्धी वाटी
- चणाडाळ – अर्धी वाटी
- हिरव्या मिरच्या – 5 ते 6
- आले – 1 इंच
- धणे – पाव चमचा
- जिरे – पाव चमचा
- हिंग – 1 लहान चमचा
- हळद – 1 लहान चमचा
- बारीक चिरलेला कढीपत्ता – 1 टी-स्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल – तळण्यासाठी
हेही वाचा – Recipe : सात्विक पंचामृत केक
कृती
- अर्धी वाटी मूग, अर्धी वाटी मटकी आणि अर्धी वाटी चणाडाळ हे वेगवेगळे 5 ते 6 तास भिजवून ठेवावे.
- नंतर मूग, मटकी आणि चणाडाळमधील सर्व पाणी काढून टाकावे आणि त्यात आले, मिरच्या टाकून जाडसर वाटून घ्यावे.
- वाटून झाल्यावर त्यात हळद, धणे, हिंग, जिरे, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घ्यावे.
- तळणासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवावे.
- तेल व्यवस्थित तापल्यावर गॅस मंद आचेवर ठेऊन मिश्रणाचे छोटे आणि चपटे गोळे करून ते त्यात सोडावे.
- त्यानंतर ते लालसर झाल्यानंतर कढईबाहेर काढावे.
हेही वाचा – Recipe : वेगळ्या चवीचे आंबट-गोड पंचामृत
टीप
- सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर हे हिरवे वडे सर्वह करावेत.
- मेयॉनिजसोबतही गरम गरम हिरवे वडे छान लागतात.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


