Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितउधारी अन् तरुणाच्या जीवाचे मोल!

उधारी अन् तरुणाच्या जीवाचे मोल!

दीपक तांबोळी

भाग – 1

एका पेशंटच्या दाढेची ट्रिटमेंट झाल्यावर सुबोधने दुसऱ्या पेशंटला खुर्चीत बसायला सांगितलं. त्याच्या दाढांचं तो निरीक्षण करीत असतानाच रिसेप्शनिस्ट काचेचा दरवाजा ढकलून आत आली.

“सर, ते मनोहर पाटील नावाचे पेशंट आहेत ना, ते म्हणताहेत की, आता त्यांच्याकडे फक्त एक हजार आहेत. बाकीचे दोन हजार पुढच्या आठवड्यात आणून देणार म्हणताहेत.”

सुबोधला याच गोष्टीची चिड होती. कपड्यांवरून तर पेशंट चांगला सधन दिसत होता. शिवाय, तो नेहमी कारने येतो, हेही त्यानं पाहिलं होतं. बरं, त्यांना अगोदरच तीन हजार खर्च येणार असल्याची कल्पना दिली होती. तरी सुद्धा त्यांनी पैसे आणू नयेत, याचा त्याला संताप आला. प्रॉब्लेम हा होता की, तिथं जमलेल्या पेशंटच्या गर्दीसमोर त्यांना संतापून बोलणंही त्याच्याबद्दल पेशंटच्या मनात असणाऱ्या प्रतिमेला छेद देणारं होतं. त्याने नरमाईने घ्यायचं ठरवलं.

“ठीक आहे. त्यांचा मोबाइल नंबर लिहून घे आणि त्यांना सांग पुढच्या आठवड्यात नक्की आणून द्या!”

रिसेप्शनिस्ट गेली. तो आपल्या कामाला लागला, पण मनातली ती खदखद काही कमी होईना. खरं पहाता, तो शहरातला सगळ्यात यशस्वी दंतवैद्य होता. गरिबीची जाण असल्यामुळे त्याने आपली फी माफक ठेवली होती. कामात तर तो निष्णात होताच. वर मिठास बोलणं. त्यामुळे तो सर्वांना डॉक्टरपेक्षा आपला मित्रच वाटायचा. त्याचा दवाखाना कायम पेशंटने तुडूंब भरलेला असायचा. सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्याचं काम चालायचं. महिन्याला दहा लाखाच्या आसपास त्याची कमाई होती. लोकांनी त्याची उधारी बुडवली नसती तर, हीच कमाई अकरा-बारा लाखांपर्यंत गेली असती.

दुपारी दोन वाजता त्याने काम थांबवलं. त्याला आणि स्टाफलाही भूक लागली होती. पंधरा मिनिटांत त्याने जेवण संपवलं, कारण बाहेर पेशंट ताटकळत बसले होते. बेसिनमध्ये हात धुत असतानाच मोबाइल वाजला. हात कोरडे करून त्याने तो घेतला…

“हॅलो, सुबोध मी चंदन बोलतोय. फ्री आहेस ना? जरा बोलायचं होतं,” पलीकडून आवाज आला

“आताच जेवून हात पुसतोय बघ. बोल काय म्हणतोस?”

“अरे जरा घराचं काम सुरू केलंय. दोन-तीन लाखाची मदत केलीस तर बरं होईल…”

“चंदन यार, मी तुझ्या पाया पडतो. तू दुसरं काहीही माग. माझ्या घरी सहकुटुंब रहायला ये. खाणंपिणं सगळं मी करीन. पण प्लीज यार, पैसे मागू नकोस. तुला सांगतो ज्यांनी-ज्यांनी माझ्याकडून उधार पैसे नेलेत, त्यांनी ते मला कधीच परत केले नाहीत. तीस-चाळीस लाख माझे लोकांकडे अडकलेत. पैसे द्यायचं कुणी नावच काढत नाही!” सुबोध उसळून म्हणाला.

“अरे, पण मी तुझा मित्र आहे. तुझे पैसे बुडवेन, असं तुला वाटलंच कसं?”

“मित्र? अरे बाबा, मित्र तर मित्र माझे भाऊ, बहिणी, मेव्हणे, काका, मामा, सासरे सगळ्यांना पैसे देऊन बसलोय. एक रुपया मला परत मिळाला नाही. मिळालं ते फक्त टेंशन, मनस्ताप आणि शिव्या. पैसे मागितले तर म्हणतात, ‘तुम्हांला काय कमी आहे? पैसा धो धो वाहतोय. पैसे देणारच आहोत, बुडवणार थोडीच आहे!’ तुला जर वाटत असेल की, आपली मैत्री कायम रहावी तर प्लीज पैसे मागू नकोस. हा पैसा सगळे संबंध खराब करतो बघ!”

हेही वाचा – पुस्तकांचा ठेवा अन् खरा वारसदार!

समोरून फोन कट झाला. तो रागानेच कट केला असणार हे त्याच्या लक्षात आलं. त्याने परत आपलं काम सुरू केलं, पण त्याच्या मनातून तो विषय जाईना.

उधारीचे पैसे परत का मिळत नाहीत, हे विचारायला मागे तो एका ज्योतिष्याकडे गेला होता. ज्योतिषाने त्यांची कुंडली पहाताच त्याला सांगितलं,

“दुसरं काही सांगण्याच्या आत एक गोष्ट सांगतो. तुम्ही कुणालाही उधार पैसे देऊ नका. उधारीचे पैसे तुम्हाला कधीही परत मिळणार नाहीत. तुमचे भाऊ-बहीण, मेव्हणे, जवळचे नातेवाईक, मित्र सगळेच तुमचे पैसे बुडवतील. तसंच, कुणालाही जामीन राहू नका, त्यातही तुम्हीच फसाल. तुमच्या कुंडलीतले योगच तसे आहेत.”

“याला काही उपाय?” त्याने विचारलं होतं. ज्योतिषाने नकारार्थी मान हलवली.

“उपायापेक्षा बचाव केव्हाही चांगला. कोणी कितीही कळकळीने पैसे मागितले, तरी द्यायचे नाहीत. संबंध खराब झाले तरी चालतील, कारण पैसे देऊनही संबंध खराबच होणार आहेत… किंवा मग पैसे द्यायचे आणि ते दिले आहेत हेच विसरून जायचं, म्हणजे टेंशनचं कामच नाही. तुमच्या नशिबात पैसा भरपूर आहे. तेव्हा पैसा बुडाल्यामुळे तुम्हाला फारसं जाणवणार नाही.”

ही गोष्ट खरी होती. त्याच्याकडे पैसा येताना दिसत होता, म्हणून तर लोक मागत होते आणि तो बुडवल्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही म्हणून निर्लज्जपणे बुडवत होते. तेव्हापासून त्याने पैसे उधार देणं बंद केलं होतं. पण दवाखान्यातली उधारी त्याला काही बंद करता आली नाही.

रविवार उजाडला. खरं तर रविवारीही त्याचा दवाखाना बंद नसायचा. असिस्टंट डाँक्टर्स काम करत असायचे. सुबोधही एखाद-दुसरी चक्कर टाकायचा. आज मात्र त्याला साठ किलोमीटरवरच्या एका खेड्यातल्या लग्नाला जायचं होतं म्हणून तो दवाखान्यात जाणार नव्हता. खेड्यातली लग्नं विशेष म्हणजे त्यातलं जमिनीवर बसून केलेलं जेवण त्याला फार आवडायचं. लहानपणीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या व्हायच्या. देशविदेशात अनेक महागड्या हाँटेल्समध्ये तो जेवला होता, पण या जेवणातली तृप्ती त्याला कधीही तिथं मिळाली नव्हती.

लग्न आणि लग्नातलं जेवण आटोपून तो आपल्या आलिशान कारमधून घरी परतायला निघाला. त्याच्या शहरापासून साधारण पंचवीस किमी अंतरावर असताना त्याला दुरूनच एक माणूस येणाऱ्या वाहनांना थांबवण्यासाठी हात दाखवताना दिसला. पण वाहनं न थांबता त्याला वळसा घालून जात होती. जसा सुबोध त्याच्याजवळ आला त्याला दिसलं की, रस्त्यावर त्या माणसाशेजारीच एक बाईक आणि माणूसही पडला आहे. सुबोधला रहावलं नाही, त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली.

“काय झालं?” खिडकीची काच खाली करून त्याने विचारलं.

” दादा ॲक्सिडंट झालाय. पोराला दवाखान्यात न्यावं लागीन,” वयाची सत्तरी उलटलेला तो म्हातारा सांगू लागला.

“एक मिनिट थांबा,” त्याने गाडी साइडला घेतली.

“अहो, कशाला या भानगडीत पडता. एक तर रविवार मिळतो तर घरी चलून आराम करा ना!” बायको त्राग्याने म्हणाली.

तिच्याकडे दुर्लक्ष करून तो खाली उतरला आणि म्हाताऱ्याकडे गेला.

“कसं आणि केव्हा झालं हे?”

“दादा म्या आणि पोरगा गावाकडे जात होतो. ट्रकवाल्याने मागून धडक मारली आणि पळून गेला. म्या झाडीत फेकल्या गेलो म्हून मले काही झालं नाई… पण पोराच्या अंगावरून ट्रक गेला…” म्हातारा आता रडू लागला. सुबोधने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाकडे नजर टाकली. बापरे! प्रकरण गंभीर दिसत होतं. तो पटकन खाली वाकला आणि त्याची नाडी तपासली. नाडी सुरू होती. पटकन ॲक्शन घेतली तर, वाचूही शकला असता. त्याने उठून म्हाताऱ्याकडे पाहिलं. तो हात जोडून उभा होता. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात होत्या.

“दादा, अर्ध्या तासापासून गाड्यांना हात देऊ लागलो. कुणीच थांबत नाही. पोराला दवाखान्यात घेऊन चला दादा तुमचे लई उपकार होतीन…”

सुबोधने क्षणभर विचार केला. मग त्याने झटकन चेंदामेंदा झालेल्या खटारा बाईकला रस्त्याच्या बाजूला टाकलं. मग म्हाताऱ्याच्या मदतीने त्याने त्याच्या पोराला गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं. त्याच्या शेजारीच म्हाताऱ्याला बसवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने गाडी सुसाट सोडली. गाडी चालवतच त्याने मोबाईल काढला. शहरात ॲक्सिडंट हॉस्पिटल असलेल्या डॉक्टर मित्राला त्याने फोन लावला…

हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

“शेखर, सुबोध बोलतोय. इमर्जन्सी केस आहे. दवाखान्याबाहेर स्ट्रेचर तयार ठेव. ओ.टी. तयार ठेव. मी ब्लडबँकेला रक्त तयार ठेवायला सांगतो. पंधरा-वीस बाटल्या रक्त लागणार आहे. मी वीस-पंचवीस मिनिटात पेशंटला घेऊन पोहोचतोय.”

“सुबोध, अरे आज रविवार आहे आणि ॲक्सिडंटची केस असेल तर पोलिसांना…”

“मी करतो सगळं मॅनेज. तू फक्त तयार रहा आणि तुझ्यासारखाच माझाही रविवार आहे. सो प्लीज बी फास्ट… माझ्या जवळच्या नातेवाईकाची केस आहे, असं समज.”

याच शेखरला सुबोधने हॉस्पिटलच्या उभारणीसाठी पाच लाख उधार दिले होते. शेखरने त्याला फक्त दोन लाख परत केले होते. पण या उधारीवर बोलण्याची ही वेळ नाही, याची जाणीव सुबोधला होती.

शेखर दिलेल्या शब्दाला जागला. त्याने खरोखरच सगळी तयारी करून ठेवली होती. त्या म्हाताऱ्याला बाहेरच बसवून त्याच्या पोराला ऑपरेशन थिएटरमध्ये तो घेऊन गेला. रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्यामुळे ब्लड ग्रुप तपासून त्याने रक्ताच्या बाटल्या मागवल्या. सुदैवाने ब्लड बँकेत ओ पॉझिटिव्हचा भरपूर साठा होता. एक्सरेतून कमरेचं, खांद्याचं, उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिन्ही ठिकाणी ऑपरेशनची गरज होती.

तातडीने हालचाल केल्यामुळे पेशंट धोक्याबाहेर असल्याचं थोड्यावेळाने सुबोधला शेखरने सांगितलं, तेव्हा सुबोधला एकदम हायसं वाटलं. त्याने बाहेर येऊन म्हाताऱ्याला सांगितलं, तेव्हा म्हातारा त्याच्या पाया पडू लागला. सुबोधने लगेच त्याचे हात धरले.

“देवाचे आभार माना काका, त्यानेच तुमच्या मुलाला वाचवलं. बरं, घरी कळवलं की नाही?”

“दादा पोराकडेच मोबाईल व्हता, तोबी तुटी गेला. कसं कळवू?”

“अरे बापरे! मग आता?”

म्हाताऱ्याने खिशातून एक छोटी मळकट डायरी काढली. त्याच्यातून छोटू या नावाचा नंबर त्याने सुबोधला दाखवला.

“याले फोन करा”

“हे कोण?”

“धाकला पोरगा हाये”

“ओके” सुबोधने स्वतःच्या मोबाईलवरुन तो फोन डायल केला. अपघाताची तीव्रता त्याने सौम्य भाषेत सांगितली. ‘काळजी करू नका,’ असं तीन-तीनवेळा सांगितलं.

“दादा किती दिवस लागतीन आणि किती पैसे लागतीन हो?”

म्हाताऱ्याने विचारलं. त्याच्या प्रश्नातल्या काळजीने सुबोधचं काळीज हललं. म्हाताऱ्याची काळजी खरंच समजण्यासारखी होती. आजकाल डॉक्टरकडे पेशंटला ॲडमिट करणं म्हणजे कसायाच्या हातात बकरी सोपवण्यासारखं होतं. आपण डॉक्टर असल्यामुळे शेखरने अजून पैशाची मागणी केलेली नाही… नाहीतर, रक्ताची बाटली लावण्यापूर्वीच शेखरने पन्नास-साठ हजार जमा करायला लावले असते, हे काय तो जाणत नव्हता?

“काका, डाँक्टरांनी अजून तरी काही सांगितलं नाहिये; पण महिनाभर तरी तुमच्या मुलाला इथं रहावं लागेल, हे नक्की. पैशांचं मी विचारून सांगतो. डॉक्टरसाहेब माझे मित्र आहेत. तुमच्या घरची मंडळी येईस्तोवर तुमच्याकडे कुणी पैसे मागणार नाहीत. पण घरच्यांना पन्नास-साठ हजार तरी आणायला सांगा”

म्हाताऱ्याचा चेहरा काळवंडला. त्याने सुबोधला परत फोन लावायला सांगितला. मग तो बाहेर जाऊन आपल्या मुलाशी बोलत बसला. सुबोधचं एकदम आपल्या बायकोकडे लक्ष गेलं. ती रागाने त्याच्याचकडे पाहात होती.

“अजून संपलंच नाही का? अहो संध्याकाळ झालीय. पोरं आपली वाट पहाताहेत. झालं ना?. पार पाडलं तुम्ही तुमचं कर्तव्य? आता तरी चला…” ती वैतागून म्हणाली. तिचंही म्हणणं योग्यच होतं. ती स्वतः फिजिओथेरपिस्ट होती. सुबोधइतकी तिची प्रॅक्टिस नसली तरी तिलाही फुरसत रविवारीच मिळायची.

“सॉरी सॉरी… बस एकच मिनिट हं शमा. शेखरला मी सांगून येतो…”

तो आत गेला. शेखरकडून अपडेट्स घेऊन आणि गरज भासल्यास बोलवायचं सांगून तो बाहेर आला. म्हाताऱ्याला आपलं कार्ड देऊन म्हणाला, “काका मला आता अर्जंटली घरी जायचंय. हे माझं कार्ड असू द्या. काही गरज लागली तर, मला फोन करा. तुमची मंडळी येतीलच थोड्या वेळात…”

म्हाताऱ्याने हात जोडले. सुबोध बायकोला घेऊन निघाला.

“गाडी बघितली का? मागची सीट आणि दारं रक्ताने भरलीत. तुम्हालाच का हो इतकी उठाठेव असते? जणू माणुसकी फक्त तुमच्यातच उरलीय!”

ती नाराजीच्या सुरात म्हणाली. तो फक्त हसला. तिच्याशी वाद घालायची त्याची इच्छा नव्हती.

“…आणि का हो या शेखरलाच तुम्ही पाच लाख दिले होते ना? दिले का त्याने ते परत?”

“दोन लाख दिलेत. तीन बाकी आहेत. देईल लवकरच बाकीचे…”

“आता तुमचं येणं होईलच. मागून घ्या सगळे. काय बाई लोक असतात. सात-आठ वर्षांपूर्वी घेतलेले पैसे अजून परत करत नाही माणूस!”

‘तुझ्या भावानेही तर सात लाख नेलेत. एक रुपया तरी परत केला का?’ असं विचारायचं त्याच्या अगदी ओठावर आलं होतं, पण तो चूप बसला. शेवटी भाऊ आणि मित्रात फरक असतोच ना?

या घटनेनंतर सुबोध परत आपल्या दवाखान्यात व्यग्र होऊन गेला. दहा-बारा दिवसांनी त्याला शेखरचा फोन आला,

“सुबोध, तू आणलेला तो ॲक्सिडंट झालेला पेशंट, शामराव पाटील, अरे त्याचं ऑपरेशन करायचंय, पण त्याचे नातेवाईक पैसे संपले, असं म्हणताहेत. काय करू?”

“त्यांनी काहीच पैसे दिले नाहीत का?”

“एक लाख दिलेत, पण एक लाखात काय होतंय? तीन ऑपरेशन्स होती त्याची, त्यातलं कमरेच्या हाडाचं केलं मी. हाताचं आणि पायाचं बाकी आहे. मेडिकल इंश्युरंसदेखील नाहीये त्यांचा!”

एक क्षण सुबोधला वाटलं, झटकून टाकावी जबाबदारी. माणुसकीखातर आपण त्या माणसाला दवाखान्यात पोहचवलं. पैशाचं मॅटर शेखरने पाहावं… आपला काय संबंध? नसेल देत पैसे तर हाकलून दे, दवाखान्याबाहेर. पण तो असं करू शकणार नव्हता. नव्हे त्याचा तो स्वभावच नव्हता, म्हणूनच तर लोक त्याला आजपर्यंत फसवत आले होते…

” साधारण किती पैसे लागतील शेखर पूर्ण ट्रीटमेंट, रुमचं भाडं, मेडिसिन्स वगैरेला?”

“अडीच लाखाच्या आसपास…”

“ठीक आहे तू कर ऑपरेशन. बाकीच्या दीड लाखाचं काय करायचं ते बघतो मी…” तो मनाविरुद्ध बोलून गेला. मग त्याने रिसेप्शनिस्टला बोलावून सांगितलं,

“ज्या ज्या पेशंटकडे पैसे बाकी असतील, त्यांना फोन कर आणि बाकी लवकरात लवकर पे करायला सांग”

रात्री तो दवाखाना बंद करून घरी गेला. ज्या ज्या लोकांना त्यानं पैसे उधार दिले होते, त्यांची लिस्ट केली. मग बायकोच्या नातेवाईकांना सोडून सगळ्यांना फोन लावायला सुरुवात केली. मृत्यूच्या दाढेत असलेल्या एका मित्राच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचं सांगून ताबडतोब पैसे देण्याची विनंती केली. पण कुणालाच त्याच्या मित्राच्या जीवाशी देणंघेणं नव्हतं. सगळेच पैसे न देण्याचे बहाणे सांगत होते… त्याच्याच पैशासाठी त्याला भीक मागावी लागत होती आणि घेणारे त्याला खेळवत होते. थकून त्याने फोन ठेवला. ज्या लोकांना दुसऱ्याच्या प्राणांचीही पर्वा नाही त्यांच्या अनावश्यक गरजांसाठी आपण उसने पैसे द्यावेत, याचा त्याला भयंकर संताप आला. स्वतःला शिव्या देतच तो झोपायला गेला.

क्रमश:


मोबाइल – 9209763049

(ही कथा माझ्या ‘गिफ्ट-भेट ह्रदयस्पर्शी कथांची’ या पुस्तकातील आहे.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!