डॉ. विवेक वैद्य
झोपलेलो होतो आणि फोन खणखणला. (पूर्वी लँडलाइन खणखणायचा, आता मोबाईल किणकिणतो. असो.)
“हॅल्लो…” झोप मोडल्याने मी वैतागलेलो.
“सुप्रभात.” समोरून आवाज येताच माझी झोप खाडकन् उडाली. हे आमचे चुलतकाका.
“अरे, अभ्यंगस्नान झाले की नाही?”
“नाही. आत्ताच उठतोय…” मी ओशाळून म्हणालो.
“अरे, नरकात जाशील. दिवाळीच्या दिवसात झोपतोय कसला?”
मी घाबरून बाहेर बघितलं. अजून अंधारच होता. लवकर उठायचे म्हणून अलार्म लावला होता, तोही अजून वाजला नव्हता. बापरे! काका काय तीन वाजताच उठले की काय?
“नाही… ते मुलं रात्री उशिरा आले गावी दिवाळीसाठी, म्हणून उशीर झाला.”
“मुले उठली का नाही?”
“नाही. ते प्रवास करून आले, थकले असतील.”
“विवेक, तू काहीच वळण लावले नाही मुलांना. अरे, सणासुदीला तरी लवकर उठायचे त्यांनी.”
काय बोलणार? मुलं तर फुल्ल सुट्टी एंजॉय करतात… सकाळी नऊशिवाय उठत नाहीत!
“बरे. सुनबाई उठली का?”
“हो… हो…” मी गाढ झोपलेल्या सौभाग्यवतीकडे एक कटाक्ष टाकला. काल पोरं येणार म्हणून दिवसभर खपून फराळाचे केले तिने. लवकर उठणे शक्यच नाही. खरे बोलले तर, आणखी काय ऐकवतील कुणास ठाऊक? (डोक्यावर बसवून ठेवलंय, हे तर नक्कीच ऐकवणार!)
हेही वाचा – Thanks… कोणी कोणाला म्हणायचं!
“तिच्याकडून छान उटणे, तेल लावून घे… अभ्यंगस्नान झाले की, देवपूजा कर…”
“हो, हो, करतो.”
“…आणि गडबडीत विसरलो बघ. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.”
“तुम्हाला पण काका! तब्येतीला जपा…”
“माझी तब्येत एकदम मस्त आहे. पंच्याहत्तरी झाली, पण अजून काठीसुद्धा लागत नाही चालताना. शेतापर्यंत सहज जाऊन येतो पायी. बरं ते मरूदे… केव्हा येणार गावी?”
“बघतो… जमले की येऊन जाईन.”
“केव्हा जमणार बाबा तुझे? चार वर्षांपूर्वी येणार होता, तेव्हापासून वाट बघतोय…”
“तेव्हा मुलाचे ॲडमिशनचे निघाले, मग राहिलेच ते.”
“पण, नंतरची तीन वर्षे का नाही जमले?”
“काका, ते…”
“अरे बाबा, तुझ्या काकूने आमच्या सुनबाईसाठी अगदी छानशी साडी घेऊन ठेवली होती. तिला आता कसर लागेल, अशी भीती वाटायला लागली. नशीब मुलांसाठी कपडे घेणार होती… मी म्हणालो, अगं, पोरांना सोबत घेऊन जाऊ नाहीतर मापात गडबड व्हायची. बरे झाले तेव्हा घेतले नाहीत! नाहीतर आता बसले असते का? चार वर्षांत पोरांची उंची किती वाढते. मोठ्याचे लहानाला बसले असते…” काका हसले; पण ते हसू दबलेले वाटले, बळेच हसले असावेत. हसता हसता त्यांनी नक्कीच डोळे पुसले असतील.
“काका बघतो मी. नाहीतर तुम्ही येता का इकडे? मी करतो व्यवस्था ऑनलाइन तिकिटाची…”
“नको रे, तुझ्या काकूचे गुडघे दुखतात. प्रवास सहन होत नाही आजकाल. तूच जमव… परवाच म्हणत होती की, विवेक आल्यावर त्याच्याबरोबर कुरडाया पापड देते, पोरांना आवडतात म्हणून. मग मीही म्हटले बाजरी, गहू काढून ठेवतो एक एक पोते. पोरांना बाजरीची भाकरी घालत जा खायला चविष्ट आणि पौष्टिक… आणि शेतातले लोकवन गहू आहेत. गरम गरम पोळीचा घास तोंडात टाकला की, विरघळतो…”
“…….”
“जाऊ दे, मी आपला उगाच बडबडत राहणार आणि तू कोणते तरी कारण सांगून येणाचे टाळणार?”
“नाही काका. यावर्षी नक्की जमवतो…” माझा स्वर कातर झाला.
“बघ बाबा… तब्येत खणखणीत असली तरी, वार्ध्यक्याचा शिक्का लागलाय. वरतून तो केव्हा बोलावेल सांगता येत नाही… फोनवर आशीर्वाद देतोच आहे… पण वाटते रे कधीतरी की तुम्हा दोघांच्या डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद द्यावा, नातवंडाना ह्दयाशी कवटाळावे. कधीतरी तरी हे घर भरल्यासारखे वाटावे… चल ठेवतो फोन…” काकांनी पटकन फोन ठेवला त्याअर्थी त्यांचा गळा भरून आला असावा.
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
मीही डोळे पुसले, तेवढ्यात पत्नीही उठली.
“काय झाले? डोळे काय पुसतायत सकाळी उठल्या उठल्या?” तिने विचारले.
“काही नाही गं… रात्री पूर्ण झोप झाली नाही म्हणून असेल…” मी म्हणालो आणि उठलो. या दिवाळीनंतर सहकुटुंब गावी जायलाच हवे… मी मनात ठरवले!


