Tuesday, March 10, 2026

banner 468x60

Homeललितऑफिसचा डबा आणि आलू पराठे!

ऑफिसचा डबा आणि आलू पराठे!

पराग गोडबोले

“आई काय दिलंय आज डब्यात?” मी अगदी उत्सुकतेनं विचारलं आईला आणि आई म्हणाली, “अगं, आलू पराठे आणि दही दिलंय. सोबत एक केळं पण आहे. न विसरता खा.”

“दादाला काय दिलंय?”

“तुला जे दिलंय, तेच त्यालाही दिलंय. त्याला एक जास्त दिलाय पराठा, एवढंच.”

“बरं” म्हणाले मी, पण आईच्या नकळत दोघांचे डबे उघडून बघण्याचा मोह मला आवरला नाही. दोघांच्याही डब्यात पराठेच होते, पण माझ्या  डब्यातले दोन पराठे थोडेसे करपलेले होते. दादाचा डबा उघडला आणि त्यात डोकावून बघितल्यावर, सगळे पराठे अगदी छान, व्यवस्थित भाजलेले, सुबक दिसत होते.

“आई, लगेच इकडे ये. काहीतरी विचारायचंय तुला…” मी आईला हाक मारली.

“अगं, का एवढा आकांत मांडलायस? काय झालंय एवढं?”

“आई, माझा डबा उघड आणि दादाचा पण उघड.”

चपापली आई थोडी.

“कशाला? नीट भरलेत तर राहुदेत की!”

“नको मीच उघडते,“ असं म्हणून मी डबे उघडले. आतले करपलेले पराठे आईच्या डोळ्यांसमोर नाचवत   विचारलं, “काय आहे हे?”

“अगं, गॅस मोठा झाला थोडा म्हणून करपलेत किंचित, एवढं काय त्यात?”

मी दादाचा डबा उघडला आणि त्यातले पराठे पण धरले आई समोर आणि विचारलं, “हे कसे अगदी नीट आणि सुबक भाजलेले दिसतायत. एक डाग नाहीये जळल्याचा यांच्यावर, मग मलाच का असे जळकट, करपलेले?“

हेही वाचा – आसपास वावरणारे… मुखवटे आणि चेहरे

“अगं, त्याला सगळं नीट व्यवस्थित लागतं ना, किती खोड्या आहेत त्याच्या अंगात ठाऊक आहे ना तुला? तुझी मुलीची जात, तुला सवय हवीच अशा गोष्टींची!”

“अच्छा, मी मुलगी म्हणून करपलेलं खायचं आणि तो मुलगा, त्याला सगळं नीट लागतं म्हणून त्याला मात्र अगदी छान पराठे, असंच ना?”

संताप संताप झाला माझा नुसता. कुठल्या युगात वावरत होती माझी आई? एकविसाव्या शतकात ही विचारसरणी तिची, का तर मी मुलगी आहे म्हणून? तसं बघायला गेलं, तर हा असा भेदभाव अगदी लहानपणापासून अनुभवत होते मी… तो म्हणे वंशाचा दिवा आणि मी जाणार लग्न करून दुसऱ्याच्या घरी!

तसा भेदभाव अगदी सूक्ष्म असायचा, पण मला  जाणवायचा तो बऱ्याचदा. थोडासा अंगवळणी पण पडल्यासारखा झाला होता, पण जसजशी मोठी होत गेले, कक्षा रुंदावायला लागल्या, तसतशा मी आव्हान द्यायला लागले याला, पण आईची जित्याची खोड काही जाईना!

आजचा पराठ्याचा प्रसंग म्हणजे पण तसा सूक्ष्मच, पण माझ्या जिव्हारी लागलेला. बंड करायची प्रेरणा देणारा! मी तिरिमिरीत आईला म्हणाले, “अगं, माझी सख्खी आई आहेस का सावत्र, असा प्रश्न पडतो मला कधीकधी. का असं वागतेस तू?”

“अगं, तुम्ही दोघेही मला सारखेच. काय एवढं मनावर घेतेस? आणि अगदी किंचित तर जळलेत ते, एवढं काय त्यात?”

“आई, किंचित का जास्त हा प्रश्नच नाही मुळी, मी आवडीने खाईन ते, पण कीव तुझ्या वृत्तीची येतेय. स्वतः एक स्त्री असून, अशी वागणूक का मला? खटकतंय ते!”

हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्…

पाणी तरळलं डोळ्यात माझ्या आणि “नको तुझा डबा मला, मी खाईन ऑफिसमध्ये काहीतरी,” म्हणत मी  लॅपटॉपची बॅग उचलून निघायच्या तयारीला लागले.

हे सगळं बघत आणि ऐकत असलेले बाबा म्हणाले, “थांब, अशी जाऊ नकोस तू डबा न घेता. अपमान आहे अन्नाचा तो.”

“काय करू मग बाबा? हे असे भेदभावात लडबडलेले पराठे घेऊन जाऊ ऑफिसला? कसे उतरतील ते घशाखाली माझ्या? त्यापेक्षा नकोच ते… हिची वृत्ती सुधारत नाही, तोपर्यंत मी डबा नेणारच नाही.”

बाबा म्हणाले, “मान्य आहे, पण बस दोन मिनिटं. आपण काढू तोडगा यावर.”

असं म्हणत म्हणत, त्यांनी दोन्ही डबे उघडले. माझ्या डब्यातला एक जळका पराठा काढून तो दादाच्या डब्यात ठेवला आणि त्याच्या डब्यातला एक चांगला पराठा काढून तो माझ्या डब्यात ठेवला.

छोटीशी कृती, पण मन जिंकून गेली माझं.

जळजळीत नजरेनं आईकडे बघत मी म्हणाले, “हे अपेक्षित होतं तुझ्याकडून. एवढं केलं असतंस ना, तरी भरून पावले असते मी.”

मान खाली गेली आईची. कळली असावी बहुतेक तिची चूक तिला.

“बाबा, तुम्ही म्हणताय म्हणून नेतेय मी डबा, पण हिची वृत्ती जोवर बदलत नाही, तोवर हा सल कायम राहील माझ्या मनात, एवढंच.”

मुकाट्याने डबा पिशवीत ठेवला आणि मुलगी म्हणून का जन्माला आले? याचा विचार करत जिना उतरायला लागले… अनेक अनुत्तरित प्रश्न मनात घेऊन!

मोबाइल – 9323277620


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!