पराग गोडबोले
अशीच एक सुट्टी होती, आळसावलेली, रविवारसारखीच… बायकोच्या बहिणींचा ठाण्यात भेटायचा बेत ठरला होता, त्यामुळे स्वारी लगबगीत होती. आज ‘खानपान सेवा’ बंद राहील, अशी घोषणा करून, आवरून सावरून ती ठाण्याला जायला निघाली… मी आणि लेक उरलो घरात, दंगा घालायला!
नेहमीच्या, तोंडपाठ झालेल्या सूचनांचा भडिमार झालाच निघताना आणि आम्ही डोळे मिचकावले एकमेकांकडे पाहून… ती एकदाची बाहेर पडल्यावर, आम्ही नि:श्वास सोडला सुटकेचा आणि तंगड्या पसरून बसलो. लेक आधीच म्हणाली होती, “बाबा, खानपान सेवा सुरूच राहील, नका काळजी करू तुम्ही… मै हूं ना!”
पण न्याहारीला मॉडर्न कॅफेमधून इडली सांबार मागवलं गेलं… आणि हीच का खानपान सेवा? अशी शंकेची पाल चुकचुकली मनात. भल्यामोठ्या इडल्या आणि त्याबरोबर चटणी सांबार खाऊन तृप्त झालो. आता एक दीड वाजेपर्यंत पोटाची तमा बाळगायची गरज नव्हती…
शिरस्त्याप्रमाणे, चहा मी केला परत एकदा आणि मग आम्ही निवांत झालो. ती तिच्या खोलीत आणि मी वाचनात गुंग झालो. मुख्य म्हणजे, आज ‘आंघोळ करा’, हा घोषा नव्हता. सगळं अगदी निवांत आणि सुशेगात सुरू होतं… आळोखेपिळोखे देत!
हेही वाचा – सुख म्हणजे नक्की काय असतं?
होता होता बारा-साडेबारा होत आले. कंटाळ्याचा देखील कंटाळा येऊ लागला आणि तेवढ्यात फोन वाजला… बायकोचाच होता.
“काय चाललंय?” हा परवलीचा प्रश्न असतो, फोन घेतल्यावर.
“काही नाही, निवांत आहे. इडली अंगावर आलीय.”
“मागवलंच ना बाहेरून? तुम्हाला काय, संधीच शोधत असता…” वगैरे वगैरे झालं आणि प्रश्न आला, “जेवायचा काय बेत आहे? का ते पण फोनवरून येणारंय?”
“नाही बहुतेक, ती काहीतरी करणार आहे म्हणे…”
“कालच्या पोळ्या उरल्यात रे चार, वाया जातील त्या आता. निदान फोपो (म्हणजे फोडणीची पोळी) तरी करायची ना!” मेहनतीने केलेल्या पोळ्या, शिळ्या असल्या तरी, वाया जाण्याचं कोण दुःख तिला!
“तिला दे फोन जरा, चांगली तासडते.”
बापरे, युद्धाचे ढग घोंगावू लागले… पण लेक नेमकी आंघोळीला गेली असल्याने बांका प्रसंग टळला. तिचं आवरल्यावर. तिला पोळ्यांचं सांगितलं आणि आईची चुटपूट पण सांगितली…
आत जाऊन नक्की किती पोळ्या आहेत, ते बघितलं आणि म्हणाली, “फोपो काय घेऊन बसलायत बाबा, नवं काहीतरी, वेगळं करून घालते तुम्हाला आज!”
आईचा हात डोक्यावर असल्याने, काहीतरी भन्नाट खायला मिळणार याची खात्रीच पटली माझी.
नेहमीप्रमाणेच, ‘तुम्ही बाहेर जाऊन बसा. झालं की सांगते मी, उगाचच लुडबूड करू नका इथे,’ अशी प्रेमळ तंबी मिळाली आणि मी निवांत होऊन आंघोळीला पळालो, साडेबारा नंतर!! Can you imagine?
माझी आंघोळ होता होता, कुकरच्या शिट्ट्या वाजल्या आणि आमचा आधुनिक खानसामा तयारीला लागल्याची वर्दी मिळाली. टोमॅटो, भोपळी मिरची, चीज, अमूल लोणी वगैरे साहित्य फ्रीजमधून बाहेर पडलं… कांदे आले टोपलीतून, त्यांची चिराचिरी झाली आणि “बाबा हे बटाटे सोलून द्या जरा” अशी आज्ञा आली. मी आनंदाने दिले सोलून, अगदी, हात भाजत असून सुद्धा!
तिला म्हणालो, “मी फक्त उभा राहतो, हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन. एक अक्षर बोलणार नाही, पण मला बघू दे तू नक्की काय करतेयस ते.”
Permission granted, आणि मी खुश!
कढल्यात बटाटे आणि इतर सामुग्री एकजीव होऊन, मस्त सुगंध उधळायला लागले आणि मी कासावीस नुसता! एकीकडे, तव्यावर कालच्या शिळ्या पोळ्या भरपूर लोणी घालून खरपूस भाजल्या जाऊ लागल्या… मग शिजलेलं सारण तव्यावरच्या पोळीवर चोपडलं गेलं… मसाला डोश्याला सारण लावतात तसंच… पण भरपूर.
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
खरपूस भाजलेली पोळी, त्यावर बटाट्याचं सारण, किसलेलं चीज, सॉस वगैरे घालून त्याची मस्त गुंडाळी केली तिने तव्यावरच आणि अगदी सराईतपणे ताटलीत काढली. मी लगेच सरसावलोच…
“थांबा हो बाबा, किती घाई, त्याचे तुकडे करायचे आहेत अजून,” म्हणत सुरीने त्या रोलचे दोन तुकडे केले.
“घ्या, घरगुती व्हेज फ्रँकी by your super chef… पाठवा फोटो आईला, बघा काय म्हणतेय ते!”
पटकन फोटो काढला आणि दिला पाठवून. सॉसला लावून, पहिला घास तोंडात टाकतोय, तोवर फोन वाजलाच!
“काय आहे हे?”
मी म्हणालो “कोंड्याचा मांडा आहे, लेकीने भाजलेला… बापासाठी खास! फ्रँकी म्हणत्यात म्हणे!”
“किती छान दिसतंय, चवीला कसं आहे?”
“अप्रतिम, हा एकच शब्द पुरेसा आहे वर्णन करायला!”
माझ्या स्वरात लेकीचं कौतुक अगदी ओसंडून वाहात होतं. का नसावं? बायकोच्या शिळ्या पोळ्यांची व्यथा तिने चुटकीसरशी सोडवली होती, साध्या फोपो ऐवजी वेगळंच, फर्मास, काहीतरी रांधून! हा कोंडयाचा मांडा मनात घोळवतच, मग मी वामकुक्षीच्या मार्गाला लागलो…
अशी ही शिळ्या पोळ्यांची, साठा उत्तरांची कहाणी, सुफळ संपूर्ण झाली, ध्यानीमनी नसताना, अवचितच अगदी!


