मागील काही भागांत आपण वेगवेगळ्या ऋतू आणि त्यातील आपले योग्य राहणीमान याची माहिती घेतली. त्याचबरोबर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे आपले आचरण कसे असावे, याबाबत ऋषिमुनींनी सखोल मार्गदर्शन केले आहे. यालाच ‘दिनचर्या’ असे म्हणतात.
प्रातरुत्थन म्हणजे सकाळी उठणे
ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठेत्स्वस्थो रक्षार्थमायुषः ||तत्र सर्वार्थ शांत्यार्थम् स्मरेच्च मधुसूदनम्”||
निरोगी व्यक्तीने आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी ब्राह्म मुहूर्तावर उठावे, असे अष्टांग हृदय नावाच्या ग्रंथात सांगितले आहे.
रात्रेश्चतुर्दशो मुहूत्तो ब्राह्मो मुहूर्त:।।
रात्रीचा 14वा मुहूर्त म्हणजेच शेवटचा प्रहर.
1 मुहूर्त = 48 मिनिटे. ब्रह्म मुहूर्त सूर्योदयाच्या अगदी दोन मुहूर्त आधी सुरू होतो; म्हणजेच तो सूर्योदयाच्या 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो आणि त्याच्या 48 मिनिटे आधी संपतो. आपल्याला माहिती आहे की, सूर्योदयाची वेळ ऋतू आणि भौगोलिक स्थानांनुसार बदलते आणि म्हणूनच ब्रह्म मुहूर्त देखील त्यानुसार बदलतो.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ योग अँड अलाइड सायन्सेसनुसार, सूर्योदयापूर्वी वातावरणात ऑक्सिजनचे (Nascent Oxygen) प्रमाण जास्त असते. हा ऑक्सिजन (Nascent oxygen) सहजपणे हिमोग्लोबिनमध्ये मिसळतो आणि ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतो, ज्यामुळे आपली –
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- ऊर्जा पातळी वाढते.
- रक्ताच्या pH चे संतुलन राखण्यास मदत होते.
- वेदना कमी होतात.
- खनिजे आणि जीवनसत्वे यांचे शरीरात होणारे शोषण वाढते.
पहाटे केलेल्या ध्यान आणि योगामुळे मानसिक आरोग्य वाढते आणि त्याचबरोबर शरीरातील कॉर्टिसोलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. सकाळच्या दिनचर्येमुळे शरीरातील डोपामाइनची पातळी वाढते, ज्यामुळे सकारात्मक भावना आणि प्रेरणा वाढते.
पण सर्वांनीच ब्रम्ह मुहूर्तावर उठणे योग्य नाही. ब्रह्म मुहूर्तावर कोणी उठू नये?
अष्टांग हृदयानुसार, ब्रह्म मुहूर्तावर फक्त निरोगी व्यक्तीनेच उठावे. हा ग्रंथ काही लोकांना ब्रह्म मुहूर्तावर उठण्याविरुद्ध सल्ला देतो. गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध लोक, कोणत्याही शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त लोक यांनी शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठू नये.
दंतधावन
शरीरचिन्तांवर्त्य कृतशौचविदस्ततः अर्कन्यग्रोधखदिरकरञ्जककुभादिजम् प्रातर्भुक्त्वा च मृद्वग्रं कषायकटुतिक्तकम् कनीन्यग्रंथसंस्थौल्यं प्रपद्वादशांगुल्सन भक्ष्येण दवक्ष्य, दंतवन्यग्रंथ दृश्यं प्रपद्वादशागुलसंरक्षण ||
उठल्यावर मलमूत्र आदी विधी आटोपून नंतर खालील औषधी वनस्पतींच्या डहाळ्यांनी दात स्वच्छ करावेत.
- अर्क (Calotropis Procera)
- न्यग्रोध (Ficus benghalensis)
- खदीर (Acacia catechu),
- करंज (Pongamia pinnata)
- अर्जुन (Terminalia arjuna)
डहाळीची जाडी अंदाजे करंगळीच्या टोकाएवढी असावी. डहाळीचे टोक थोडेसे चावून ते ब्रशसारखे बनवावे. हिरड्यांना इजा न होता दात स्वच्छ करावेत.
याच वनस्पतींची काटकी का वापरण्यास सांगितली आहे?
या वनस्पती मुखाचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
- बॅक्टेरियाविरोधी क्रिया : या वनस्पतींच्या सालीमध्ये टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक असतात जे तोंडातील जंतू नष्ट करण्यास मदत करतात आणि बॅक्टेरियाची वाढ रोखतात. त्यामुळे प्लाक (दातांवर जमा होणारा पिवळा चिकट पदार्थ) जमा होत नाही आणि दंतक्षय रोखला जातो.
- अॅस्ट्रिंजंट प्रभाव : त्यांच्या सालीतील गुणधर्म हिरड्यांच्या पेशींना घट्ट आणि मजबूत करण्यास मदत करतात. हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव कमी करतात.
- दाहविरोधी आणि जखमा बरे करणे : सालीमधील रस तोंडातील जळजळ कमी करतो. हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यास मदत करतो आणि तोंडातील फोड (mouth ulcers) बरे करण्यास मदत करतो.
- स्वच्छता आणि लाळ : तंतूमय फांद्या (भारतात या दातून म्हणून ओळखल्या जातात) चघळल्याने दात स्वच्छ होतात आणि हिरड्यांना मालिश होते, ज्यामुळे रक्त संचरण सुधारते. चघळण्याची क्रिया, लाळ स्राव देखील उत्तेजित करते, लाळ तोंडाच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे, तसेच पचनास आवश्यक आहे.
- नैसर्गिक आणि रसायनमुक्त : या पारंपरिक पद्धती व्यावसायिक टूथपेस्ट आणि माऊथवॉशसाठी एक नैसर्गिक, पर्यावरणपूरक आणि केमिकलविरहित पर्याय आहेत.
दंतधावन निषेध – कोणी दात घासू नयेत?
नाध्यादजीर्णवमथुश्वासकासज्वरार्दिती तृष्णास्यपाकहृन्नेत्रशिरः कर्णमयी च तत् ॥
ज्या लोकांना खालील आजार आहेत, त्यांनी या वनस्पतींचा वापर करून दात घासणे टाळावे –
- अजीर्ण /अपचन
- उलट्या होणे
- ताप, श्वास / श्वासोच्छ्वासास अडथळा वाटणे.
- अर्दित / चेहऱ्याचा पक्षाघात (facial paralysis)
- तृष्णा / जास्त तहान लागणे
- अस्यपाक / तोंडात व्रण येणे (mouth ulcer)
- हृदयरोग (Heart diseases)·
- नेत्रशिर: कर्णमयी / डोळे, डोके आणि कानांचे रोग (ENT diseases).
- नवन आणि गंडुष करणे : त्यानंतर निरोगी व्यक्तीला नवन वा नास्य म्हणजे नाकातून औषध घालणे आणि गंडुष वा तोंडाने गुळण्या करणे या क्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.
व्यायाम
मुखशुद्धी झाल्यावर शरीराच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे म्हणजे व्यायाम.
व्यायाम लाघवं कर्मसमर्थं दीप्तोऽग्नि: मेदस: क्षय: विभक्तघनगात्रत्वं व्यायामात् उपजायते ||
व्यायामामुळे शरीराला हलकेपणा येतो, काम करण्याची क्षमता सुधारते, पचनशक्ती वाढते, अतिरिक्त चरबी जाळते.
नियमितपणे व्यायाम कोणी करावा याविषयी ऋषी सांगतात –
अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभि: स्निग्धभोजिभि: शीतकाले वसतिने ||
पूर्ण शक्ती असलेल्या व्यक्ती तसेच जे दररोज चरबीयुक्त अन्न (Foods containing more Fats & Carbohydrates) घेतात त्या व्यक्तींनी, थंड हंगामात, वसंत ऋतूत व्यायाम केला पाहिजे. पण सर्वांनीच व्यायाम करू नये.
वातपित्तामयो बालो वृद्धोऽजीर्णी च तं त्यजेत् ||
वात आणि पित्ताचे आजार असणारे, लहान मुले, वृद्ध, पचनाची समस्या असणारे लोक यांनी व्यायाम टाळावा.
उगाचच शरीराच्या ताकदी बाहेर जाऊन व्यायाम करणे हानिकारक ठरू शकते. अतिव्यायामाचे प्रतिकूल परिणाम :
तृष्णा क्षयः प्रतमकोप्यः काव्यं रक्त ज्वरशर्दिश्च जायते ||
जास्त तहान लागणे, तीव्र श्वास लागणे (डिस्पनिया – श्वास घेण्यात अडचण), रक्तस्त्राव होणे, कोणतेही जास्त काम न करता थकवा – दुर्बलतेची भावना जाणवणे , खोकला, ताप आणि उलट्या होणे हे विकार होऊ शकतात.
तं कृत्वाऽनुसुखं देहं मर्दयेत् श्रमेत् च समन्त: ||
व्यायामाच्या शेवटी शरीराच्या सर्व भागांना मसाज करणे आवश्यक आहे.
अभ्यंग – तेलाने मसाज करणे. तेलाने मालिश विशेषतः कान, डोके आणि पायांवर करावे.
अभ्यंगं आचरेत नित्यं, स जरा श्रमवाताहा. दृष्टिप्रसाद आयुश्य: स्वप्नसुत्वकत्वदाऱ्यकृत शिर: श्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् । वर्ज्योऽभ्यंग: कफग्रस्तकृतसंशुद्धि अजीर्णिभि: ॥
अभ्यंग म्हणजे तेलाने दररोज मालिश करावे. यामुळे अतिश्रमामुळे आलेला थकवा, अंगदुखी कमी होते. दृष्टी सुधारते, शरीराच्या पेशींचे पोषण होते, चांगली झोप लागते, त्वचेचा रंग सुधारतो. त्यामुळे माणसाचे वय आहे त्यापेक्षा कमी दिसू लागते.
मालिश कधी टाळावे?
जेव्हा शरीरात कफ वाढलेला असतो, ज्यांनी शोधन (शुद्धीकरण उपचार) केले आहे आणि ज्यांना अपचनाचा त्रास आहे, त्यांनी मालिश करू नये.
उद्वर्तन – पावडर / उटणे लावून मसाज.
उद्वर्तनं कफहरं मेदस: प्रविलायनम् । स्थिरीकरणं अङ्गानां त्वक्प्रसादकरं परम् ॥
उटणे वा औषधी वनस्पतींची पावडर वापरून मसाज करणे म्हणजे उद्वर्तन. हे केल्याने शरीरातील कफ कमी होतो, चरबी जाळण्यास मदत होते, ताकद आणि त्वचेचा रंग सुधारतो. उद्वर्तन झाल्यावर स्नान करावे.
स्नान आणि त्यानंतरच्या आचरणाविषयीची माहिती आपण पुढील भागात घेऊ.
(क्रमश:)


