Friday, February 6, 2026

banner 468x60

Homeललितनासका आंबा… दादाच्या पत्राबद्दलची उत्सुकता आणखी वाढली!

नासका आंबा… दादाच्या पत्राबद्दलची उत्सुकता आणखी वाढली!

भाग – 3

आबांना आज रोहनची काय ओळख करून द्यायची, हाच विचार उठल्या उठल्या माझ्या मनात आला. तोंड धुऊन मी सहजच रोहनच्या खोलीत डोकावले तर, तो खोलीत नव्हता म्हणून मग मी स्वयंपाकघरात डोकावले. मला तिथे बघून माई म्हणाली, “रोहन कधीचाच उठला आहे. वाडीत जाऊन येतो म्हणाला मला. बघ तिथेच भेटेल तुला. पण जायच्या आधी चहा तेवढा घेऊन जा.” चहा मी घाईघाईत प्यायलो आणि वाडीत जायला निघालो. आंब्याच्या शेडकडे जात असताना वाटेतच एक कामगार मला भेटला. तो मला म्हणाल, “दादानुं तो पाव्हणा कोण आलाय? सगळी चौकशी करत होता आंब्याच्या कलमाची.”

“कुठे आहे तो?” मी विचारले.

“तिथे विहिरीजवळ बसला होता मघाशी… आबांबरोबर गप्पा मारत!”

हे ऐकताच मला धक्का बसला. रोहनने त्याची काय ओळख करून दिली असेल, आबांना या विचाराने मी घाबरलो. त्याच नादात मी झपझप पावले टाकीत निघालो आणि समोरचे दृश्य बघून आश्चर्यचकित झालो…

समोर आबा आणि रोहन चक्क गप्पा मारत बसले होते. मला बघून आबा म्हणाले, “गणेश ये. तू सुद्धा ऐक व्यवसायाच्या नवीन नवीन कल्पना याच्याकडून…”

माझ्या चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह आबांनी बरोबर ओळखले. ते मला म्हणाले, “रोहनने त्याची ओळख करून दिली आहे मला. त्या विषयावर रात्री बोलू आपण. आता कामाला लाग तू…”

मी शांतपणे आंब्याच्या शेडकडे जायला निघालो. पण मनात विचार आलाच की, ‘ही वादळापूर्वीची शांतता नसेल ना?’

माझ्याबरोबर रोहन देखील उठला. माझ्याबरोबर चालताना तो मला म्हणाला, “काका, अरे सकाळी उठल्या उठल्या आबांना माझ्या खोलीत पाहून मला धक्काच बसला. मी बेडवरून खाली उतरून त्यांना वाकून नमस्कार केला. मला त्यांनी विचारली माझी ओळख. नाईलाजाने मला खरं काय ते सांगून टाकावे लागले!”

हेही वाचा – नासका आंबा… अन् दादानं पहाटेच घर सोडलं!

“आबांची प्रतिक्रिया काय होती त्यावर,” मी उत्सुकतेने विचारले.

“ते लगेच खोलीतील खुर्चीवर जाऊन बसले. डोकं भिंतीला टेकून डोळे मिटून घेतले त्यांनी… पुढे काही वेळ असाच गेला. त्यांना एकदम घाम आला. मी घाबरून त्यांच्याजवळ गेलो. त्यांना हाताने जागं करून विचारलं की, ‘तुम्हाला काही होतंय का?’ त्यावर त्यांनी पुढे होऊन माझा हात पकडला आणि मला विचारले, ‘रोहन, माझा विनायक कसा आहे, ते आधी सांग मला. तुला खरं नाही वाटणार. पण काल रात्री तो माझ्या स्वप्नात आला होता आणि म्हणाला देखील की, आबा मला माफ करा.’ मी काही बोलण्याच्या आतच मला जाग आली. काल तुला बघून मला थोडी शंका आली होती. त्या शंकेचा आणि कालच्या स्वप्नाचा काही संबंध तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी मी आज सकाळी सकाळीच तुझ्या खोलीत आपणहून आलो. सांग ना माझा विनायक कसा आहे?”

“मग तू खरं काय ते सांगितलंस आबांना?” मी भीतभीतच रोहनला विचारले.

“हो. मला सांगावेच लागले. पण अशा पद्धतीने ते सत्य आबांच्या समोर यावं, हे मला खरंच आवडले नाही. ते ऐकून आबांनी मला जवळ घेऊन गच्च मिठी मारली आणि म्हणाले, मी फार उशीर केला रे विनायकाला माफ करण्यात. पण त्यावेळी तो तसाच वागला होता. इतका हुशार मुलगा असा एकाएकी कसा वाहवत गेला, हे समजण्याच्या पलीकडचे होते. त्याचे दहावीतच सिगारेट पिण्याचे मला कळले होते. पण मोहाच्या क्षणी कधी कधी पाय घसरतो तरुण मुलांचा, हे लक्षात ठेऊन मी त्याला रागावलो नाही. उलट या सगळ्या गोष्टीचा त्याच्या अभ्यासावर आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यावर विपरीत परिणाम होईल, हे मी त्याला शांतपणे समजावून सांगितले. तोही जे समजायचे ते समजून गेला, असं मला वाटले. कारण दोन वर्षांनी झालेल्या बारावीच्या परीक्षेत त्याने चांगले मार्क्स मिळवले होते. पुढे कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात त्याने हा गोंधळ घातला. त्यामुळे आपली गावातील प्रतिष्ठा पार धुळीला मिळणार होती. माझा नाईलाज झाला तेव्हा! विनायकाच्या लग्नाला परवानगी दिली असती तर, पिढीजात घरात चालत आलेल्या रूढी आणि परंपरांना मूठमाती मिळणार होती. शिवाय, गावात लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले असते ते वेगळेच… कदाचित गावाने आपल्याला वाळीत टाकले असते. तसं झालं असतं तर जगणं देखील मुश्किल होऊन बसले असते सगळ्यांचेच. त्यावेळी मी जो निर्णय घेतला होता, तो त्या परिस्थितीत योग्यच होता, असं मला आजही वाटते. असो. तू आता आला आहेस तर, रहा इथेच तुला हवे तितके दिवस… असं म्हणत ते माझ्या खोलीतून डोळे पुसत बाहेर पडले.”

रोहनने जे सांगितले, ते ऐकून मी सुटकेचा नि:श्वास सोडला. मला जे काम कठीण वाटत होते ते आबांनीच केले होते. आता फक्त प्रश्न उरला होता, दादाने रोहनजवळ दिलेल्या पत्राचा! ज्याचा उल्लेख दादाने मला लिहिलेल्या पत्रात केला होता. त्यात नेमके काय लिहिलेले असेल, याची उत्सुकता मला लागून राहिली होती.

बोलता बोलता आम्ही दोघे आंब्याच्या शेड जवळ आलो. “तू काम बघायला थांबतोस की, घरी जातोस?” मी रोहनला विचारले.

“काका, मी माझ्या खोलीत जातो. थोडे काम पण आहे उरकायचे… तिथल्या बिझनेसचे! दोन दिवसांच्या मेल्स पण मला चेक करून उत्तर द्यायची आहेत. आपण दुपारच्या जेवणाला भेटूयात. जेवण झाल्यावर मी जरा जवळपास फिरून येणार आहे. बाबांच्या काही आठवणीच्या जागा आहेत, तिथे जाऊन शांतपणे बसायचं आहे मला… त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मनात आणून.”

हेही वाचा – नासका आंबा… रोहन घरी आला अन् त्याने धक्कादायक बातमी दिली!

“ठीक आहे,” असे म्हणून मी शेडमध्ये गेलो कामाला आणि रोहन परत फिरला घराकडे.


आमची रात्रीची जेवणं सुरू होती. आबा ताटावरून उठून हात धुण्यासाठी जायला निघाले इतक्यात रोहनने त्यांना हाक मारली. आबांनी मागे वळून बघितले. रोहन त्यांना म्हणाला की, “आबा थोडं बोलायचे आहे. सगळ्यांची जेवणं झाल्यावर दिवाणखान्यात बसूया का सगळ्यांनी थोडा वेळ?”

“ठीक आहे. माईला सांग तसं. सगळ्यांचे आवरून झाले की, मला बोलावं. तोवर मी माझ्या खोलीत जातो.”

“माई तू ऐकलंस ना आबा काय म्हणाले ते?” रोहनने माईला विचारले.

“हो. माझा सगळं आवरून झाले की, तू बोलव आबांना. सुनंदा तू पण बैस हो आमच्यासोबत…” माई म्हणाली. सुनंदा म्हणजे माझी बायको. दादाच्या जाण्याने आमच्या घराला आलेली अवकळा सुनंदाने आमच्या लग्नानंतर एक दोन वर्षांतच दूर केली. दादाच्या आठवणीने माई दिवस-रात्र रडायची आबांच्या नकळत! तेव्हा कित्येक वेळा सुनंदा माईची आई होऊन वागली आहे तिच्याबरोबर… आमच्या दुर्दैवाने आम्हाला मुलबाळ झाले नाही, पण म्हणून का होईना, पण माईची आई होण्यात सुनंदा कधीच कमी पडली नाही. दादा गेल्यानंतर सुनंदाच्या येण्याने आमच्या चार माणसांच्या घराला पाचवा कोन मिळाला होता. पण तरीही या घराला बोबडे बोल कधी ऐकायलाच मिळाले नाहीत. इवली इवली पावलं या घरात कधी चालली नाहीत. बारसं, जावळ, बोरनाळ, वाढदिवस… असं काही झालंच नाही या घरात! माई-आबांच्या बाबतीत नातवंडांची भूक कधीच भागली गेली नाही. त्यामुळेच रोहनला बघता क्षणी आणि त्याने त्याची ओळख सांगितल्यावर आबांच्या मनात त्याच भुकेने जबरदस्त उसळी मारली असणार. म्हणूनच दादावरचा राग आबा रोहनवर किंचित देखील काढू शकले नसावेत! नाही म्हणायला नातवंडांची भूक काही अंशी दूर केली आमच्या कुसुमने. कधी काळी तीन-चार वर्षांनी कुसूम तिच्या मुलाला घेऊन माहेरी यायची तेव्हा फक्त आबा आणि माईंच्या चेहऱ्यावर आनंदाचं इंद्रधनुष्य अवतरायचं…

रोहनचे व्यक्तिमत्व खरोखरच भुरळ पाडणारे आहे, हे आम्ही चौघांनी गेल्या काही दिवसांतच ओळखले होते. शिवाय तो परदेशी राहून देखील मराठी खूप चांगलं बोलायचा. मी त्याबाबत छेडले असता तो म्हणाला होता की, बाबाने त्याला मुद्दामच ही भाषा शिकवली. शिवाय, त्याच्या शाळेत आणि घराच्या आजूबाजूला पुष्कळ मराठी कुटुंब होती. त्यामुळे हीच भाषा कायम बोलली गेली. या घरात तो अगदी सराईतासारखा वावरत होता. जणूकाही या आधी इथे तो काही दिवस राहून गेला होता. या घराबद्दल, या मातीबद्दल आणि आमच्या वाडीबद्दल त्याच्या एकूणच भावना खूप तीव्र होत्या. शेवटी त्याची आई जरी परदेशी असली तरी दादाचं रक्त त्याच्या नसानसांत वाहत असणार एवढं नक्की! 

आम्ही सगळे दिवाणखान्यात बसलो होतो. एकूणच, रोहन दादाचे पत्र बहुदा आबांना वाचून दाखवेल, असं मला वाटलं. रोहन एक पिशवी घेऊन आला आणि आबांजवळ जाऊन बसला. त्याने बोलायला सुरुवात केली…

“आबा, माई खरंतर यात ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला द्यायला खूप उशीर झाला आहे. पण तरी देखील बाबाची इच्छा होती की, त्याची आठवण म्हणून या गोष्टी मी तुमच्या हाती द्याव्यात.” असं म्हणून रोहनने पिशवीतून दादाचे जुने फोटो, आबांनी दिलेले घड्याळ, फाऊंटन पेन, सोन्याची चेन वगैरे गोष्टी माईच्या हातात दिल्या…

“बाबा आजारी असताना एक दिवस मला म्हणाला होता, त्याच्या कपाटातील लॉकरमध्ये एक कापडी पिशवी ठेवली आहे. मी ती पिशवी बाबाच्या हातात आणून दिली. त्यातून त्याने एकेक करत या गोष्टी काढल्या आणि प्रत्येक गोष्टीची आठवण मला सांगितली. दहावीच्या परीक्षेसाठी आबांनी मुद्दाम काही महिने आधी घेतलेले फाऊंटनपेन… त्या पेनने पेपर लिहायचा त्याने केलेला सराव… दरवेळी त्याला आबांनी केलेली सोबत… रात्री जागून केलेला अभ्यास…  माईची रात्रीची सोबत… डोळे पेंगुळले की माई कॉफी करून द्यायची! बाबा म्हणायचा की, तो कितीतरी वेळा माईला आग्रह करायचा झोपायला जायला. पण माई कधी गेली नाही, मला खोलीत एकटं ठेऊन. बाबाने ठरवून खूप मेहनत घेऊन अभ्यास केला होता आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला होता, जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक निकाल घेऊन घरी आले, तेव्हा संबंध आळीत आनंदाचे वातावरण होते. बाबा जिल्ह्यात पहिल्या नंबराने पास झाला होता. दिवस खरे होते पावसाळ्याचे, पण आबांनी दिवाळी साजरी केली होती तेव्हा! ए माई, बाबाचा निकाल ऐकून तू आनंदाने त्याला मिठी मारून पोटाशी घट्ट धरून ठेवले होतेस तो प्रसंग सांगताना बाबा ढसाढसा रडला होता आणि म्हणाला की, आबा-माईच्या सगळ्या श्रमांची भरपाई म्हणून होता माझा तो निकाल! आबा,  बाबा कॉलेजला जाणार म्हणून तुम्ही त्याला घड्याळ आणून दिले होते. तेव्हा तुम्ही बाबाला सांगितलेली गोष्ट बाबाने मला सांगितली. तुम्ही म्हणाला होता त्याला की, ‘या घड्याळासारखा प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करायला शिक. वेळेचे महत्त्व काय ते तुला हे घड्याळ शिकवेल आणि ती गोष्ट तुला आयुष्यभर उपयोगी पडेल. पण वेळ न बघता एखादी गोष्ट तू केलीस तर, त्याचा त्रास होणार हे निश्चित! योग्य वेळी चुकीची गोष्ट करणे आणि चुकीच्या वेळी एखादी गोष्ट योग्य आहे, असे समजून करणे… हे दोन्ही तुला त्रास देणारे ठरेल आयुष्यात. त्यामुळे योग्य गोष्ट योग्य वेळीच व्हायला पाहिजे, हे तू कायम लक्षात ठेव.’ पण हीच गोष्ट बाबा विसरला जेव्हा त्याने माझ्या आईशी लग्न करण्याची गोष्ट तुमच्याजवळ काढली आणि तो तुमचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी त्याने तुमचा सल्ला धुडकावून ग्रँडपा बरोबर जाण्यासाठी त्याच्या मनाची तयारी केली.”

“तुम्ही त्याला घराबाहेर काढलं, हे त्याच्यासाठी अपेक्षित होते… कारण तो माझ्या आईच्या प्रेमात बुडाला होता. पण तेव्हा ग्रँडपाच्या मनात काय चालले होते, त्याची कल्पना बाबाला नव्हती… तिथेच बाबा फसला आणि ग्रँडपाच्या जाळ्यात अलगद अडकला. आबा, तुम्ही बाबाला घर सोडून जायला सांगितल्यावर तो त्याचे सामान घेऊन ग्रँडपाच्या हॉटेलवर आला कायमचा राहायला. बाबाला असं आपल्या बरोबर ठेवणं धोक्याचे होते, याची ग्रँडपाला जाणीव झाली म्हणून त्यांनी माझ्या आईला, मावशीला, ग्रॅण्डमाला आणि बाबाला लगेचच बोटीने अमेरिकेला पाठवायची सोय केली, त्याला अजून एक महिना तरी रत्नागिरीमध्ये रहायला लागणार होते…”

“हे सगळं मला सांगताना बाबा खूप दमला होता. तेव्हा तो खूप हळवा झाला होता. माझा हात त्याच्या छातीजवळ धरून बाबा खूप रडला होता. मीच त्याचे डोळे पुसले होते. तेव्हा त्याने मला जवळ घेऊन माझ्याकडून एक वचन घेतले होते की, तो गेल्यावर लवकरात लवकर या गोष्टी मी तुमच्या हवाली करायच्या! माई- आबा, बाबाने जसे तुमचे वर्णन केले होते माझ्याजवळ अगदी तसेच आहेत तुम्ही दोघे. आता एक महत्त्वाची गोष्ट उरली आहे तुम्हाला देण्यासाठी…”

असं म्हणून रोहन काही बोलणार इतक्यात माईने मला आणि रोहनला खुणावून आबांकडे बघायला सांगितले. आबा त्यांच्या नेहेमीच्याच आराम खुर्चीत मागे रेलून बसले होते. पण त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अधून मधून ते डोळे पुसत होते. पण तरीही अश्रू यायचे थांबत नव्हते. इतक्यात आबांनी रोहनला पुढे बोलायचे थांबवले आणि ते म्हणाले, “आणखी काही असेल तर उद्या सांग. विनायकाच्या आठवणीने माझा जीव कासावीस झाला आहे. मी आणखी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मला हात धरून माझ्या खोलीत पोहोचवा.”

मी रोहनच्या मांडीवर हळूच थोपटून त्याला थांबायला सांगितले. रोहनने मघाशी पिशवीतून काढलेल्या वस्तू परत पिशवीत भरल्या आणि ती पिशवी त्याने माईच्या हातात दिली. मी आणि रोहनने मिळून आबांना आराम खुर्चीतून उभे केले आणि सावकाश पावले टाकीत त्यांना त्यांच्या खोलीत नेऊन पलंगावर बसवले.

आम्ही परत दिवाणखान्यात आलो. आबांची स्थिती होती तशीच स्थिती माईची देखील झाली होती. माईने रोहनने दिलेली कापडी पिशवी छातीशी गच्च ठरून ठेवली होती आणि ती मूकपणे अश्रू ढाळत होती…

“माई,” माझ्या हाकेने माई भानावर आली. पदराने डोळे पुसत ती तिच्या खोलीत जाण्यासाठी निघाली. “तुम्हीपण झोपा रे आता. बाकीचे काही उरलं असेल ते उद्या बघूया…”

रोहन त्याच्या खोलीत गेला… मी आणि सुनंदा आमच्या खोलीत.

काही करून मला झोप येत नव्हती. आज माझी उत्सुकता विनाकारण लांबणीवर पडली होती की, दादाने पत्रात नेमके काय लिहिले आहे त्याबद्दल! दादाचा विचार करत असताना केव्हा डोळा लागला ते माझे मलाच कळले नाही.

क्रमशः

सतीश बर्वे
सतीश बर्वे
वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!