स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकल्या आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहुयात
- डोशाचे पीठ वाटताना त्यात भेंड्याची बुडखे घालून वाटा. डोसे खुसखुशीत होतात. डोसे निर्लेप तव्यावर करा.
- डोसे करायचे असतील तेव्हा आदल्या दिवशी उडीदडाळ आणि तांदूळ भिजत घालते वेळी त्यातच चार वाट्या तांदळाला पाव वाटी विकतचा इडली रवा भिजत घालावा. मिश्रण वाटताना त्यात कांदा घालून वाटावे. डोसे करते वेळी निर्लेप तव्यावर प्रथम मिठाच्या पाण्याचा सपका मारून पीठ पातळ पसरावे. झाकण ठेवावे. नंतर झाकण काढून डोशावर तेल सोडावे. डोसा न उलटता सामोशासारखा त्रिकोणी आकार देऊन अथवा रोल करून खाली काढावा. हे डोसे बदामी रंगावर कुरकुरीत होतात. त्यावर तकाकी दिसते. 24 तास हे पीठ आंबविल्यास डोसे फारच छान (अगदी हॉटेल डोसे) होतात.
- पोहे भिजवून ठेवावेत. पाव किलो पोह्यांना पंचवीस ग्रॅम मैदा घालून तीळ, ओवा, तिखट, मीठ, हळट घालून दही घालून मळून घ्यावे. यात मोहन घालू नये. गरम तेलात चकल्या तळाव्यात. फारच स्वादिष्ट होतात.
- दहीवडे उत्तम आणि स्वादिष्ट होण्याकरिता अर्ध्या नारळाचे दूध काढून ते दहीवड्याच्या दह्यामध्ये मिसळावे. दूध काढलेला चोथा फेकून न देता वड्याच्या पिठात मिसळावा. त्यामुळे वड्यामध्ये जास्त तेल राहात नाही. वडे चांगले लागतात.
- ढोकळ्याचे पीठ भिजविल्यानंतर ते मिक्सरमध्ये लोण्याच्या ताकाची ब्लेड लावून त्यातून चांगले तीन, चार मिनिटे फेटून घ्यावे. मग त्यात डावभर तेल घालून नंतर आंबण्यास ठेवावे. ढोकळ्यात नेहमीपेक्षा सोडा कमी लागतो आणि ढोकळा बाजारच्या ढोकळ्याप्रमाणे एकदम स्पाँजी होतो.
- उप्पीट खमंग आणि चवदार होण्यासाठी पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडे आले आणि 3-4 पाकळ्या लसूण आणि पाव चमचा जिरे बारीक कुटून आणि अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घालाव्यात. म्हणजे चव खूपच छान येईल.
- दोन वाट्या हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी दूध, एक लहान चमचा तुरटीची पूड हे सर्व रात्री पाण्यात भिजत घालावे आणि सकाळी उपसून चाळणीवर ठेवावे. डाळ कोरडी करू नये. पाणी सगळे निथळले म्हणजे ती तेलात पोह्याच्या चाळणीने चांगली खरपूस तळावी. ती कागदावर टाकावी आणि त्यावर तिखट, मीठ, चवीला थोडी लिंबाची पावडर घालावी. ही खारी डाळ फारच कुरकुरीत लागते.
(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)


