नितीन फलटणकर
रात्रीचे दहा वाजले होते. आजही प्राजक्ताला ऑफिसवरून यायला उशीर झाला होता. दिवसभराचं काम करून माणूस किती थकून जातो, या विचारातच तिनं गाडीला किक् मारली अन् ती कधी ऑफिसवरून निघाली आणि कधी घर आलं हे तिलाच कळलं नाही. गाडीवर बसल्यानंतर तिचे फक्त डोळेच उघडे होते. मन मात्र कुठंतरी गुंतलं होतं. मनात सततचे विचार. कल्लोळ, गोंधळ, मनाचे अन् मेंदूचे द्वंद चाललेलं… डोळ्यांवर समोरच्या गाड्यांचा तीव्र प्रकाशही तिच्या मनात निर्माण झालेला अंध:कार दूर करू शकत नव्हता. तिला अभिव्यक्त व्हायचं होतं, मनमोकळं रडायचं होतं.
ती थकली होती, तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं. मन भरकटून हेलकावे खात होतं. तिने आपार्टमेंटमध्ये गाडी लावली. साइड स्टँड लावत ती तशीच फ्लॅटकडे निघाली. गाडीची चावी आपण काढलीच नाही, हे लिफ्टमध्ये शिरताना तिच्या लक्षात आलं… पुन्हा तशीच हताश होत ती पार्किंगकडे वळली. हेडलाइटही सुरूच होता.
तिने चावी लावत फ्लॅटचा दरवाजा उघडला. आत अंधार होता. तिच्या लक्षात नव्हतं आज सिद्धार्थ, तिची मुलगी अन्वाला घेऊन आईकडे गेलाय. सिद्धार्थ नाही म्हणजे आज स्वयंपाकाच्या उषा मावशीही आल्यापावली परतल्या असतील. बेडरूममध्ये जात तिने फोन गादीवर फेकून दिला. भूक तर लागली होती. पण मनातील द्वंदामुळे तिला घरी काही खायला मिळणार नाही, हे लक्षातच नव्हतं. तिच्या डोळ्यात अचानक थेंब दाटले. रिकाम्या पोटात आग असेल तर, मनावरची काजळी अधिक गडद होते आणि मनावर शिडकावा करण्यासाठी नकळत थेंब ओघळू लागतात.
ती फ्रिजकडे गेली. आदल्या दिवशीचे दोन ब्रेड तिला प्लास्टिकमध्ये पडलेले दिसले. तिने आतून पाण्याची बाटली काढली. ती ही अर्धीच भरलेली. सिद्धार्थची अक्कल काढत तिने फ्रिजचे दार जोरात आपटले आणि अर्धी भरलेली बाटली घेऊन ती पुन्हा बेडरूमकडे वळली.
मोबाइलची बॅटरी संपलेली नव्हती… हिच काय दिवसभरातील तिच्या समाधानाची बाब. तरी सवयीप्रमाणे तिने मोबाइल चार्जिंगला लावला. ती कधीच घरी आल्यावर शॉवर घेत नसे. पण का कुणास ठाऊक, तिला आज शॉवर घेण्याची इच्छा होत होती. घामामुळे अंगाला चिकटलेले सारे कपडे तिने अंगावेगळे केले. ती तशीच बाथरूमकडे वळली. जाताना तिने स्वत:चेच उघडे शरीर न्याहाळले. तिला जुने दिवस आठवले. तसे अचानक तिचे अंग शहारले. ती एकदम सावरली. तिने शॉवर सुरू केला. पाण्याचा मारा तिच्या शरीरावर झाला तसा तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यानंतर जशी वाफ अलगद स्वत:चं अस्तित्व सिद्ध करत आकाशाकडे झेपावते तसा अनुभव तिला आला. तिच्या ओल्या केसांतून पाणी निथळताना शरीर हलकं होत असल्याची जाणीव तिला होत होती. पुन्हा पुन्हा ती चेहऱ्यावर अन् पाठीवर शॉवर घेत होती. ती पाण्याशी आज इतकी समरस झाली होती की, पाण्यासारखं प्रवाहीपण आपल्यात कसं नाही, हा विचार तिच्या मनात येत होता.
हेही वाचा – भाषेची ‘शुद्धता’ जपली जावी!
तिला समजतंच नव्हतं आज असं काय झालंय? ती इतकी हताश का झालीय? सिद्धार्थशी आज बोलणंही झालं नाही. ऑफिसमध्येही बॉसची नेहमीची नाराजी वगळता इतर काहीच घडलेलं नाही. दिवस आला तसा गेला. उलट, आज तर ऑफिसमध्ये ती तासभर रोहित सोबत होती. रोहितचा विचार मनात आल्या आल्या तिला पुन्हा रडू कोसळलं.
रोहित तिचा चांगला मित्र. वर्षभरापासून ते दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. दोघांचं मधे थोडं कशावरून तरी बिनसलं होतं इतकंच. पण पुन्हा दोघे एकत्र काम करत होते. विचार करता करताच तसाच ओल्या अंगावर तिने टॉवेल गुंडाळला. बेडवर पडली. रोहितचं नाव आठवल्यानंतर शॉवर घेताना काय झालं होतं? या विचारानं तिला ग्रासलं.
तिला आपल्या या वागण्याचा धक्का बसला. तर्क-वितर्क आणि अर्थांचं वादळ तिच्या मनात पुन्हा घोंगावायला लागलं. तिने दीर्घ श्वास घेतला. लक्ष दुसरीकडं लागावं म्हणून तिने मोबाइल उचलला. नेट ऑन केल्या केल्या वाजलेल्या मेसेज टोनने घरातील शांततेचा भंग झाला. कोणताही आवाज सहन होणार नाही, अशी आपली आज अवस्था झाल्याचं तिच्या लक्षात आल्याने तिने फोन सायलंटवर केला. असंख्य मेसेजेस, असंख्य व्हॉट्स ॲप, दोन मिनिटे केवळ मेसेजेस पडत होते आणि तिचं ह्रदय त्याच वेगाने धडधडत होतं.
सिद्धार्थचेही मेसेज होते त्यात. ते पहाणं तिने टाळलं. त्याचा मिस कॉलही होता. रोहितविषयी आलेल्या विचारांमुळे सिद्धार्थला फोन करताना तिला अपराधीपणाचं वाटलं. तिने त्याच्या मिस कॉलला उत्तर दिले नाही. सिद्धार्थ आणि तिच्या लग्नाला आता 12 वर्षं झाली होती… लव्ह मॅरेज होतं. गोरागोमटा, डॅशिंग सिद्धार्थ तिला कॉलेजच्या पहिल्याच भेटीत आवडला होता. नंतर दोघांनीही एका आयटी कंपनीत काही दिवस सोबत कामही केलं होतं. तेव्हाच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता…. सिद्धार्थ नुकताच एका नव्या कंपनीत जॉइन झाला होता. त्याच्या जॉब प्रोफाईलविषयी दोघाचं फारसं बोलणंही झालं नव्हतं. दोघांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने ते फार क्वचित सोबत असत…
साऱ्या आठवणी बाजूला सारत पुन्हा ती मोबाइलमध्ये गुंग झाली. मोबाइलमध्ये तिला असंख्य मेसेज दिसत होते. यात तिला रोहितचाही मॅसेज दिसला. तिने तो पटकनं ओपन करून वाचला. कुठलासा फॉरर्वडेड मॅसेज होता तो. तो पाहिला तसा तिने लगेचच डिलीटही केला. हा काय मॅसेजंय…? मनाशी बोलत नाक मुरडत तिने पुन्हा रोहितचा प्रोफाइल फोटो पाहिला. तशी ती सावध झाली. आपण काही चूक करतोय या अपराधी भावनेने तिने मोबाइल बॅक घेत टेक्ट मॅसेजेसकडे आपला मोर्चा वळवला. ती मॅसेजेच वाचू लागली. न रहावल्याने तिने अखेर सिद्धार्थचा एक मॅसेज वाचला-
Welcome to Confession, a social art project by Jon Jacobs. Simply call the number below and press 1 to confess, or 2 to hear someone’s confession.
असा काहीसा तो इंग्रजीत मॅसेज होता. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. सिद्धार्थचा मॅसेज वाचल्याने ती जरा अस्वस्थ झाली होती. तिने मोबाइल गादीवर आपटला आणि छताकडे मंद फिरणाऱ्या पंख्याकडे पहात बसली. रात्रीचे 12 वाजले होते. पंखा मंद मंद फिरत होता पण तिच्या मनामध्ये मात्र विचारांनी वेग घेतला होता. सिद्धार्थऐवजी आपल्याला रोहितचा मॅसेज का वाचावा वाटला? शॉवर घेताना रोहितचा विचार आल्यानंतर शरीराला कुणीतरी स्पर्श करून गेल्यासारखे का वाटले? या विचारांनी तिचे डोके जड झाले होते.
आपल्या डोक्यातही एखादी चिप असती आणि ती आपण काढू शकलो असतो तर असा विचार तिच्या मनात आला. रोहितशी बोलताना असाच एकदा विचार आपल्या मनात आला होता आणि दोघे कितीतरी वेळ हसत होतो हे तिला आठवले. हलकेसे स्मित करताना पुन्हा तिच्या गालावर खळी पडल्याचे तिला जाणवले. एकदा रोहितने तिच्या या खळीचे कसे कौतुक केले होते, तेव्हा ती कशी लाजली होती, हेही विचारांच्या ओघात तिला आठवले. पुन्हा आपलं डोकं गदा गदा हलवत तिने आपल्याला आज सारखा रोहितचाच का विचार येतोय, यावर नाराजी व्यक्त केली. पण तिचं मन आज काहीतरी वेगळा विचार करतंय, असं तिला जाणवलं. आता ती नेमकं आपल्या मनात आहे तरी काय? हे शाधून काढायचे म्हणून ठरवून आरशापुढ्यात बसली आणि स्वत:शीच गप्पा करू लागली.
गालावर मुद्दाम खळी आणत ती स्वत:च पुटपुटली, ‘रोहित तुला आवडतोय, हे मान्य कर.’ अपराधी भावनेने तिने मान खाली घालत, हे मान्यही केलं. मग स्वत:लाच प्रश्न विचारला, ‘का? माझा सिद्धार्थ आहे की. तो तर मला खूप आवडतो.’ सिद्धार्थ आणि रोहित असे मनात सुरू असलेले द्वंद्व तिला उमगलं होतं. मग तिनं दोघांची तुलना सुरू केली. ती जितकं मनमोकळं रोहितशी बोलत होती तितकी ती सिद्धार्थशी बोलत नसे, असे तिला जाणवले. ती पटकन आरशा समोरून उठली. तिला आता विचारांनी गरगरायला लागलं. पुन्हा बेडवर पडून ती त्याच विचारात गढून गेली. तिला समजेना आपल्या मनातील द्वंद्व कसं दूर करावं? कुणाशी आपण हे बोलावं. अशी कोण व्यक्ती असेल की, जी दोघांनाही ओळखत नसेल आणि तिच्याशी बोलल्यानंतर निदान आपले मन तरी हलके होईल.
बाटलीतील पाणी तिने झटपट संपवलं. मोठा उसासा घेतला. ती तिच्या मित्र-मैत्रिणींची यादीच घेऊन बसली. मनातील नावं संपल्यानंतर तिने पुन्हा मोबाइल हातात घेतला. भरभर ती त्यातील काँटॅक्ट लिस्ट पाहू लागली. तिला यातील एकही नाव विश्वासाचं वाटत नव्हतं. पण का? ते तर तिचे चांगले मित्र-मैत्रीण होते. पण प्रसंग मोठा कठीण असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने मोठा उसासा घेत मोबाइल गादीवर ठेवण्याचा प्रयत्न केला, तितक्यात तिला सिद्धार्थने पाठवलेला तो मेसेज आठवला. मेसेज बॉक्समध्ये जात तिने तो शोधून काढला. त्यातल्या ओळी वाचल्या. तिच्या लक्षात आलं… तो नंबर विदेशातला होता. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित उमटलं.
आपण या नंबरवर फोन करून कन्फेस केलं तर? पण कशाचं कन्फेस? सिद्धर्थ ऐवजी रोहितचा विचार केला म्हणून? का रोहित आवडायला लागलाय हे सांगण्यासाठी कॉल करायचा? बस आता मनाला अधिक ताण न देता तिने कॉल जोडायचं ठरवलं. एकदा तिने पुन्हा रोहितचं व्हॉट्स ॲप स्टेट्स चेक केलं, नंतर सिद्धार्थ ऑनलाइन आहे का, हे पाहाण्यासाठी तिने त्याचेही व्हॉट्स ॲप स्टेट्स पाहिलं. दोघंही ऑनलाइन नव्हते. खात्री पटल्यानंतर तिने उगीचच आकाशाकडे पहात देवाचं स्मरण केलं अन् कॉल जोडला.
हेही वाचा – मन तृप्त करणारं… रथीनम!
सूचनेप्रमाणे 1 नंबर डायल केला.
समोरून आवाज आला… “हॅलो…” आवाज तिला जरा ओळखीचा वाटला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं… तिच्या मनातील वादळ तिला शांत करायचं होतं… बोलण्यापूर्वी तिने पुन्हा एकदा नंबर चेक केला. चुकून सिद्धार्थ किंवा रोहितला नंबर लागू नये एवढीच तिला खात्री करायची होती. नंबर चेक केल्यावर तिने न थांबता भडाभडा बोलायला सुरुवात केली.
“मी प्राजक्ता. मला काही कन्फेस करायचंय…” पुढून काहीच उत्तर आलं नाही. मनात धडधड सुरू होती… पण तरीही धीर करत तिनं बोलणं सुरू केलं… “माझं आणि सिद्धार्थचं लव्ह मॅरेज. आमच्या लग्नाला 12 वर्षं झालीत. आमच्यात कसलेही वाद किंवा मतभेद नाहीत. आम्हाला एक छान छोटी मुलगीही आहे. आमचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही नोकरी करतो. घरी कुणीच नसतं. मी ऑफिसवरून घरी आले की, माझा नवरा कामावर गेलेला असतो. तो घरी परतला की, सकाळी मी कामावर गेलेली असते. आमचं असं बोलणं किंवा नवरा-बायको म्हणून फारसं एकत्र येणं होतच नाही. महिन्यातून एखाद्या वेळेसच आमचा ‘तसा’ संबंध येतो. (‘तसा’ या शब्दावर तिने लाजत पण जरासा जोर दिला.) कामाच्या व्यापात आणि भविष्याच्या तजवीजीतच आमचं मॅरेज लाइफ जात आहे. आता मला माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा एक मित्र आवडायला लागलाय. त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये तसले विचार येताहेत. (आता ‘तसले’ वरही तिने जोर दिला.)”
“मी काय करू? मला हेच कन्फेस करायचे होते. माझ्या मनात अपराधीपणाची भावना येतेय. मी दोघांना फसवतेय, असं मला वाटतंय. मला हे व्यक्त करायचं होतं, म्हणून तुम्हाला फोन केला. माझ्या नवऱ्यानेच मला हा नंबर दिला होता. पण त्याला यातलं काही माहिती नाही. त्याने पाठवलेल्या मेसेजमध्ये हा नंबर होता आणि तुम्हाला कॉल केला. कुणाशी तरी बोलल्याने मला आता हलकं वाटतंय…” हे सांगताना तिला रडू कोसळलं.
मनावरचं दडपण दूर झालं की, आपल्याला शरीरातील प्रत्येक नस अन् नस साद घालतेय, असा भास होतो. डोळे घट्ट मिटल्यावर निसर्गाची पाना-फुलांची आरास दिसते. हिमशिखरांवर आपण एकटेच बागडतोय असं वाटतं… उन्हात गार वारा अन् बोचऱ्या थंडीत कोवळ्या उन्हाचा आभास होतो. आपण तरंगतोय, नाही फुलपाखराप्रमाणे अलगद उडतोय असं वाटतं… अचानक ती भानावर आली. आपण एकटेच बोलतोय, समोरची व्यक्ती कोण? त्याला माझी भाषा समजतेय का? हा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला… ती पुटपुटली, “मी फोन ठेवते…” तसा समोरून आवाज आला. “थांबा…”
मराठीतील आवाज ऐकूण पुन्हा ती दचकली. “कोण?” समोरून आवाज आला… “ते महत्त्वाचं नाही. तुमच्या शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे…” पुन्हा आवाज ओळखीचा असल्याचा तिला भास झाला. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं… खुदकन हसत ती म्हणाली, “बोला बोला…. काय म्हणता?”
समोरच्याचं संभाषण सुरू झालं… “तुमची अवस्था फारशी काही वेगळी नाही. माणसाला अभिव्यक्त करायला जागाच उरली नाही की, माणसाचं मन हेलकावे खायला लागतं… आपलं कुणीतरी असावं, असं वाटणं ही नैसर्गिक बाब आहे. असं प्रत्येकालाच वाटतं. शरीरापेक्षा मनाचं नातं खूप वेगळं असतं. मनाची तार जुळली की, ती साखरेच्या पाकासारखी वाटते अन् तिची तार ताणली की, झटक्याने कधीही तुटू शकते. तुमचं तुमच्या नवऱ्यावर प्रेम आहेच, पण सहवासाने तुम्हाला रोहितही आवडतोय. त्याचं आवडणं मुळीच चुकीचं नाही. सिद्धार्थ कदाचित तुम्हाला वेळ देऊ शकत नसेलही; पण म्हणून त्याचं तुमच्यावरचं प्रेम कमी झालंय, असंही नाही अन् रोहित कदाचित तुमच्यातील मैत्रीवर प्रेम करत असेल. तुम्ही त्याचा तसा अर्थ काढला असेल. (‘तसा’ या शब्दावर समोरच्याने जोर दिला.) पण म्हणून तुमच्या दोघांविषयीच्या भावनांमुळे तुम्ही अपराधी ठरत नाहीत. प्रेम हे असं नातं आहे की, जे व्यक्त अन् अभिव्यक्त नाही झालं की, मनात अपराधीपणाची भावना वाढते. रोहितकडे तुम्ही तुमची भावना व्यक्त करा. तो तुमचा चांगला मित्र आहे, असे तुम्ही म्हणता म्हणजे तो या तुमच्या भावनेचा चुकीचा अर्थ तर काढणारच नाही; उलट तुमच्या दोघांमधील मैत्रीचं नातं हे अधिक घट्ट होईल.”
“सिद्धार्थलाही तुम्ही तुमच्या भावना सांगा. त्याला तुमच्या गरजांची जाणीव करून द्या. त्याच्याशी अधिकाधिक बोलण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी मनमोकळं बोला. तुमच्या मनात साचलेल्या कचऱ्याला प्रवाही करा. मनात साचत गेलं की, त्याचं डबकं होतं, संशय बळावत जातो, नात्यांची धार कमी होत, ते कमकुवत होतात… मन प्रवाही झालं की, ते निर्मळ बनतं. प्रेमाची भावना ही अशीच आहे, ती मुळात निर्मळच आहे. आपण लोकं ती कलुषित करतो. त्यांना नको त्या नात्यांचं नाव देत जातो. भावना ही जपली पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. नात्यांना बंधनं असावीतच, पण ती घट्ट आवळली जावीत, असं नको. मी आता फोन ठेवतोय. तुम्हाला आता एक एसएमएस मिळेल. तो नीट वाचा. तो नो रिप्लायचा नंबर आहे. फक्त तो नीट वाचा…”
शांतपणे एकून घेणारी प्राजक्ता एकदम भानावर आली. पुन्हा आवाज, समजावणं ओळखीचं कसं? तिने पटकंन फोन ठेवला. फोन हिस्ट्रीमध्ये जात पुन्हा नंबर पाहिला. तितक्यात तिला सिद्धार्थचा मेसेज दिसला. तो तिने आता झपाट्याने वाचण्यास सुरूवात केली… तिने आधीचा एसएमएस काढला. त्यात लिहिले होते, ‘प्राजू, मी अन्वाला तुझ्या आईकडे सोडतोय, मला ऑफिसमध्ये जावं लागतंय. तुला खूप फोन केले, पण तू कामात किंवा गाडीवर असशील. मेसेज मिळाला की फोन कर. पोळ्या करणाऱ्या मावशी नसल्याने तुझ्यासाठी खिचडी करून ठेवली आहे. ती खाऊन घे. माझ्या नव्या जॉबविषयी कल्पना द्यायची राहिली होती. मी एका कॉल सेंटरवर काम करतोय. थीम चांगली, वेगळी आणि चॅलेंजिंग असल्याने मी हा जॉब स्वीकारलाय. त्याचे थोडक्यात स्वरूप समजावे म्हणून खालचा मेसेज वाच… बाकी आल्यावर बोलूच!” खाली मेसेज होता…
Welcome to Confession, a social art project by Jon Jacobs. Simply call the number below and press 1 to confess, or 2 to hear someone’s confession. Call number below…


