पराग गोडबोले
ती रोजच बाहेर पडायची, ठरलेल्या वेळी संध्याकाळी… बागेत गवतावर चालायची… हुंदडणारी, बागडणारी, झोपाळ्यांवर झुलणारी मुलं आणि झाडांवर डुलणारी फुलं बघत बसायची तल्लीन होऊन… बराच वेळ रमून जायची त्या वातावरणात… स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्यातल्या वेदनांना विसरून…
जवळच्याच एका सोसायटीत राहायची. राहायची म्हणजे, आजारी असलेल्या एका काकूंना सोबत करायची, त्यांची शुश्रूषा करायची, त्यांचं हवं नको बघायची. खाणंपिणं, पथ्यपाणी, औषधांच्या वेळा… सगळं सांभाळायची ती, अगदी लेकीच्या मायेने! चोवीस तासांची सेवा.
गेले सहा महीने ती काकूंच्या सेवेत होती. वास्तविक ना नात्याची, ना गोत्याची, पण त्या पलीकडच्या निस्वार्थ नात्याचा गोफ विणला गेला होता दोघींच्यात, नकळतच. एकट्या राहणाऱ्या काकूंची ती लेक, नात सगळं काही होती. काकूही आता तिला कुठेही सोडायलाच तयार नव्हत्या! एवढी माया लावली होती तिने काकूंना… अर्थात, पैसे मिळायचे कामाचे, पण त्यापेक्षा मिळणारं समाधान जास्त महत्वाचं होतं तिच्यासाठी.
माया, ममता, वात्सल्य जणू ओतप्रोत भरलं होतं तिच्यात. ती म्हणायची त्यांना, “आई लवकर गेली माझी. तिची सेवा करता नाही आली मला, तुमच्या रूपाने परत आई लाभलीय, असं मानतेय मी.”
बागेत जायच्या यायच्या रस्त्यावर बरेच सवंगडी जमवले होते तिने. तीन-चार कुत्रे, एक मनीमाऊ, दोन बोके…. सगळे तिला सोबत करायचे बागेपर्यंत. जिवाचे जिवलग होते जणू तिच्या! अपेक्षा नसायच्या त्यांच्या काही. नुसता डोक्यावरून हात फिरवला, पाठ थोपटली की, लाडात यायचे हे मित्र. मनी अंग घासायची पायाला, लाडीक आवाज काढायची, कुत्रे शेपट्या हलवून सलामी द्यायचे आणि त्यांची लाडकी ताई या सगळ्या गराड्यात मिरवत, बागेत जायची.
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
बरेच दिवस सुरू होतं हे असं. एकदा तिच्या लक्षात आलं, तिची लाडकी मनी पोटुशी आहे. भरभरून आनंद झाला तिला. अगदी स्वतःची लेक असल्यागत, मनीची विशेष काळजी घ्यायला लागली ती, हवं नको बघायला लागली तिचं. तसं तर, घरी घेऊन जावं असंच वाटत होतं तिला, पण आपणच उपरे असताना मनीला कुठे आणखी घेऊन जायचं, म्हणून ते टाळलं तिनं.
सोसायटीच्या एका कोपऱ्यात एका खोक्यामध्ये छानशी बाळंतिणीची बिछायत तयार केली, कोपऱ्यावरच्या मासेवाल्याला सांगून दोन-तीन वेळा डोहाळेही पुरवले तिचे, अगदी यथास्थित! आणि मग एके दिवशी मनी बाळंत झाली. तीन छानशी गोंडस पिल्लं, मनीच्या कुशीत दिसली आणि तिला बघितल्यावर, मनीनं मान वर करून जणू कृतज्ञतेची पावतीच दिली.
डोळे मिटलेली ती पिल्लं बघायचा आता छंदच लागला तिला… पिल्लं हळूहळू मोठी होत होती, आईला लुचणारी पिल्लं बघून कोण आनंद व्हायचा. मनीबरोबरच आता पिल्लं पण तिची आपली झाली.
असाच आठवडाभर गेला असेल, पिल्लांनी डोळे उघडले आणि ती लडखडत हालचाल करू लागली जागेवरच. मजा येत होती त्यांची हालचाल, वळवळ बघताना. अशाच एका संध्याकाळी, खाली उतरल्यावर मनी कुठे दिसेना. पिल्लं भुकेली वाटत होती, विचित्र आवाजात विव्हळत होती आईची वाट बघत… बराच वेळ ती थांबली ती, पण मनीचा पत्ता नाही म्हटल्यावर निघाली शोधत आणि थोडं पुढे गेल्यावर दिसली मनी… रक्ताच्या थारोळ्यात पडलेली, निश्चेष्ट. जिवंतपणाच्या खुणा नसलेलं कलेवर. कुठली तरी गाडी उडवून निघून गेली होती, तीन पिल्लांना पोरकं करून…!
गेलेल्या मनीसाठी आणि पोरक्या झालेल्या पिल्लांसाठी अविरत अश्रू ओघळू लागले… रस्त्यात पडलेला तो देह तिने उचलून कडेला ठेवला आणि तिच्या ओळखीतल्या प्राणी मित्राला फोन केला. तो आला आणि घेऊन गेला कलेवर, विल्हेवाट लावण्यासाठी. हो, हाच शब्द वापरला त्याने, ओरखडा काढणारा, मनावर!
आता पिल्लांचं काय होणार? हा यक्षप्रश्न भेडसावत होता तिला. पिल्लं उपाशी होती बराच वेळ. तिच्यातलं अंगभूत वात्सल्य जागं झालं. काकूंच्या घरी जाऊन वाटीभर दूध आणि कापूस घेऊन ती खाली उतरली. केविलवाण्या पिल्लांना, कापसाच्या बोळयानं दूध पाजू लागली. तिची धडपड बघून सोसायटीतलीच एक मुलगी सरसावली मदतीला आणि तिला हायसं वाटलं.
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कूकर!
ती वेळ निभावली, पण पुढे काय? कोण बघणार या पिल्लांकडे हा प्रश्न होताच. तिला तिचा दुसरा एक मित्र आठवला मार्जारप्रेमी. त्याला फोन केला. तो म्हणाला, ”आजची रात्र सांभाळ. उद्या येतो सकाळी, मग बघू काय करायचं ते.”
रखवालदार काकांशी बोलून, त्यांना गळ घालून, एका रात्रीपुरती पिल्लं त्यांच्या केबिनमध्ये ठेवली. ते सुद्धा तयार झाले, काळजी घ्यायला, दूध पाजायला… आणि तिचा जीव भांड्यात पडला.
मनीच्या आठवणीने आणि पिल्लांच्या काळजीने झोप अशी लागलीच नाही तिला. सकाळी लवकर उठून धावली आणि पिल्लं सुखरूप आहेत, हे पाहून हायसं वाटलं तिला. कबूल केल्यानुसार मित्र आलाच सकाळी आणि पोरक्या पिल्लांकडे पाहून, भरून आलं त्याला सुद्धा! नुकतीच व्यालेली एक मांजर ठाऊक होती त्याला एका घरची. तिच्या पिल्लांमध्ये जर ही पिल्लं सामावली तर, त्यांना आपोआपच आईचा लाभ झाला असता. पण त्यात एक संभाव्य धोका असा होता की, मांजरीने पिल्लं नाही स्वीकारली, तर पिल्लांचा जीव जायची दाट शक्यता होती!
पण तो धोका स्वीकारणं आवश्यकच होतं अगदी. मित्र निघाला पिल्लं घेऊन आणि आता वेगळीच काळजी लागून राहिली तिला, ती मांजर स्वीकारेल का नाही या आगंतुक पिल्लांना, याची! दोन-तीन तासांत मित्र कळवणार होता, तोपर्यंत जीव टांगणीला… एक एक क्षण मोजत होती ती, पण संध्याकाळपर्यंत खबरबात आलीच नाही! मित्र फोनही उचलत नव्हता.
पिल्लांचं काही बरंवाईट तर झालं नसेल ना, या शंकेनं जीव थाऱ्यावर नव्हता तिचा दिवसभर. घालमेल नुसती जीवाची.
शेवटी, बराच वेळ वाट बघितल्यावर एकदाचा आला फोन आणि मित्राने आनंदाची बातमी दिली. नव्या माऊने स्वीकारली होती पिल्लं. हुर्यो!
तिच्या दोन पिल्लांमध्ये ही तीन पिल्लं अगदी अलगद समाविष्ट झाली होती. नव्या आईनं दूध पण पाजलं होतं पिल्लांना, नव्या बाळांना स्वीकारल्याची खूण होती म्हणे ती. आता तिच्या डोळ्यांमधून परत अश्रू वाहायला लागले, पण यावेळी ते आनंदाचे होते. अनाथ, अश्राप आणि निष्पाप अशा गोजिरवाण्या पिल्लांना तिने नवी आई मिळवून दिली होती…
आईविना जगण्याची सवय असलेल्या तिने, माणुसकीचं दर्शन घडवत अमाप पुण्य गाठीला बांधलं होतं, आपल्या कृतीनं! तिची आजी सांगायची, देव सगळं बघत असतो. कुकर्माची शिक्षा आणि सत्कर्माचं फळ याच जन्मी देत असतो तो. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने विशेष काही नव्हतं केलं, फक्त माणसासारखी वागली होती ती, मुक्या पिल्लांसोबत…
दुसऱ्या दिवशी जाऊन, आईच्या कुशीत विसावलेल्या पिल्लांना बघून अगदी समाधानाने परतली ती, देवासारख्या भेटलेल्या मित्राचे आभार मानून.
सुरू झालं परत एकदा तिचं आयुष्य, बागेच्या वाटेवरच्या सवंगड्यांसोबत, मनीला गमावल्याच्या दुःखाला मागे टाकत आणि पिल्लांना आई मिळाल्याच्या अतीव समाधानाला सोबत घेत.