माधवी जोशी माहुलकर
नवरात्र म्हणजे आनंद, भक्ती, शक्ती, समर्पण, शांती, श्रद्धा, आस्था, उत्साह, सृजन… या नवरसांचे उधाण! पितृपक्षाचे पंधरा दिवस संपले की, आदिमायेचा हा जागर संपूर्ण भारतात भक्तिमय वातावरणात पार पाडतो. नवरात्राचे हे नऊ दिवस नवनवीन संकल्प, सिद्धी पूर्णत्वास नेण्याचे दिवस! या नऊ दिवसांत आदिमायेच्या विविध रुपांचा संचार सर्वत्र दिसून येतो. या नऊ दिवसांच्या उत्सवात देवीच्या शक्तिपीठांमध्ये त्या जगद्जननीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून भक्तजनांच्या अलोट गर्दीचा पूर आलेला दिसतो.
अलीकडच्या काळात तर नवरात्रीचा हा उत्सव साजरा करण्याचे नवनवीन ट्रेण्ड दृष्टीस पडतात. त्यातील एक म्हणजे नऊ रंगाचे नऊ दिवस… त्याप्रमाणे कपडे परिधान करणे! मला आठवते त्याप्रमाणे साधारणपणे विसेक वर्षांपूर्वी नऊ दिवसांच्या नऊ रंगांचा ट्रेन्ड नवरात्रात दिसला. माझ्याकडे तेव्हा ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे मराठी वृत्तपत्र होते. त्यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने महिला वाचकांना आपल्या वृत्तपत्राकडे आकर्षित करण्याकरिता हा नवरंगांचा ट्रेण्ड आणला. त्याआधी अशा प्रकारचा कुठलाही ट्रेण्ड नव्हता. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हा ट्रेण्ड आणून महिलांच्या या उत्सवात ‘रंग भरून’ अजूनच आनंदाचे आणि उत्साहाचे भरते आणले.
सुरुवातीला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पुढच्या आठ दिवसांत रंगानुसार स्त्रियांच्या प्रतिमा सजवून त्यांनी प्रदर्शित केल्या. त्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या टीमने ज्या महिलांचे ग्रुप नवरात्रीच्या त्या विशिष्ट रंगांनुसार साड्या परिधान करतील, त्यांचे फोटो दुसऱ्या दिवशीच्या अंकात छापून येतील, असे जाहीर केले. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून या वृत्तपत्राने नवरात्रीत नऊ रंगांचा हा पायंडा पाडला. आता बहुतांश सर्वच वृत्तपत्रे हाच फंडा वापरत आहेत.
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
हा ट्रेण्ड हंगामी फॅशनप्रमाणे कालबाह्य न होता, एक महत्त्वाचा सांस्कृतिक आविष्कार म्हणून आता त्याकडे पाहिले जात आहे, हे विशेष उल्लेखनीय! हे नऊ रंग देवीच्या नऊ रुपांसह कसे महत्त्वाचे आहे, हे सुद्धा यात सविस्तर माहितीसह सांगण्यात आले, त्यामुळे हळूहळू ‘मॅाब सायकॅालीजी’नुसार हा ट्रेण्ड फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारतामध्ये तो नवरात्रात अंमलात येऊ लागला. मार्केटिंगचा हा फंडा खूपच विचार करून राबवण्यात आला आणि तो यशस्वीरित्या कायम करण्यात आला, हे खरंच कौतुकास्पद आहे.
त्याआधीच्या काळात कधीही नवरात्रात असे कुठले नऊ रंग महत्त्वाचे असतात, असे काही सांगण्यात आले नव्हते. देवी माहत्म्य आणि पुराणांमध्ये देखील नवरात्रींमधील या नवरंगांचा असा काही उल्लेख नाही. सोशल मीडिया आणि व्हायरल हॅशटॅगच्या युगापूर्वी निर्माण झालेला हा ट्रेण्ड माध्यमांच्या प्रभावाचा आणि विकसित होत असलेल्या परंपरांच्या महत्त्वाचा पुरावा म्हणून उभा आहे.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
चला तर मग आजपासून (22 सप्टेंबर) सुरू झालेल्या नवरात्रीचे नऊ रंग कोणते ते जाणून घेऊया आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या नवदुर्गांच्या नवरुपांमधे सामावलेल्या त्या स्त्रीशक्तीला जागृत करून समाजामध्ये जागरुकता आणि सुरक्षितता निर्माण करूया!
2025साठी शारदीय नवरात्री रंग
- दिवस 1 – पांढरा (सोमवार, 22 सप्टेंबर)
- दिवस 2 – लाल (मंगळवार, 23 सप्टेंबर)
- दिवस 3 – रॉयल ब्लू – निळा (बुधवार, 24 सप्टेंबर)
- दिवस 4 – पिवळा (गुरुवार, 25 सप्टेंबर)
- दिवस 5 – हिरवा (शुक्रवार, 26 सप्टेंबर)
- दिवस 6 – राखाडी (शनिवार, 27 सप्टेंबर)
- दिवस 7 – नारंगी (रविवार, 28 सप्टेंबर)
- दिवस 8 – मोरपंखी (सोमवार, 29 सप्टेंबर)
- दिवस 9 – गुलाबी (मंगळवार, 30 सप्टेंबर)



खुप छान लेख नवरात्री च्या नऊ दिवसांत बायकांच्या उत्साहाला उधाण आले असते नऊ रंग नऊ दिवस परीधान करणे ह्यामध्ये युनीटी दिसते अर्थात तो बिझनेस वाल्या लोकांचा फंडा असेल पण सगळे सारख्या रंगाचे कपडे घालतात तर तो युनिफॉर्म वाटतो शक्तीचा जागर असतो.