Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितबालपणीचा काळ सुखाचा...

बालपणीचा काळ सुखाचा…

स्नेहल अ. गोखले

मी आणि सुमती फोनवर बोलताना नेहमीप्रमाणे लहानपणीच्या आठवणी निघाल्या. तेव्हा उल्काही डोळ्यासमोर आली. आम्ही नेमके केव्हा भेटलो, हे आठवत नाहीये. विजू माझ्या वर्गातच होती. साधारण तिसरी, चौथीत असू आम्ही. मी, उल्का, विजू, शकू केव्हा मैत्रिणी झालो, हे कळलेच नाही. मग काय ते खेळ… डब्बा ऐसपैस, लगोरी, लंगडी, ठिकरी, सुरपारंब्या असे सर्व तऱ्हेचे खेळ आम्ही खेळलो, ते आठवते. दोरीवरच्या उड्या किती मारल्या त्याला गिनतीच नाही. मे महिन्याच्या सुट्टीत पत्ते, सागरगोटे असे बैठे खेळ… शिवाय सायकलवर भटकंती, गोखले हॉलमध्ये लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचणे, सकाळी टिळक टँकवर पोहणे… सर्व काही आठवतंय. आमच्या शाळेतून चिपळूणकर सर पोहायला शिकवण्यासाठी यायचे? मी त्यांना उल्का ही माझी बहीण आहे, असे सांगून ‘तिला पण येऊ दे का?’ असे विचारले. त्यांनी पण सहजपणे परवानगी दिली आणि नंतर आम्ही दोघींनी पोहण्याचा खूप आनंद घेतला.

मला आठवतंय, खेळून झाल्यावर उल्काच्या अंगणातल्या सिमेंटच्या सोफ्यावर आम्ही बसायचो, तिथे मोठे सिमेंटचे टेबलही होते. तिथे गाण्याच्या मनसोक्त भेंड्या खेळायचो, गप्पा मारायचो… हेही मला खूपच आवडायचे, शिवाय भानुविलास थिएटर होतेच करमणुकीला.

उल्काच्या घराच्या गच्चीवर हॉलमध्ये नाटक, डान्स अगदी पडदे लावून करत असू. आमच्या घरी जेवण, आईस्क्रीमचाही बेत असायचा. खरंतर, आम्हा चौघींच्या शाळा वेगळ्या होत्या. पण माझ्या आणि उल्काच्या मैत्रिणीदेखील सोबत असायच्या. तसेच, विजूच्या घरी मोठे झोपाळे होते, त्यामुळे तिथेपण मुक्काम असायचा. सर्वांचे भाऊ-बहिणीदेखील आमच्यात खेळायला यायचे. खरंतर, आमच्यासोबत बरोबरीच्या वयाचे कोणी नव्हते. पण आप्पा आमच्याबरोबर बॅडमिंटन खेळत असत.

एकादशी, महाशिवरात्रीला आम्ही डबे घेऊन पर्वतीला जायचो, खूप मज्जा यायची. आमच्याकडे दादा बाहेरगावी गेल्यावर उल्का सोबतीला यायची. मग अनेकदा मी तिला सोडायला यायची. तिथे परत आमच्या ज्या गप्पा सुरू व्हायच्या त्या थांबल्या तर खरं! आता वाटतं, किती आम्ही बोलत बसायचो? आम्ही मुले, मुली सोबत एकत्र खेळायचो. मधूपण असायचा. पण तो उल्काच्या जन्माचा जोडीदार होईल, याची तेव्हा पुसटशी कल्पनाही नव्हती.

त्यावेळी उल्काला कविता करण्याचा छंद होता. तिने आम्हा चौघींवर, प्रत्येकीच्या गुणवैशिष्ट्यांवर छान कविता केली होती. अजूनही ती करते आहेच. मला आठवते स्वाती, रवी लहान होते, पण तरीही उल्का न चिडता खेळतानासुद्धा त्यांना सांभाळायची. हा तिचा एक गुणच होता. आम्ही भोंडलापण खूप खेळलो आणि कुठे कुठे जायचो तेव्हा. आतासारखं ओळख असेल तरच जायचं, असं नव्हे. तसेच, विजूकडे मंगळागौरी, हरतालिका किती जागवल्या! त्यांचे खेळ खेळलो. खरंच, आमचं बालपण खूपच समृद्ध गेले. आमची लग्नं लवकर झाली. पण नंतरही उल्काची आई, मंगलवहिनी, विजूच्या काकू बोलावून हमखास ओटी भरत असत. त्या आठवणींनी अजूनही डोळे पाणावतात. महानच होत्या सगळ्या.

किती लिहू खूप आठवणी दाटल्या आहेत. आता पुरे!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!