Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeललितचाळ नावाचे एकत्र कुटुंब!

चाळ नावाचे एकत्र कुटुंब!

ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो

भले छीन लो मुझसे मेरी जवानी

मगर मुझको लौटा दो बचपन का सावन

वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी

आज बऱ्याच दिवसांनी जगजित सिंगची ही गझल कानावर पडली आणि नकळत माझे मन भूतकाळात गेले. चाळ हा तसा सगळ्याच मराठी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय! बहुतेक मध्यमवर्गीय लोक याच चाळ संस्कृतीमध्ये वाढलेले… या चाळीच्या असंख्य आठवणी अनेकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. जे लोक या चाळींमधे राहिलेले आहेत, त्यांचे त्यांच्या शेजाऱ्यांशी अजूनही ऋणानुबंध आहेत. आम्हीसुद्धा अशाच चाळ संस्कृतीमध्ये लहानाचे मोठे झाले आहोत…

आमची चाळ अगदी मुंबईतल्या चाळीसारखी खूप मोठी नव्हती, पण साधारण बारा बिऱ्हाडांची ती चाळ होती… एका लाइनमधे सरळ खोल्या होत्या. सगळ्यांच्या सारख्याच, त्यात दुजाभाव नव्हता. त्या चाळीत मोठ्या ऑफिसरपासून कारकूनापर्यंत सगळे लोक राहात होते. ऑफिसर आपले पद घरी परतताना ऑफिसमधेच सोडून येत असे… चाळीत त्याने प्रवेश केला की, तो एकदम चाळकरी होऊन जात असे. तिथे त्याचा ऑफिसरचा तोरा नसायचा. सगळ्यांची घरे भिंतीला भिंत लागून असल्यामुळे एकाच घरात असल्यासारखं वाटायचं.

आमच्या चाळीत जैन, मद्रासी, वाणी, ब्राह्मण, पाटील, गुजराती अशी विविध बिऱ्हाड गुण्यागोविंदाने रहायचे. वेगवेगळ्या जातीचे लोक चाळीत रहात असल्यामुळे सणासमारंभांची वर्षभर रेलचेल असायची. मला अजूनही आठवत आमच्या चाळीत एक केरलीयन कुटुंब रहायच, ते जितके छान मल्याळम बोलायचे, तितकीच चांगली मराठी बोलायचे… आपल्या सणावारांमध्ये समरसून भाग घ्यायचे. टिपिकल केरलीयन पदार्थ तर, आवर्जून सगळयांना खाऊ घालायचे. तसेच एक वाणी कुटुंब होते. ते सोलापूरकडचे होते. त्यांची मराठीच भाषा बोलण्याचा टोन ऐकायला खूप छान वाटायचा… त्यांना पाच मुली आणि एक मुलगा! असं बहुतेक सगळयांच्याच घराचं चित्र होतं. त्यावेळी एका कुटुंबात कमीत कमी पाच भावंडे तरी सख्खी असायची. स्वतःची मुलं असली तरी पुतणे, पुतण्या, भाचे, भाच्या बालगोपाळांचे संगोपनही त्या चाळीतल्या कुटुंबात सहजपणे होत असे. आम्हा मुला-मुलींची शाळाही एकच होती. त्यामुळे शाळेत सोबत जाण्यापासून अगदी अभ्यासात एकमेकांना मदत करण्यापर्यंत सगळंच सोबत चालायचं.

कोणी शिक्षणासाठी तर कोणी नोकरीच्या निमित्ताने शहरात आलेला असे आणि आपल्या काका, मावशी, मामा, मामी, आत्याचे घर असल्यावर दुसरीकडे राहण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. इतका न बोलता एकमेकांवर हक्क, अधिकार गाजवायची सवय होती. आमच्याच घरी माझे चुलत काका, चुलत भाऊ, बहीण, मावशी, मामा इतके सगळे राहून शिकून गेले, पण आईची कधीच तक्रार नसायची. वडील शिक्षक असल्यामुळे घरात एकदम शिस्तीचे, पण सोशल वातावरण होते. माझे वडील सामाजिक कार्यात सक्रिय असल्यामुळे आमच्या घरी माणसांची सतत वर्दळ असे. त्यामुळे आमच्या चाळीतील लोकही सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असत. यामध्ये घरातील गृहिणीही सहभाग घ्यायच्या.

आमची चाळ तशी नवीनच होती आणि नव्याने आकारास येत असलेल्या परिसरात होती… त्यामुळे थोडी मध्यवस्तीपासून लांब होती. आमच्या अंगणातून तेव्हा लांबवर रेल्वेचे फाटक दिसत असे… रात्रीच्या अंधारात दूरुन जाणारी लुकलुकत्या दिव्यांची रेल्वे पाहताना खूप मजा वाटायची. तसेच त्या अंधाराची भीतीपण वाटायची! समोरच्या विजेच्या तारावर एक मोठ घुबडाचे जोडपे घुमत बसायचे आणि मग घरात त्या घुबडाच्या विषयाला धरून सगळयांच्या चर्चेला उधाण यायचे… जसे लहान बाळाचे कपडे ते जोडपे चोरते, दगड मारला तर ते तो दगड झेलते आणि नदीवर जाऊन घासत बसते… मग जसजसा तो दगड झिजतो तसतसा ज्याने दगड मारला असेल तो माणूसही झिजतो वगैरे, वगैरे… मला आता माझ्या मुलांना या गोष्टी सांगितल्या की खूप हसायला येतं.

उन्हाळ्यात तर अंगणात बाजेवर झोपायची मजाच काही और असायची! इथून तिथून एका लाइनमध्ये आपापाल्या अंगणातल्या हिश्श्यावर सगळया बिऱ्हाडकरूंच्या बाजा पडायच्या. कूलर, एसी असले प्रकार तेव्हा आमच्या खिजगणतीतही नव्हते! किंबहुना असे थंड हवेची उपकरणे असतात, हे आमच्या गावीही नव्हते. रात्रीचे अंगणातील बाजेवरच्या थंडगार झालेल्या गादीवर अंग टाकले की, दिवसाचे सगळे श्रम निघुन जायचे. बहुदा रोजच रात्री आम्हा सगळ्यांचा पत्त्यांचा डाव रंगत असे… बदाम सात, गुलामचोर, पाच-तीन-दोन हे खेळ रोज खेळले तरी कंटाळा यायचा नाही. दुपारी सागरगोट्यांचे, संध्याकाळी लगोरी, चोर शिपाई, बंदी साखळी, नदी का पहाड, सुरकाठी असे सगळे खेळ खेळले जात असत… कोणते खेळ केव्हा खेळायचे त्याची वेळ ठरलेली असे! त्यात मुलींचा आवडता खेळ म्हणजे टिक्कर बिल्ला आणि मुलांचा विटी-दांडु हे होते… किती छान होतं ना सगळं… या मोबाइलच्या गेमपेक्षा तर नक्कीच!

उन्हाळ्यात दुपारी चाळीतल्या सगळ्या बायका वाळवणाचे पदार्थ करायच्या मागे असायच्या. यामधे कुरडई, पापड, शेवया, मुगवड्या… असली थोडी चिकट कामं एकमेकींच्या सहाय्याने चालायची… शेजारीण शेवया करणार असेल तर तिला दुपारी मदत करायला इतर बायका जायच्या… तिच्या करुन झाल्या की, दुसरीच्या करू लागायच्या… असंच पापडांच्या बाबतीत होतं. कोणाच्या घरी पापड करायचे असतील, तिथे आपापले पोळपाट आणि पापडाचे लाटणे घेऊन चाळीतल्या इतर बायका हजर व्हायच्या. मग दुपारचा चहा, झालंच तर मुलांसाठी कच्चा चिवडा, सातूचे पीठ असले खाणे तिथेच व्हायचे… खूप मजा असायची. बरं, त्या वाळवणावर लक्ष ठेवायला आम्हा मुलांची गस्त असायची! आम्ही मुलx तर पापड करताना दिवसभर तिथे फिरत रहायचो, ते पापडाच्या पिठाची लाटी खायला! तुम्ही सगळ्यांनीपण खाल्ली असेल नं?

हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी!

कुरडईचा गव्हाचा चिक काढणे हादेखील एक मोठा कार्यक्रम असायचा. सकाळी सकाळी ग्राइंडरवर ओले गहू भरडून त्याचा चिक काढला जाई… मग तो रटरट शिजला की, आजी एक एक वाटीभर सगळयांना मीठ, मिरपुड टाकून खायला द्यायची, पौष्टिक असतो म्हणून! नंतर त्याच्या कुरडया केल्या जायच्या. याशिवाय, सांडगे, दहीमिरची, लोणचे असले प्रकारही एकत्रित व्हायचे. अशी घरोघरी वर्षभराची बेगमी तयार करून ठेवली जायची. वर्षभराचे हळद, तिखट, गोडा मसाला, गरम मसाला सगळं घरोघरी व्हायचे. आता तर काय सगळंच रेडीमेड मिळतं! त्यामुळे त्यातली मजा गेली.

काही पदार्थ घरात नसले की, उधार, उसने मागायला शेजारची काकू असायची. उसनवारीत घेतलेला पदार्थ वापस करण्याच्या बोलीवर आणला जात असे आणि खरंच न चुकता आठवणीने तो पदार्थ परतही केला जात असे. जसे की साखर,चहा पावडर, दूध, डाळीचे पीठ वगैरे.

मला वाटत वर्षानुवर्षे चाळीत एकमेकांच्या शेजारी राहणारे आपल्या नातेवाईकांपेक्षा कमी नसावेत. एखाद्याच्या घरात लग्न असले की, अख्खी चाळ जणू आपल्याच घरातले लग्न असल्यासारखे वावरायची. अगदी लग्नाच्या सामानाच्या खरेदीतसुद्धा कितीतरी सूचना असायच्या… वरून आपण कोणाला मदत केली नाही तर, आपल्या घरी कोणाचे लग्न ठरल्यावर कोण येणार? असा सवाल खडा करून आपले आद्य कर्तव्य असल्यासारखे चाळीतले आबालवृद्ध आपली जबाबदारी पार पाडायचे. अगदी लग्नघरी पाणी भरण्यापासून अंथरुण टाकण्यापर्यंत सगळी कामे आनंदाने करत असत. लग्न झालेली मुलगी माहेरपणाला घरी आली की, तिचं माहेरपण अख्खी चाळ पुरवत असे… तिच्या नवऱ्याला आपला जावई असल्यासारखे सगळ्यांच्या घरी मानपान असे. सगळ्यांच्या घरी आवर्जून जेवायला बोलावणे असायचे. शेजाऱ्याचं घर म्हणजे आपलंच घर… आपलंच कुटुंब… अशी भावना असायची. एका भिंतीचा काय तो अडसर असायचा…  नाहीतर चाळकऱ्यांची सुखदुःख सहसा सारखीच असायची.

घरातले म्हातारे-कोतारे आपल्या हाताचा धपाटा बिनदिक्कत दुसऱ्याच्या पाठीत घालायला कमी करायचे नाहीत. एवढा आपलेपणा असायचा. त्यामुळे चाळीत वाढलेला मनुष्य जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तिथल्या वातावरणात सहज सामावून जातो!

हेही वाचा – सुपर मार्केट अन् सुपर खरेदी!

आमच्या चाळीसमोर एक मोठा बंगला बांधण्यात येत होता, अर्थात त्या बंगल्याविषयी आम्हा सगळ्यांच चाळकऱ्यांना अप्रूप होतं… तिथल्या रुम्स कशा असतील? बेडरूम म्हणजे काय असतं? लिव्हिंग रूम कशाला म्हणतात? डायनिंग हॅाल कसा असतो? शिवाय, बाहेर मोठा लॉन, बगिचा, त्यातला झुला वगैरे वगैरे… चाळीमध्ये कुठल्या अशा गोष्टी? सरळसोट दोन किंवा तीन रूमचं घर, त्याच्या मागील बाजूस संडास-बाथरुम असं स्वरुप असायचं… त्यात कुठे आलंय डायनिंग हॅाल आणि लिव्हिंग रूम वगैरे? आपल डायनिंग म्हणजे पाट आणि ताट, वाटी, पेला, तांब्या असं असायचं! बऱ्याच जणांकडे तर आसन किंवा पट्टीची सतरंजी टाकून पंगत बसायची किंवा बहुधा जमीनीवरच गोल करून मधे अन्न ठेवून हसत-खेळत जेवणं व्हायची. त्यामुळे तो बंगला बांधला जात असताना, आम्हाला तिथल्या एकेक गोष्टी माहीत व्हायच्या आणि आमचे डोळे विस्फारायचे! असंही घर असू शकतं, याचं नवल वाटायचं. नाहीतर, बंगला म्हणजे सिनेमाच्या पडद्यावर पाहिलेला एवढंच आठवतं…

त्या बंगल्याचा चौकीदार आम्हा बच्चे कंपनीवर नेहमी धावून यायचा. आमची हक्काची खेळायची जागा गेली होती, त्यामुळे आम्हाला त्याचा खूप राग यायचा. एकदा तो दुपारी त्याच्या राणी नावाच्या कुत्रीला त्याच्या कुडाच्या म्हणजे मातीने सारवलेल्या खोलीत कोंडून निघून गेला. ती कुत्री बिचारी तहानेने व्याकुळ झाली होती… मग काय त्या दाराच्या फटीतून तिला पाणी पाजण्याचा आमचा प्रयत्न सुरू झाला आणि त्यात चौकीदाराची खोली ओली झाली. त्यामुळे त्या रात्री त्याला झोपताच आले नाही. अशा प्रकारे त्याची फजिती करुन आम्ही आमचा बदला घेतला होता. आता अशा गंमतीजमती आठवल्या की, खूप हसायला येतं.

भातुकलीचा स्वयंपाक हीसुद्धा एक मस्त आठवण आहे. उन्हाळ्यात दोन महीने शाळेला सुट्टया असायच्या, त्यामुळे दिवसभर घरामध्ये पत्ते, कॅरम व्यापार हे खेळ खेळत असू. मग यातून कधीतरी विरंगुळा म्हणून किंवा एक बदल म्हणून एखाद्या रविवारी भातुकलीच्था स्वयंपाकाची तयारी व्हायची. सगळयांच्या घरुन एकेक पेला डाळ, तांदूळ,  कणिक, तेल, मीठ तिखट, मसाला, कांदे, बटाटे,  लसूण, मिरची असे सगळे गोळा करायचे. एखाद्याची आई वीटांची चूल मांडून द्यायची. घरातील आजी, काकू मग चुलीपाशी उभी राहून आम्हा मुलींना खिचडी, भाजी, पोळ्या कशा करायच्या ते सांगायची. मुलांना पाणी भरून ठेवणे, भाज्या चिरायला मदत करायला करणे, अंगणात पंगत बसणार असल्यामुळे तिथे झाडून, पाणी शिंपडणे अशी कामं असायची. पण एकत्रित समूहाने काम केल्याचे समाधान खूप मिळायचे. सगळेजण जबाबदारीने आपापली काम करायची, अगदी भांडी घासून ठेवण्यापर्यंत…! मुलाबाळांनी केलेल्या स्वयंपाकाचे मोठे लोक जेव्हा कौतुक करत असत आणि पाठीवर शाबासकीची थाप पडत असे, तेव्हा पुढील भातुकली कधी करायची याची उत्सुकता लागलेली असे. प्रत्येक भातुकलीमध्ये आपापल्या खाद्यसंस्कृतीनुसार विविध पदार्थांची रेलचेल असायची.

जून महिना आला की, बरोबर मृग नक्षत्रावर पाऊस यायचा. त्या पहिल्या पावसात मनसोक्त भिजायचं… उन्हाळ्यात झालेली अंगाची काहीली पावसाच्या त्या पहिल्या सरींनी थंड व्हायची… आता प्रतीक्षा असायची शाळा सुरू होण्याची! त्याआधी रिझल्ट लागलेला असायचा… कोणीतरी पहिला नंबर मिळवलेला असायचा! मग त्याची कॉलर ताठ असायची. पण एखादा बिचारा, बिचारी नापास झालेलं असायचं, त्याच दुःख त्याच्या डोळ्यांत दिसायचं. तो किंवा ती इतर मुलांमध्ये मिसळायला लाजायचे. पण त्याही परिस्थितीत त्यांना धीर देणारे एखादे मास्तर, मित्र-मैत्रिणी असायचे… निराशेच्या गर्तेत जाऊन टोकाचे पाऊल उचलण्याचा विचारही मनाला शिवत नसे… शाळा सुरू झाल्यावर आदल्या वर्षीच्या जुन्या युनिफॉर्मवर पावसाळा काढायचा आणि पावसाळा संपला की, मग नवीन युनिफॉर्म घालायचा, हाच शिरस्ता सगळ्यांच्या घरात असायचा. उगाच केव्हाही कपड्यांचे सोस पुरवले जात नव्हते. त्यामुळे त्याचे अप्रूप कायम असायचे. नवीन वह्यासुद्धा वाटून मिळायच्या आणि तीनशे पेजेसची वही असेल तर ती हमखास दोन विषयांकरता अर्धी अर्धी करावी लागायची… जसे इतिहास- नागरिकशास्त्र, निबंध-व्याकरण, पत्र, मराठी गद्य- पद्य प्रश्नोत्तरे… जुन्या वह्यांची कोरी पान फाडून त्यांना बाइंडिंग करायचे उद्योग दरवर्षी चालायचे. एकंदरीत काय तर काटकसर महत्त्वाची होती.

जुलै महिन्यात पावसाने जोर पकडला की, अनेकदा शाळा अर्ध्यावर सोडायचे. मग काय आनंद गगनात मावेनासा व्हायचा! भर पावसात एकमेकांच्या गळ्यात गळा घालून पायाने चिखल तुडवत घरी यायचं. छत्री असली तरी मुद्दामच भिजायचं, पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा. घरी आजी मग तिच्या जुन्या उपरण्याने खसाखस अंग पुसून द्यायची… गरम गरम आल्याचा चहा प्यायला द्यायची आणि अंगावर गोधडी टाकून कुशीत घेऊन बसायची.

खूपच मंतरलेले दिवस होते ते… असं सुख आता कुठे अनुभवायला मिळतं? चाळ संस्कृती जाऊन आता फ्लॅट संस्कृती आली! चकाचक फरशा, महागडं फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आणि इतर अद्ययावत वस्तूंनी घरं सजली, पण माणुसकी हरवली! थोडीफार कुठेतरी मिळत असेल… पण कमीच. यांत्रिकपणा आणि कृत्रिमपणा वाढायला लागला. चाळीत आयुष्य काढणाऱ्या म्हाताऱ्या-कोताऱ्यांचे श्वास या बंद दरवाजांच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये घुसमटायला लागले. दिवसभर चाळीत चालणारा कोलाहल फ्लॅट संस्कृतीच्या नीरव शांततेत दबून गेला… लहान मुलांचे खेळ संपले, त्यांच बालपणच अपेक्षांच्या ओझ्याखाली खुंटलं! बायकांचे एकत्र सणवार करणे, हळदीकुंकू, मंगळागौरी सगळे बासनात बांधलं गेलं… आता तर बारशापासून तेराव्यापर्यंत हॅाल घेऊन हे सगळे कार्यक्रम केले जातात. प्रत्येक गोष्ट सहज मिळते, मग उगाच कष्ट कशाला करायचे? इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं आपल्यावर, पण आपण गुलामगिरीतही आपला बाणा राखून होतो… मग आता स्वतंत्र असताना काय झालं? मॅाडर्न संस्कृतीच्या नावाखाली आपल्या संस्कृतीला विसरायचं? मला वाटतं की, आपणच या सगळ्या गोष्टींचे गुलाम झालेले आहोत. ओढाताण करून, शरीराची हेळसांड करून एकेक हव्यास पूर्ण करण्यासाठी ऊर फुटेस्तोवर धावायचं एवढंच आपल्याला माहीत आहे. चाळ या शब्दाचा अर्थ आवाज, नाद, जागृत असा होतो… पूर्वी घराघरांमध्ये असाच कोलाहल असायचा, नाद असायचा, संवाद असायचा… त्याचमुळे एका रेषेत सरळ असणाऱ्या घरांना चाळ असे नाव पडले असावे… चाळ म्हणजे निरंतर नाद, आवाज असलेली वास्तू असाच अर्थ असावा! आपण हा नाद, हा आवाज परत शोधायला हवा, चाळ नावाच्या विलगीकरण झालेल्या या कुटुंबाला परत एकत्र आणण्याचा प्रयत्न करायला हवा. चाळ नावाची ही विस्मरणात चाललेली संस्कृती आपण टिकवायला हवी, तरच पुढच्या पिढीकडे एकता, समता आणि बंधुत्वाचा वारसा जाईल… जेणेकरून या समाजाची आणि पर्यायाने देशाची संस्कृती अबाधित राहील.

माधवी जोशी माहुलकर
माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!