हिमाली मुदखेडकर
पुणेकरांचे ग्रामदैवत म्हणा किंवा श्रद्धास्थान म्हणा, पण चतुःशृंगी देवी मंदिराचे पुण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विस्तारित पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणारे हे मंदिर सेनापती बापट रोडवर आहे. मुख्य मंदिर हे नव्वद फूट उंच आणि एकशेवीस फूट रुंद असे टेकडीवर वसलेले असून आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंदिरांनी वेढलेले आहे.
पुणे विद्यापीठापासून गणेश खिंड रोडकडून प्रवेश केला असता सुरुवातीसच पार्वतीनंदन गणपती मंदिर लागते. हे जुने मंदिर असून याला स्वतःचे असे ऐतिहासिक महत्त्व आहे. चतुःश्रृंगी मंदिर परिसरातील या पार्वतीनंदन गणपती मंदिरातच चाफेकर बंधूंनी सहकार्यांसह रॅंडच्या वधाचा कट रचला होता. ‘गोंद्या आला रे’ हा परवलीचा शब्द म्हणजे आजच्या भाषेतील ‘कोड वर्ड’ इथेच ठरला होता!
अतिशय साधे स्वच्छ आणि निर्मळ असे हे मंदिर पार करून पुढे चालत दोन तीनशे मीटर अंतर जाताच लागते चतुःशृंगी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार आणि त्यापाठोपाठच येणारी मुख्य कमान ही बहुधा इंग्रजांच्या कारकीर्दीत बांधली असावी. त्या बांधकामाच्या धाटणीवर ब्रिटिशकालीन चर्चच्या बांधकाम पद्धतीचा प्रभाव जाणवतो. कमानीपासून पायर्या सुरू होतात. दर सहा पायऱ्यांनंतर एक रुंद पायरी बांधली आहे. वर चढत जाताना मधे थांबून विश्रांती घेण्यासाठी विचारपूर्वक केलेली ही सोय आहे. दोनशे पायर्या चढून वर गेल्यानंतर मुख्य गाभाऱ्याची सुरुवात होते.
चतुःश्रृंगी मंदिर हे पारंपरिक वास्तू आणि स्थापत्य शैलीचा एक सुरेख नमुना आहे. त्यानुसार इथे एक शिखर म्हणजे कळस आणि एक मंडप आहे. ज्या टेकडीवर हे मंदिर स्थित आहे, त्या टेकडीला चार शिखरे आहेत, म्हणून याचे नाव ‘चतुःश्रृंगी’ आहे. हे मूळ मंदिर सुमारे तीनशे वर्षं जुने आहे. येथील देवीची मूर्ती स्वयंभू असून त्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.
हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!
दुर्लभ शेठ ऊर्फ दुर्लक्ष्ये नावाचे पेशव्यांचे सावकार होते, जे पेशव्यांना मोहिमांमध्ये कर्जाऊ रक्कम देत असत. हे पिढीजात श्रीमंत सावकार वणीच्या सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. दर वर्षी चैत्री, शारदीय नवरात्रात ते सप्तशृंगी गडावर जात असत. पुढे वृद्धत्वामुळे त्यांना तिथे जाणे जमेनासे झाले. त्यांचे मन मात्र राहवेना… देवीच्या दर्शनाचा त्यांना ध्यास लागला. त्याच चिंतेत ते असत. एकदा त्यांना स्वप्नं पडले. त्यात देवीने दृष्टांत देऊन जावळ पासच्या डोंगरावरील ठरविक जागी खणण्यास सांगितले. तिथे उत्खननात तांदळा (मुखवटा) स्वरुपात स्वयंभू मूर्ती मिळाली. या मूर्तीची मग त्याच डोंगरावर मंदिर बांधून प्रतिष्ठापना करण्यात आली… आणि चार शिखरांच्या डोंगरावर सापडल्यामुळे ‘चतुःश्रृंगी’ असे नाव दिले गेले. त्यावेळी देवीचे एक चांदीचे नाणे घडवून ते चतुःश्रृंगी रूपया या नावाने प्रचलितही करण्यात आले होते.
मंदिराचा आताचा परिसर खूप मोठा असून येथील व्यवस्थापन छान ठेवले गेले आहे. चतुःश्रृंगी ट्रस्टने येथील भागात अनेक सुधारणा करून अद्ययावत सुविधा पुरविली आहेत. अनेक कारंजी बांधून सुशोभीकरण केले. त्यामुळे टेकडी चढताना वातावरण अल्हाददायक राहते. मंदिरातील एकूणच वातावरणात भक्तिमय आणि ऊर्जा वाढवणारे असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते.
हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!
नवरात्रौत्सवादरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक या मंदिरास भेट देतात. भाविकांनी दर्शनासाठी तर पर्यटकांनी एक चांगला स्थापत्य शास्त्राचा नमुना पाहण्यासाठी पुण्यातील या मंदिरास एकदा तरी जरूर भेट द्यावी आणि दैवी पावित्र्याची अनुभूती घ्यावी.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.



धन्यवाद, खूपच उत्कृष्ट वर्णन. ऐतिहासिक माहिती आणि वास्तू- स्थापत्याच्या वर्णनाची सुरेख गुंफण! 🙏
खुप सुंदर लिखाण
चतुःश्रृंगी देवीच वर्णन पण सुरेख
खुप छान शब्द रचना आणि वर्णन
Fantastic information, I like this