वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥280॥ मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥281॥ तेथ आणिक कांही जाणावें । कां मागिलातें स्मरावें । हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥282॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥53॥
इंद्रियांचिया संगती । जिये पसरु होतसे मती । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥283॥ समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥284॥
अर्जुन उवाच : स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम् ॥54॥
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि ॥285॥ मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें । तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥286॥ या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें । काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥287॥ आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसां चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥288॥ तो कवणे स्थिती असे । कैसेनि रूपी विलसे । देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥289॥ तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥290॥
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणोनि तूं जाण, हे सुखदुःखासीच कारण…
अर्थ
अर्जुना ज्यावेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल, त्यावेळेला तू असा होशील. ॥280॥ मग शुद्ध आणि गंभीर असे आत्मज्ञान (तुझ्या ठिकाणी) उत्पन्न होईल आणि त्या योगाने तुझे मन सहजच निरिच्छ होईल ॥281॥ तेथे (तशी तुझी स्थिती झाल्यावर) आणखी (पुढे) काही समजून घ्यावे किंवा जे (काही ज्ञान) मागे मिळवलेले आहे, ते पुन्हा आठवावे. हे सर्व अर्जुना, केवळ जागच्या जागीच राहील. ॥282॥
(व नंतर) जेव्हा (नाना प्रकारच्या) श्रवणांनी (संशय-) ग्रस्त असलेली तुझी बुद्धी निश्चल होऊन समाधीसुखाच्या ठिकाणी स्थिर होईल, तेव्हा तुला संपूर्ण योगस्थिती प्राप्त होईल. ॥53॥
इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी फाकते, ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल ॥283॥ मग केवळ समाधीच्या सुखात (शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी) ज्यावेळेला बुद्धी स्थिर होईल त्यावेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला, असे समज. ॥284॥
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, समाधीसुख अखंड भोगणारा असा जो स्थितप्रज्ञ तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा? तो (स्थितप्रज्ञ) काय बोलतो? कसा राहतो? कसा चालतो? ॥54॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ मना आणि बुद्धीचें, ऐक्य आथी…
त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो, हे करुणासागरा, तो तू सांग. ॥285॥ मग श्रीकृष्ण म्हणाला, ‘अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार.’ ॥286॥ या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले, देवा, स्थितप्रज्ञाला (ज्याची बुद्धी स्थिर झाली त्याला) काय म्हणतात आणि त्याला ओळखावे कसे? सांग बरे! ॥287॥ आणि ज्याला स्थिरबुद्धी म्हणतात आणि जो समाधीसुखाचा निरंतर अनुभव घेतो, त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे? ॥288॥ तो कोणत्या स्थितीत असतो? कोणत्या प्रकारे वागतो? हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा, मला सांगावे. ॥289॥ तेव्हा ऐश्वर्यादि सहा गुणांचे आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण, तो काय बोलता झाला, (ते ऐका.) ॥290॥
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.