वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
श्रीभगवान उवाच : प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥55॥
म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेसी । करीत असे ॥291॥ जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु । परि विषयामाजि पतितु । जेणें संगे कीजे ॥292॥ तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषीं मन राहें । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥293॥
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥56॥
नाना दुःखी प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥294॥ अर्जुना तयाचां ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ॥295॥ ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥296॥
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनन्दंति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥57॥
जो सर्वत्रा सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा – । माजीं न म्हणे ॥297॥ ऐसी अनवच्छिन्न समता । भूतामात्रीं सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणे वेळे ॥298॥ गोमटें कांही पावे । तेणे संतोषें तेणें नाभिभवे । जो ओखटेनि नागवे । विषादासी ॥299॥ ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥300॥
यदा संहरते चायं कूर्मोऽङगानीव सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥58॥
कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥301॥ तैसीं इंद्रियें आपैतीं होतीं । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातलीं असे ॥302॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्ज रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥59॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ मना आणि बुद्धीचें, ऐक्य आथी…
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो आणि स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. ॥55॥
(श्रीकृष्ण) म्हणाला, अर्जुना ऐक, मनात जी उत्कट विषयासक्ती असते, ती आत्मसुखात अडथळा आणते. ॥291॥ जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंत:करण नेहेमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या (कामाच्या) संमतीने विषयांमध्ये पतन होते ॥292॥ तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो आणि ज्याचे मन (निरंतर) आत्मसुखात (निमग्न) राहते तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. ॥293॥
दुःखे आली असताना ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली असता जो त्याच्याविषयी निरिच्छ असतो. प्रीति, भय, क्रोध ही ज्यांची गेलेली असतात, त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावे. ॥56॥
कितीही दु:खे प्राप्त झाली तरी, ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या अभिलाषाने कधी अडकला जात नाही ॥294॥ अर्जुना, त्याच्या ठिकाणी स्वभावत:च कामक्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते. (असा) तो परिपूर्ण होय. ॥295॥ असा जो अमर्याद आहे आणि जो (देहप्रपंचादि) उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो, तो स्थिरबुद्धी होय, असे समज. ॥296॥
ज्याची कोठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली (असे समजावे.) ॥57॥
परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम, हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सर्वत्र सारखा (समबुद्धीने) वागतो ॥297॥ (ज्याच्या ठिकाणी) अशी अखंड समान आणि भूतमात्रांविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही ॥298॥ काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणार्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही आणि वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही ॥299॥ त्याप्रमाणे जो हर्षशोकरहित असतो आणि आत्मज्ञानाने संपन्न असतो, तो स्थिरबुद्धी होय असे अर्जुना जाण. ॥300॥
ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूंनी आखडून घेतो, त्याप्रमाणे (तो) जेव्हा (आपली) इंद्रिये, विषयांपासून आत ओढून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली (असे समजावे.) ॥58॥
हेही वाचा – Dnyaneshwari : काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें, वोळखों केवीं…
किंवा ज्याप्रमाणे कासव खुषीत असताना आपले अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरून घेते ॥301॥ त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात आणि ती तो जे म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. ॥302॥
आहार न घेणाऱ्या पुरुषांचे रसविषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात. पण परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर (हा रसविषय आणि) सर्व विषयांची गोडीदेखील नाहीशी होते. ॥59॥
क्रमश: