वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥45॥
तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणें निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥256॥ येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥257॥ म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण । एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥258॥ तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ॥259॥
यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके । तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥46॥
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तर्ही आपण हित आपुलें । तेंचि घेपे ॥260॥ जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज ॥261॥ कां उदकमय सकळ । जर्ही जाहलें असे महीतळ । तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें ॥262॥ तैसे ज्ञानिये जे होती । ते वेदार्थाते विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥263॥
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥47॥
म्हणौनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥264॥ आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें । जे न संडिजे तुवा आपुलें । विहित कर्म ॥265॥ परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥266॥
योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय । सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥48॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे…
अर्थ
हे अर्जुना, वेद त्रिगुणांचे प्रतिपादन करणारे आहेत. तू त्रिगुणातीत, द्वंद्वरहित, नित्य सत्वगुणसंपन्न, योगक्षेमाची काळजी न करणारा आणि आत्मनिष्ठ हो. ॥45॥
तू असे नि:संशय समज की वेद हे (सत्व, रज आणि तम या) तीन गुणांनी व्याप्त आहेत. म्हणून (त्यापैकी) उपनिषदादि जे भाग आहेत, ते केवळ सात्विक आहेत. ॥256॥ आणि अर्जुना, केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे, ते बाकीचे (वेदांचे भाग) रज आणि तम या गुणांनी युक्त आहेत. ॥257॥ म्हणून हे केवळ सुखदु:खाला कारण होणारे आहेत, असे तू लक्षात ठेव आणि त्यांच्या ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस. ॥258॥ तू तिन्ही गुण टाकून दे, मी आणि माझेपण धरू नकोस. (पण) अंत:करणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. ॥259॥
सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले, तरी आपणास जेवढी तहान असेल, तेवढेच पाणी प्यावे; त्याप्रमाणे ज्ञानी, संपूर्ण वेदाचा विचार करून त्यातील आपणास जे अपेक्षित त्याचे ग्रहण करतात ॥46॥
जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक (विधिनिषेधांचे) प्रकार सुचवले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल, तेवढेच घ्यावे. ॥260॥ ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे रस्ते दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी का जावयाचे? सांग बरे मला. ॥261॥ किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तितके पाणी जरी असले तरी, त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. ॥262॥ त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात, मग ज्यात शाश्वत आणि जे इष्ट आहे, त्याचेच ग्रहण करतात. ॥263॥
तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे. कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये. म्हणजे, कर्मफलाला हेतुभूत तुला कधी होता उपयोगी नाही; (आणि) कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस ॥47॥
म्हणून अर्जुना, ऐक. याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच यावेळी तुला उचित आहे. ॥२-२६४॥ आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला, तेव्हा हे असेच आमच्या मनाला पटले की, तू आपले विहित कर्म सोडू नयेस. ॥२-२६५॥ परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेऊ नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ती होऊ देऊ नकोस. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. ॥२-२६६॥
अर्जुना, योगयुक्त होऊन फलाचा अभिलाष टाकून, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा ठेवून तू कर्म कर. त्यालाच योग् म्हणतात. ॥48॥
क्रमश: