वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
आतां अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक । या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥303॥ श्रोत्रादि इंद्रिये आवरिती । परि रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥304॥ जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥305॥ तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवोनि आंगे फांके । तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारें ॥306॥ येरां इंद्रिया विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें । जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥307॥ मग अर्जुना स्वभावे । ऐसियाही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाईजे ॥308॥ तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती । जैं सोहंभावप्रतीति । प्रकट होय ॥309॥
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥60॥
येर्हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे राहटताती जतना । निरंतर ॥310॥ जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनाते सदा मुठी । धरूनि आहाती ॥311॥ तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥312॥ देखें विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें । मग आकळती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥313॥ तिये संधी मन जाये । मग अभ्यासां ठोठावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचे ॥314॥
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ 61 ॥
म्हणोनि आइकें पार्था । यांते निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनिया ॥315॥ तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखे अंतःकरण । झकवेना ॥316॥ जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥317॥ एर्हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांही । तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ॥318॥ जैसा कां विषाचा लेशु । घेतलिया होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥319॥ तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ 320॥
हेही वाचा – Dnyaneshwari : काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें, वोळखों केवीं…
अर्थ
अर्जुना, आता आणखी एक नवलाईची गोष्ट सांगतो, ऐक. जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात, ॥303॥ जे श्रोत्रादी इंद्रिये आवरतात, पण जिभेला आळा घालत नाहीत, त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात. ॥304॥ ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरची पालवी खुडून टाकली, पण मुळाला पाणी घातले तर, त्या झाडाचा नाश कसा होणार? ॥305॥ ते झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारते, त्याप्रमाणे रसनेंद्रियांच्या द्वाराने विषयवासना मनात पोसतात. ॥306॥ (ज्याप्रमाणे) इतर इंद्रियांचे विषय तुटतात, त्याप्रमाणे हा (जिभेचा) विषय (रस) निग्रहाने तोडता येत नाही, कारण त्यावाचून जगणेच व्हावयाचे नाही. ॥307॥ पण अर्जुना, जेव्हा (साधक) अपरोक्षानुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो, तेव्हा (त्याला) अशाही रसनेचे सहज नियमन करता येते. ॥308॥ ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो, त्यावेळी शरीराचे कामक्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात. ॥309॥
एरवी हे अर्जुना, (बुद्धी स्थिर होण्याकरिता) प्रयत्न करीत असलेल्या विवेकी पुरुषाचेही मन उच्छृंखल इंद्रिये बलाने (विषयाकडे) ओढतात. ॥60॥
एरवी अर्जुना, ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत. जे (ती इंद्रिये उच्छृंखल होऊ नयेत म्हणून) ती स्वाधीन ठेवण्याकरिता खटपट करतात ॥310॥ (जे आपल्यावर) अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचे (मनाला) कुंपण घालतात आणि जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात ॥311॥ त्या साधकांना देखील (ही इंद्रिये) अगदी कासावीस करून टाकतात. या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे. ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकवते, ॥312॥ त्याप्रमाणे पाहा, हे विषय ऋद्धिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे (साधकाच्या मनाला) ग्रासून टकतात. ॥313॥ अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन रहाते. (त्याचा अभ्यास जागच्या जागीच रहातो.) इंद्रियांचा जोर हा असा आहे. ॥314॥
त्या सर्वांचे (इंद्रियांचे) संयमन करून योगयुक्त होऊन माझ्यावरच चित्त ठेवलेले असावे. ज्याची इंद्रिये स्वाधीन आहेत, त्याची बुद्धी स्थिर झाली, (असे समजावे.) ॥61॥
म्हणून अर्जुना, ऐक. सर्व विषयांवरील आसक्ती सोडून यांचे (इंद्रियांचे) सर्वस्वी दमन करतो, ॥315॥ ज्याचे अंत:करण विषयसुखाच्या लालसेने फसले जात नाही, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे, असे तू समज. ॥316॥ तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे मला अंत:करणात कधी विसरत नाही. ॥317॥ एरवी (एखाद्याने) बाह्यत: विषयांचा त्याग केला, पण मनात जर काही विषय (वासना) असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच, असे समज. ॥318॥ ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब घेतला तरी, तो फार होतो आणि मग नि:संशय प्राणाची हानी करतो ॥319॥ त्याचप्रमाणे पाहा, या विषयांचे नुसते (सूक्ष्म संस्कार) जरी मनात राहिली तर, ती संपूर्ण विचारमात्राचा घात करतात. ॥320॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जयाचे आत्मतोषीं मन राहें, तोचि स्थितप्रज्ञु होये…
क्रमश :


