वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
अर्जुन उवाच – कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥4॥
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधीं तूंचि चित्तीं विचारीं । संग्रामु हा ॥30॥ हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥31॥ देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती । तियें पाठीं केवीं वधिजती । आपुलां हातीं ॥32॥ देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ॥33॥ तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥34॥ जयालागीं मनें विरु । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं । तया प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ॥35॥ वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसी हेंचि काय जाहलें । जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ॥36॥ मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ॥37॥ जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मने व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥38॥
गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके । हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥5॥
हेही वाचा – Dnyaneshwari : शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो…
अर्थ
अर्जुन म्हणाला, “हे मधुसूदना, भीष्मांवर आणि द्रोणांवर युद्धामध्ये उलट बाण टाकून मी कसे बरे युद्ध करू? हे शत्रूनाशका, कारण ते पूजनीय आहेत. ॥4॥
देवा, ऐक. इतके बोलण्याचे काही कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर. हे युद्ध आहे का? ॥30॥ हे युद्ध नव्हे, मोठा अपराध आहे. हा करण्यात दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदांचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. ॥31॥ पाहा, आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास संतोषवावे आणि पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा बरे करावा? ॥32॥ देवा, संतसमुदायाला वंदन करावे; अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, (पण) हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी? ॥33॥ त्याप्रमाणे आमचे भाऊबंद आणि गुरू आम्हाला सदैव पूज्य आहेत. भीष्म आणि द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे? ॥34॥ ज्यांच्याविषयी मनाने वैर आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचे नाही, त्यांचा देवा, आम्ही प्रत्यक्ष घात कसा बरे करावा? ॥35॥ यापेक्षा, आग लागो या जगण्याला! सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे? जो आम्ही (शस्त्रविद्येचा) अभ्यास केला, त्याची प्रौढी यांचा वध करून मिरवायची का? ॥36॥ मी पार्थ, द्रोणांनी तयार केलेला (त्यांचा चेला) आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी दडपलेला मी त्यांचा वध करावा काय? ॥37॥ अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी, त्यांच्यावरच मनाने उलटावे, तर, असा मी काय भस्मासुर आहे ? ॥38॥
महान योग्यतेच्या अशा गुरूजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचा देखील अंगीकार करणे श्रेयस्कर आहे. गुरूजनांचा वध केला तर, त्यांच्या रक्ताने माखलेले विषयभोग कसे भोगता येतील? ॥5॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल…