वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च। तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥27॥
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥159॥ ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥160॥ महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥161॥ तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ॥162॥ एथ आणीकही एक पार्था । तुज बहुतीं परी पाहतां । दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥163॥
अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत । अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥28॥
जें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्ते । मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया ॥164॥ तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती । देखें पूर्व स्थितीच येती । आपुलिये ॥165॥ येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें । तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं ॥166॥ ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार । का परापेक्षा अळंकार- । व्यक्ति कनकीं ॥167॥ तैसें सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटळ ॥168॥ तैसें आदीचि जें नाही । तयालागीं तूं रुदसि कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥169॥ जयाची आर्तीचि भोगित । विषयी त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ॥170॥ दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें आचरताती ॥171॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तूं धरूनि देहाभिमानातें…
अर्थ
कारण की, उत्पन्न झालेल्याला नि:संशय मृत्यू आहे आणि मेलेल्याला निःसंशय जन्म आहे. म्हणून अटळ अशा गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. ॥27॥
जे उत्पन्न होते, ते नाश पावते आणि नाश पावलेले पुन्हा दिसते. अर्जुना रहाटगाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो. ॥159॥ अथवा उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जात असतात, त्याप्रमाणे जन्ममृत्यू हे जगात चुकवता येणारे नाहीत. ॥160॥ महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून हा उत्पत्तीनाश टळत नाही ॥161॥ असे हे जर तुला पटत असेल, तर मग खेद का करीत आहेस? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोस? ॥162॥ या ठिकाणी अर्जुना, आणखी एका तर्हने विचार करता येईल. पुष्कळ बाजूंनी पाहिले तरी, तुला दु:ख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. ॥163॥
अर्जुना, हे प्राणिमात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात, मधेच तेवढे व्यक्त होतात आणि (पुन्हा) मृत्यूनंतर अव्यक्तच बनतात. तर मग शोक कसला? ॥28॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तूं धरूनि देहाभिमानातें…
कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्माल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. ॥164॥ ते जेथे नाश होऊन जातात तेथे नि:संशय वेगळे असत नाहीत. पाहा ते आपल्या मूळच्या (अव्यक्त) अवस्थेलाच येतात. ॥165॥ आता मध्यंतरी जे निराळे (व्यक्तरूप) साकार रूप दिसते, ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणे होय. त्या स्वप्नाप्रमाणेच सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. ॥166॥ अथवा उदकाला वार्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते किंवा दुसर्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो ॥167॥ त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केली आहे, असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो, ॥168॥ त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरिता तू काय रडत बसला आहेस! निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे. ॥169॥ ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ (संताच्या ठिकाणी) उत्पन्न होताच, त्या संतांना विषय सोडून जातात. जे विरक्त आहेत, ते त्या आत्म्याच्या लाभाकरिता वनवास स्वीकारतात. ॥170॥ त्याच्यावर नजर ठेऊन मोठाले मुनी ब्रह्मचर्यादिक व्रताचे आणि तपाचे आचरण करतात ॥171॥
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु…