वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
जैसी भ्रतारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥199॥ ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे । तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषीं ॥200॥
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् । संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥34॥
म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥201॥ जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केवी निगावें । एथोनियां ॥202॥ तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता । परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥203॥ हें चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणे ॥204॥ ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी बिपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥205॥
भयाद् रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः । येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥35॥
तूं आणीकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी । आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥206॥ तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां । कां प्रत्यया येईल मना । सांगें मज ॥207॥
अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः । निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततों दुःखतरं नु किम् ॥36॥
हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला । हा सांगें बोलु उरला । निका कायी ॥208॥ लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥209॥ ते तुज अनायसें । अनकळित जोडिली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥210॥ तैसी कीर्ती निःसीम । तुझां ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥211॥ दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥212॥ ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट । जया देखी जगीं सुभट । वांठ जाहली ॥213॥ ते पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥214॥ जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥215॥ जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें । तैसा अर्जुना हे तूंते । मानिती सदा ॥216॥ तें अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥217॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्जुना तुझें चित्त, जर्ही जाहलें द्रवीभूत…
अर्थ
ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्री सर्व प्रकारे अनादराला प्राप्त होते, त्याप्रमाणे स्वधर्मत्यागाने जीविताची तशी दशा होते. ॥199॥ अथवा, युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहो बाजूंनी गिधाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात. ॥200॥
आणि (सर्व) लोक तुझी सर्वकाल अपकीर्ती सांगत राहतील. आणि संभवित पुरुषाला (तर) दुष्कीर्ती मरणापेक्षाही अधिक (वाईट) आहे. ॥34॥
म्हणून तू आपला धर्म टाकशील तर, पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तर कल्पांतापर्यंतही जाणार नाही. ॥201॥ अपकीर्ती जोपर्यंत अंगाला शिवली नाही, तोपर्यंतच शहाण्याने जगावे. आता सांग बरे, येथून कसे परत फिरावे? ॥202॥ तू मत्सर टाकून आणि दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा, पण तुझी स्थिती या सर्वांना पटणार नाही. ॥203॥ म्हणून हे तुला चारी बाजूंनी घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. त्याप्रसंगी अर्जुना, कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. ॥204॥ जरी कदाचित त्या प्राणसंकटातून तुझी कशीबशी सुटका झाली, तरी (तसे) ते जगणेही मरणाहून वाईटच. ॥205॥
भयामुळे रणातून तू परत गेलास, (असे) महारथी मानू लागतील. ज्यांना तुझ्याविषयी बहुमान वाटत होता, ते तुला तुच्छ मानतील. ॥35॥
आणखीही अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करीत नाहीस. येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरिता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास ॥206॥ तर अर्जुना, तुझे ते करणे या दुष्ट वैर्यांच्या मनाला खरे वाटेल का? सांग बरे मला. ॥207॥
तुझे शत्रू तुझ्याविषयी भलभलते पुष्कळ बोलतील, (आणि) तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. यापेक्षा अधिक दुःखदायक काय आहे? ॥36॥
ते म्हणतील, ‘हा पळाला रे पळाला!’ ‘अर्जुन आम्हाला भ्याला’ असा दोष तुझ्यावर राहिला तर, ते चांगले का ? सांग. ॥208॥ लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात; पण धनुर्धरा, कीर्ती वाढवतात. ॥209॥ ती तुला अनायासे संपूर्ण लाभली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे ॥210॥ त्याप्रमाणे अनंत आणि उपमारहित अशी तुझी कीर्ती आहे. तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम (म्हणून प्रसिद्ध) आहेत. ॥211॥ देशोदेशीचे राजे भाट बनून (तुझी कीर्ती) वाखाणतात, ती ऐकून यमादिकांनाही धास्ती पडते. ॥212॥ अशी तुझी थोरवी भरीव आणि गंगेसारखी निर्मल आहे. ती पाहून जगातील मी मी म्हणणारे वीर चकित होतात. ॥213॥ तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून, या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे. ॥214॥ ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला प्रळयकाळ होतो, त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे. ॥215॥ ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे अर्जुना ते कौरव तुला मानतात. ॥216॥ जर तू न लढताच परत निघशील तर, तुझा तो मोठेपणा नाहीसा होईल आणि मग तुला हीनपणा येईल. ॥217॥
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : तुम्हां क्षत्रियां आणीक कांही, संग्रामावांचूनि नाहीं…