वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥1॥
मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥1॥ तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥2॥ जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥3॥ म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥4॥ तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु । देखौनी । शार्ङ्गधरु । काय बोले ॥5॥
श्रीभगवानुवाच : कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥2॥
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं । तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥6॥ तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें । कंरितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥7॥ तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहींच न संडिसी । तुझेनि नामें अपयशीं । दिशा लंघिजे ॥8॥ तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥9॥ तुवां संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥10॥ हें पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें । ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझें ॥11॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तैसा कुळीं कुळक्षयो होय…
अर्थ
संजय म्हणाला, “करुणेने व्याप्त झालेल्या, अश्रूपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण पुढील वाक्य बोलले.” ॥1॥
मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐका. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्या वेळी रडू लागला. ॥1॥ तो सर्व आप्तसमुदाय पाहून (त्याला) विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यायोगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर, ॥2॥ ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हालतात, त्याप्रमाणे त्याचे ह्रदय खंबीर खरे, परंतु त्या वेळी द्रवले; ॥3॥ म्हणून मोहाधीन झालेला (तो अर्जुन) चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. ॥4॥ पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे अतिमोहाने जर्जर झालेला पाहून शारंगधर (भगवान श्रीकृष्णा) काय बोलले, (ते ऐका). ॥5॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे अर्जुना, आर्यांनी करायला अयोग्य, स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालविणारा हा हीनपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून उद्भवला? ॥2॥
ते म्हणाले, हे अर्जुना, या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय? तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस, त्याचा अगोदर विचार कर. ॥6॥ सांग, तुला झाले तरी काय? काय कमी पडले? काय करायचे राहिले? हा खेद कशाकरिता? ॥7॥ (एरवी) तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस; कधीही धीर सोडीत नाहीस; तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडी पळून जावे. ॥8॥ तू शूरवृत्तीचे (शौर्याचे) ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस; तुझ्या पराक्रमाचा दबदबा तर तिन्ही लोकात आहे. ॥9॥ तू युद्धात शंकरांना जिंकलेस. निवातकवचांचा ठावठिकाणा नाहीसा केलास; गंधर्वांवरही पराक्रम गाजविलास. ॥10॥ तुझ्या मानाने पाहिले असता, हे त्रैलोक्यही लहान वाटते. पार्था, तुझा पराक्रम असा चांगला आहे. ॥11॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले…