वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥42॥
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥245॥ म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥246॥ एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाही । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥247॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥43॥
देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥248॥ क्रियाविशेषें बहुतें । न लोपितीं विधीतें । निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ॥249॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् । व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥44॥
परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥250॥ जैसा कर्पुराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे । कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥251॥ दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें ॥252॥ सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ॥253॥ जैसे रांधवणी रससोय निकी । करुनियां मोले विकी । तैसा भोगासाठी अविवेकी । धाडिती धर्मु ॥254॥ म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥255॥
हेही वाचा – Dnyaneshwari : विचारु न करीं किरिटी, आतां धनुष्य घेऊनि उठी…
अर्थ
हे अर्जुना, वेदांच्या अर्थवादात रत झालेले अविवेकी, (स्वर्गसुख आणि त्याचे साधन जे कर्म याखेरीज) दुसरे काही नाही, असे म्हणणारे पुष्पयुक्त वृक्षाप्रमाणे मनोहर जी ही दिसते, वेदवाणीच्या (वेदाची जी ही पुष्पित, रोचक वाणी तिच्या) आधाराने बोलतात. ॥42॥
ते वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफळाचा लोभ धरतात ॥245॥ ते म्हणतात, मृत्युलोकी जन्मावे, यज्ञादि कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. ॥246॥ यावाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही, असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादतात; अर्जुना पाहा. ॥247॥
विषयभोगाविषयी तत्पर आणि स्वर्गाच्या मागे लागलेले, भोग आणि ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसंबंधाने जिच्यामध्ये पुष्कळ कर्मे सांगितली आहेत, जी जन्मरूप कर्मफल देणारी (अशी वाणी बोलणारे), ॥43॥
पाहा, केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन आणि फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरितात. ॥248॥ अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने, विधीत यत्किंचितही चूक होऊ न देता आणि अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात. ॥249॥
त्या विषय आणि ऐश्वर्य यांच्या ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने ज्यांची विवेकबुद्धी झाकलेली आहे, अशा पुरुषांच्या अंतःकरणांमध्ये आत्मतत्वविषयक बुद्धी उद्भवत नाही. ॥44॥
परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात, ती हीच की, स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा त्याला विसरतात. ॥250॥ ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे ॥251॥ किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते हातून घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात. ॥252॥ मोठ्या आयासांनी पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी? पण पाहा, सद्बुद्धी ज्यास प्राप्त नाही, अशा त्या अज्ञानी लोकांस हे समजत नाही, काय करावे ? ॥253॥ ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्य़ाप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात. ॥254॥ म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामधे मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव. ॥255॥
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे…