वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥39॥ हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय यांचे ॥40॥ वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे । परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥41॥ स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥42॥ हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥43॥ हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु । आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥44॥ ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना नये आघवें । जीवितेंसीं ॥45॥ हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥46॥ ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥47॥ देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं । भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥48॥ ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती । मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं ॥49॥ ऐसें अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परि ते मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥50॥ हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥51॥
न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥6॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल…
अर्थ
देवा, समुद्र गंभीर आहे असे ऐकतो; तथापि तोही तसा वरवरच आहे, असे दिसते. परंतु द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. ॥39॥ हे आकाश अमर्याद आहे खरे, पण (एखाद्या वेळी) त्याचेही मोजमाप होईल; पण त्यांचे हृदय अत्यंत गहन आणि खोल आहे. (त्याचा ठाव लागावयाचा नाही). ॥40॥ एकवेळ अमृतही विटेल, किंवा कालवशात वज्र भंगेल; पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न जरी केला, तरी यांचे मन आपला (अविकारी) धर्म सोडणार नाही. ॥41॥ ममता आईनेच करावी असे म्हणतात, ते खरे आहे; परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही मूर्तिमंत आहे. ॥42॥ अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अमर्याद सागर आहे. ॥43॥ इतके हे मोठे आहेत; शिवाय आमच्यावर यांची कृपा आहे! अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना तरी मनात आणता येईल का? सांग. ॥44॥ अशांना युद्धात मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट अंत:करणापासून मनात सुद्धा येत नाही. ॥45॥ द्रोणाचार्यांसारख्यांस मारावे, तेव्हा आपण राज्यसुख भोगावे, अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण याहूनही अधिक श्रेष्ठ (इंद्रपदादिक) भोग मिळाले, तरी आम्हाला ते द्रोणाचार्यासारख्यांची हत्या करून नकोत. यापेक्षा भीक मागितलेली बरी. ॥46॥ अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरिकंदरांचा आश्रय करावा; पण त्यांच्यावर आता शस्त्र धरू नये. ॥47॥ देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताl बुडालेले जे भोग कवटाळावयाचे, ॥48॥ ते मिळवून तरी काय करायचे आहेत? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करावे? याकरिता तुझा हा युक्तिवाद मला पसंत नाही. ॥49॥ त्यावेळी ‘कृष्णा ऐक’ असे अर्जुन म्हणाला. परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही. ॥50॥ हे जाणून अर्जुन कचरला. मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला देव या (माझ्या) बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत ? ॥51॥
(युद्धात) आम्हाला या जय मिळेल का ते आम्हाला जिंकतील? दोहोंपैकी आम्हाला कोणते श्रेयस्कर आहे, हे समजत नाही. ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही, ते कौरव लढाईकरिता समोर उभे राहिले आहेत. ॥6॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला…