वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
येर्हवीं माझां चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा ॥52॥ पैं विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोर्लाचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥53॥ आतां ऐसेयांतें वधावें । कीं अव्हेरुनिया निघावें । या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही ॥54॥
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यत् श्रेयः स्यान्-निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥7॥
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ । जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥55॥ तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचे तेज भ्रंशे । मग पांसींच असतां न दिसे । वस्तुजात ॥56॥ देवा मज तैसें जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥57॥ तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥58॥ तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥59॥ जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु । कीं सरितांते सागरु । त्यजी केवीं ॥60॥ नातरी अपत्यातें माये । सांडुनि जरी जाये । तरी ते कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥61॥ तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी । आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥62॥ तरी उचित काय आम्हां । जे व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥63॥
न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥8॥
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ॥64॥ एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल । मानसींचा ॥65॥ जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । ती सुक्षेत्रीं जर्ही पेरिलीं । तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं ॥66॥ ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥67॥ तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धी । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥68॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला…
अर्थ
(अर्जुन म्हणतो) बाकी माझ्या मनात जे होते, ते मी येथे स्पष्ट करून बोललो; परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हासच ठाऊक. ॥52॥ पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे, ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. ॥53॥ आता अशांचा वध करावा किंवा यांना सोडून निघून जावे, या दोहोंपैकी काय करावे, ते आम्हाला समजत नाही. ॥54॥
मोहरूपी दोषाने स्वाभाविक वृत्ती नष्ट झालेला आणि धर्मसंबंधाने चित्त मोहित झालेला मी, तुला विचारीत आहे. जे खरोखरीच श्रेयस्कर असेल ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे. तुला शरण आलेल्या मला आपण उपदेश कर. ॥7॥
आम्हाला काय करणे उचित आहेत, हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही. कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकळ झाले आहे. ॥55॥ डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते. मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसेनाशी होते. ॥56॥ देवा, तसे मला झाले आहे. कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे. आता आपले हित कशात आहे, हेही मला समजत नाही. ॥57॥ तरी कृष्णा, तू (या संबंधाचा) विचार करून पहा आणि कल्याणकारक ते आम्हाला सांग. कारण आमचा सखा, (आमचे) सर्व काही तूच आहेस. ॥58॥ तू आमचा गुरू, बंधू, पिता, तू आमची इष्ट देवता, संकटसमयी नेहेमी तूच आमचे रक्षण करणारा आहेस. ॥59॥ शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरूच्या मनातही मुळी ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील? ॥60॥ किंवा कृष्णा ऐक, मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगेल? ॥61॥ त्याप्रमाणे देवा, सर्वतोपरी तूच एक आम्हाला आहेस आणि आतापर्यंतचे माझे बोलणे जर तुला पटत नसेल ॥62॥ तर जे आम्हाला उचित असून धर्माला विरुद्ध नसेल, ते पुरुषोत्तमा, चटकन आता सांग पाहू. ॥63॥
भूलोकवर निष्कंटक आणि समृद्ध असे राज्य आणि देवाचे आधिपत्यही मिळाली तरीही इंद्रियांचे शोषण करून टाकणारा माझा शोक नाहीसा करेल, असे (तुझ्या उपदेशाशिवाय दुसरे काही साधन) मला दिसत नाही. ॥8॥
हे सर्व कूळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे, तो तुझ्या उपदेशावाचून (दुसर्या) कशानेही जाणार नाही. ॥64॥ या वेळी सबंध पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी, माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. ॥65॥ ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले आणि त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी, त्यास अंकुर फुटणार नाही. ॥66॥ किंवा आयुष्य संपले असले म्हणजे औषधाने काही होत नाही, (पण) तेथे एका परमामृताचाच (ज्याप्रमाणे) उपयोग होतो ॥67॥ त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धीही उत्तेजन (देऊ शकणार) नाही. यावेळी कृपानिधे, तुझी कृपाच माझा आधार. ॥68॥
हेही वाचा – Dnyaneshwari : परी शस्त्र आतां न धरिजे…
क्रमश: