वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणे काळीं ॥186॥ जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥187॥ तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां । सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥188॥ म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांही । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥189॥ निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें । हें असो काय सांगावे । प्रत्यक्षावरी ॥190॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम् । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥32॥
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काय दैव तुमचें । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥191॥ हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥192॥ ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें । हे कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥193॥ क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें हें लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी ॥194॥ ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥195॥
अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसिं ॥33॥
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिले शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥196॥ पूर्वजांचे जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिले । रणीं इये ॥197॥ असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥198॥
हेही वाचा – Dnyaneshwari : उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे
अर्थ
तू विनाकारण शोकाकुल का होतोस? ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागावयाचा नाही, त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. ॥186॥ ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोहोचत नाही, किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही ॥ 187॥ त्याप्रमाणे पार्था, स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहजच पुर्या होतात. ॥188॥ म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धावाचून दुसरे काही उचित नाही, हे लक्षात ठेव. ॥189॥ मनात कपट न धरता, मार्याला मारा करून आवेशाने लढावे, पण हे (बोलणे) असो. प्रत्यक्षच प्रसंग आला आहे, तेव्हा आता जास्त काय सांगावे? ॥190॥
आणि पार्था, अशा प्रकारचे युद्ध (म्हणजे) सहजपणे उघडलेले स्वर्गाचे द्वारच प्राप्त झाले आहे, भाग्यशाली क्षत्रियांनाच हे प्राप्त होते. ॥32॥
अर्जुना, सांप्रतचे युद्ध पहा, हे कार्य म्हणजे जणू काय तुमचे दैवच फळले आहे. अथवा सर्व धर्माचा ठेवाच (तुमच्यापुढे) उघडा झाला आहे! ॥191॥ याला काय युद्ध म्हणावे? युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच (अवतरला) आहे. अथवा मूर्तिमंत तुझा प्रतापच हा उगवला आहे. ॥192॥ अथवा तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्याला आली आहे. ॥193॥ क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याला असे हे युद्ध करावयास मिळते. ज्याप्रमाणे वाटेने जात असता ठेच लागावी आणि काय लागले म्हणून पाहावे, तो चिंतामणी आढळावा; ॥194॥ अथवा जांभई देण्याकरता तोंड उघडले असता अकस्मात अमृत त्यात पडावे, त्याप्रमाणे हे (धर्म) युद्ध (अनायासे) आलेले आहे, असे समज. ॥195॥
असे असून हा कर्तव्यप्राप्त संग्राम तू करणार नाहीस, तर स्वधर्म आणि कीर्ति यांना मुकून पाप मात्र मिळवशील. ॥33॥
आता असा हा (संग्राम) टाकून, नाही त्याचा शोक करीत बसलास तर, आपणच आपला घात केल्यासारखे होईल. ॥196॥ आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले (पुण्य आणि यश) आपणच घालवल्यासारखे होईल. ॥197॥ इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ति जाईल, सगळे जग तुला नावे ठवील आणि महापातके तुला हुडकीत येऊन गाठतील. ॥198॥
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्जुना तुझें चित्त, जर्ही जाहलें द्रवीभूत…