वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥39॥
हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥230॥ जया बुद्धियुक्ता । जाहालिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे ॥231॥ जैसे वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसीं उरिजे । अचुंबिता ॥232॥
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥40॥
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥233॥ कर्माधारे राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥234॥ तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि । हां असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥235॥ जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥236॥ अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥237॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवस्थिताम् ॥41॥
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी । तरी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥238॥ पार्था बहुतीं परीं । हे अपेक्षिजे विचारशूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥239॥ आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥240॥ तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥241॥ तैसी ईश्वरावांचूनि कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥242॥ येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥243॥ म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥244॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें तें अर्जुना, या वैरियां दुर्जनां कां प्रत्यया येईल मना…
अर्थ
याप्रमाणे सांख्यविषयक बुद्धी तुला सांगितली. आता कर्मयोगातील बुद्धी ऐक. अर्जुना, ती प्राप्त झाली असता तू कर्मबंधनातून मुक्त होशील. ॥39॥
येथपर्यंत तुला ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला. आता निष्काम कर्ममार्ग निश्चित सांगतो, तो तू ऐक. ॥230॥ अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली, त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. ॥231॥ ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नव्हे तर, (त्या शस्त्रांचा अंगाला) स्पर्शही न होता विजयी होऊन राहाता येते ॥232॥
या निष्काम कर्मयोगात, आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. याला संकट येत नाही. या धर्माचे थोडे जरी (अनुष्ठान) झाले तरी, ते मोठ्या भयापासून रक्षण करते. ॥40॥
त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने सुरू राहिलेले दिसून येते, त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच, आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे. ॥233॥ कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेऊ नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणाणार्याला भूताची बाधा होत नाही ॥234॥ त्याप्रमाणे अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली, म्हणजे हा उपाधीत असूनही उपाधी त्याला बाधा करू शकत नाही. ॥235॥ ज्या बुद्धीत पुण्य-पापादि कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी सूक्ष्म आणि अतिनिश्चल झालेली असते, जिला रजतमादी गुणांचा विटाळ नसतो ॥236॥ अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या योगाने थोडीशी हृदयात प्रगट होईल तर, संसाराचे सर्व भय नाहीसे होईल. ॥237॥
हे अर्जुना, येथे निश्चयात्मक (ईश्वरनिष्ठ) बुद्धी एकच असते. जे अनिश्चित आहेत, त्यांना मात्र अनेक भेदांनी युक्त अशा अनंत बुद्धी असतात. ॥41॥
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी, पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही. ॥238॥ अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात. कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ॥239॥ ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात, पण परीस तसा मिळत नाही किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो. ॥240॥ त्याचप्रमाणे परमात्मा हाच जिचे अंतिम ध्येय आहे, ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रावाचून निखालस अन्य गती नाही ॥241॥ त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून अन्य आश्रयस्थान नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. पाहा. ॥242॥ याहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममाण होतात. ॥243॥ म्हणून पार्था, त्यांना स्वर्ग, संसार आणि नरक हे प्राप्त होतात. (पण) त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. ॥244॥
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : विचारु न करीं किरिटी, आतां धनुष्य घेऊनि उठी…