वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें । जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥91॥ तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥92॥ जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥93॥ तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांते शोचूं पहासी ।
हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥94॥ तरी सांग पां मज अर्जुना । तुजपासूनि स्थिती या त्रिभुवना । हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी ॥95॥ एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हें वांयाचि काय बोलती । जगामाजीं ॥96॥ हो कां सांप्रत ऐसें जहालें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिले । आणि नाशु पाविले नाशिले । तुझेनि कायी ॥97॥ तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसी घातु न करिसी चितीं । तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥98॥ कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥99॥ अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवां का शोचावें । सांगें मज ॥100॥ परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हाप्रति ॥101॥ देखें विवेकी जे होती । ते दोहींतेंही न शोचती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां ॥102॥
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥12॥
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥103॥ नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनि । हे भ्रांति वेगळी करूनी । दोन्हीं नाहीं ॥104॥ हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे । येर्हवीं तत्त्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि ॥105॥ जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें । तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ॥106॥ तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें ।
तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥107॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जो दृष्टीसवें विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी…
अर्थ
मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू मधेच आरंभिले आहेस, ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. ॥91॥ तू आपल्याला जाणता तर म्हणावितोस, पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर, तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस! ॥92॥ जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते, तसे तुझे शहाणपण दिसते. ॥93॥ तू स्वत:ला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरिता शोक करू पाहतोस, याचा आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटतो. ॥94॥ तर अर्जुना, मला सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? ही विश्वाची रचना अनादि (आहे असे म्हणतात) ते खोटे आहे काय? ॥95॥ तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, असे जे जगात बोलतात ते उगीचच काय? ॥96॥ आता असे झाले का की, हे जन्म-मृत्यू तू उत्पन्न केलेस? आणि तू मारशील तर हे मरतील होय? ॥97॥ तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग, हे काय चिरंजीव होणार आहेत? ॥98॥ किंवा तू एक मारणारा आणि बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती (कदाचित) तुझ्या चित्ताला होईल तर, ती होऊ देऊ नकोस. ॥99॥ हे सगळे (सृष्टी) आपोआप होते व जाते, असा हा क्रम अनादि कालापासून असाच अव्याहत सुरू आहे. तर मग तू शोक का करावास? सांग मला. ॥100॥ पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही. मनात आणू नये ते तू आणतोस आणि (उलट) तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस! ॥101॥ हे पाहा जन्म आणि मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंचाही (दोहोंबद्दलही) शोक करत नाहीत. ॥102॥
खरोखर, मी, तू आणि हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही. तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही, असेही नाही. ॥12॥
अर्जुना, सांगतो ऐक. पाहा, येथे आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे (जे आहोत) ॥103॥ ते हल्ली आहो, असेच निरंतर राहू अथवा खात्रीने नाश पावू, एवढी भ्रांती दूर झाली की, वस्तुत: (या) दोन्ही (गोष्टी) खर्या नाहीत. ॥104॥ (भ्रांतीला वश झाल्यामुळे) जन्म आणि मृत्यू हे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू (आत्मा) जी आहे, ती अविनाशीच आहे. ॥105॥ जसे वार्याने पाणी हलवले, त्यामुळे त्याला तरंगांचे रूप आले; तर या ठिकाणी कोणाला आणि कुठे जन्म आला, असे म्हणता येईल? ॥106॥ पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर आता कशाचा नाश झाला? विचार कर. ॥107॥
क्रमश:
(साभार – शं वा तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : … जयापरी पार्थु । भ्रांति सांडी