वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
संजय उवाच : एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः । न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं वभूव ह ॥9॥
ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ॥81॥ आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें येथें । भरंवसेनि ॥82॥ ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन करूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥83॥
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत । सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥10॥
मग आपुला चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांही नेणे । काय कीजे ॥84॥ हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकारी । जैसा ग्रहाते पंचाक्षरी । अनुमानी कां ॥85॥ ना तरी असाध्य देखोनि व्याधी । अमृतासम दिव्य औषधी । वैद्य सूचि निरवधि । निदानींची ॥86॥ तैसे विवरितु असे श्रीअनंतु । तया दोन्हीं सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांति सांडी ॥87॥ तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसे मातेचां कोपीं थोकलें । स्नेह आथी ॥88॥ कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी । ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥89॥ तैसे वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥90॥
श्रीभगवानुवाच : अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचंति पंडितः ॥11॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता…
अर्थ
संजय म्हणाला, “राजा धृतराष्ट्रा, अर्जुन श्रीकृष्णाला याप्रमाणे बोलून आणि ‘मी युद्ध करणार नाही’ असे श्रीकृष्णाला स्पष्ट सांगून स्तब्ध राहिला. ॥9॥
याप्रमाणे संजयाने (धृतराष्ट्राला) सांगितले. तो (मग) म्हणाला, राजा, अर्जुन पुन्हा शोकाकूल होऊन काय म्हणाला ते ऐक. ॥81॥ तो खिन्न होऊन श्रीकृष्णांना म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी यावेळी निश्चित लढणार नाही. ॥82॥ असे एकच वेळी बोलला. मग स्तब्ध होऊन राहिला. त्याप्रसंगी त्याला (तसा) पाहून श्रीकृष्णांना विस्मय वाटला. ॥83॥
हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला (अर्जुनाला) श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखे करून (आणि मग रागाचा अविर्भाव आणून) पुढीलप्रमाणे बोलू लागले. ॥10॥
मग आपल्या मनात म्हणाला, याप्रसंगी याने हे काय आरंभिले आहे? या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, काय करावे? ॥84॥ हा आता कशाने उमजेल? कशाने धीर धरील? ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्चाचा (ते कोणते आहे आणि ते कसे दूर करता येईल याचा) विचार करतो; ॥85॥ किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य, निर्वाणीच्या अमृततुल्य, दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो ॥86॥ त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील, याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते. ॥87॥ तो (श्रीकृष्णांनी) हेतू मनात धरला; मग (ते) रागाने बोलावयास लागले. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते, ॥88॥ किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते. ॥89॥ त्याप्रमाणे वरवर पाहता उदास (कठोर), पण आत अति सुरस (परिणामी अत्यंत हितकर) असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले ॥90॥
भगवान कृष्ण म्हणाले, शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टीबद्दल तू शोक केलास (म्हणजे करतोस) आणि पांडित्याच्या गोष्टी सांगत आहेस. पण विवेकी लोक मेलेल्यांबद्दल किंवा न मेलेल्यांबद्दल शोक करत नाहीत. ॥11॥
क्रमश:
(साभार – शं वा तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : जो दृष्टीसवें विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी…