वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥218॥ मग ते वेळी हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुंजावें । हें जिंतलें तरी भोगावें । पृथ्वीतल ॥219॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥37॥
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥220॥ म्हणोनि ये गोठी । विचारु न करीं किरिटी । आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजें वेगीं ॥221॥ देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥222॥ सांगे प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे । परी विपायें चालो नेणिजे । तरी तेंही घडे ॥223॥ अमृतें तरीचि मरिजे । जरी विखेंसी सेविजे । तैसा स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणे ॥224॥ म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडोनि सर्वथा । क्षात्रवृत्ती झुंजतां । पाप नाही ॥225॥
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥38॥
सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥226॥ एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल । हें आधींचि कांहीं पुढील । चिंतावेना ॥227॥ आपणयां उचिता । स्वधर्मातेंचि रहाटतां । जे पावें तें निवांता । साहोनि जावें ॥228॥ ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणोनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥229॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तुम्हां क्षत्रियां आणीक कांही, संग्रामावांचूनि नाहीं…
अर्थ
तू (जरी) पळून जाऊ लागलास तरी हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत, तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील. ॥218॥ मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये? यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. ॥219॥
मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील; अथवा जय मिळविलास, तर पृथ्वी भोगशील. म्हणून हे अर्जुना दृढनिश्चय करून युद्धाला उभा राहा. ॥37॥
अथवा, समरांगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख (तुला) त्रासावाचून प्राप्त होईल. ॥220॥ एवढ्याकरिता अर्जुना, या गोष्टीचा विचार करीत बसू नकोस. आता हे धनुष्य घेऊन ऊठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर. ॥221॥ पाहा, या स्वधर्माचे आचारण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. (मग हे युद्ध केल्याने) पातक लागेल, ही भ्रांती या ठिकाणी तुझ्या चित्तात कशी आली? ॥222॥ अर्जुना सांग, नावेने कोणी बुडेल का? किंवा (चांगल्या) वाटेने जाताना ठेच लागेल का? पण कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल. ॥223॥ दूधच पण जर विषासह सेवन केले तर, त्याने मरण येईल. त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. ॥224॥ म्हणून पार्था, सर्व प्रकारे फलाशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर, म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही. ॥225॥
सुखदुःख, लाभ-हानी, यशापयश ही सारखी मानून नंतर युद्धाला तयार हो. (मनाने) असे झाले असता तुला पाप लागणार नाही. ॥38॥
सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दु:खाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये. ॥226॥ या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल, या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतीत बसू नये. ॥227॥ आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण, तेच करीत असताना, जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. ॥228॥ अशी मनाची तयारी होईल, तर मग सहजच पाप घडणार नाही. म्हणून तू आता खुशाल लढावे ॥229॥
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें तें अर्जुना, या वैरियां दुर्जनां कां प्रत्यया येईल मना…