वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥40॥
तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणोनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥266॥ ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥267॥
तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥41॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें । आधी निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव ॥268॥
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥42॥
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा ॥269॥
एवं बुद्धे: परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥43॥
हें अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मीवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥270॥ तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥271॥ जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठीं । कवणे काळीं ॥272॥ ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥273॥ आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥274॥ तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥275॥ ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोग बापा ॥276॥
॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः ॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरांचे वाघ…
अर्थ
इंद्रिये, मन आणि बुद्धी ही यांची आश्रयस्थाने आहेत, असे म्हणतात. हा यांच्या (इंद्रियादिकांच्या) योगाने ज्ञान आच्छादित करून प्राण्याला मोह पाडतो. ॥40॥
अशा रीतीने जे जे उपाय योजावेत, ते ते सर्व या कामक्रोधांनाच सहाय्य करतात; म्हणून या जगात हेच हठयोग्यांना जिंकतात. ॥266॥ असे हे कामक्रोध जिंकण्याला कठीण म्हटले, तरी पण त्यास जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे; तो जर तुझ्याकडून होईल तर (पाहा) तुला सांगतो. ॥267॥
हे भरतश्रेष्ठ अर्जुना ! म्हणून तू अगोदर इंद्रियांचे नियमन करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापरूपी कामाचा त्याग (नाश) कर. ॥41॥
तर यांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिये आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते; तेव्हा अगोदर त्या इंद्रियांनाच पूर्णपणे ठेचून टाक (नियंत्रण कर). ॥268॥
इंद्रिये श्रेष्ठ आहेत, असे म्हणतात; इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे; मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा तो (परमात्मा) श्रेष्ठ आहे. ॥42॥
मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल. ॥269॥
अशा प्रकारे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या (जोरदार असलेल्या) परमेश्वराला जाणून, बुद्धीने मनाचे संयमन करून ज्याचे ठाणे जिंकण्यास कठीण अशा कामरूपी शत्रूचा नाश कर. ॥43॥
हे कामक्रोध अंत:करणातून पार गेले की, ते नि:संशय नाहीसे झाले, असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ राहात नाही ॥270॥ तसे कामक्रोध जर नि:शेष गेले तर, ब्रह्मप्राप्तीरूप स्वराज्य मिळाले, असे समज. मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो. ॥271॥ गुरुशिष्याच्या संवादात येणार्या विचाराने प्राप्त झालेली जीवपरमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस. ॥272॥ सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती आणि देवांचा देव जो श्रीकृष्ण, तो म्हणाला, ‘हे राजा धृतराष्ट्रा ऐक; (असे संजय म्हणाला.) ॥273॥ आता पुन्हा तो श्रीकृष्ण (आणखी) एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करील, ॥274॥ त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे (शांतादी) रस या योगाने श्रवणसुखाची रेलचेल होईल. ॥275॥ निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो, या कृष्णार्जुनांचा संवादाचा आनंद घ्या. ॥276॥
|| अध्याय तिसरा समाप्त ||
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तैसें ज्ञान तरी शुद्ध, परी इहीं असे प्ररुद्ध…


