वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । कैवल्य पर तत्वतां । पातले जगीं ॥151॥
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥20॥
देखें पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥152॥ याकारणे पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥153॥ जे आचरतां आपणपेयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेंचि ॥154॥ देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥155॥ मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥156॥ हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय वोजे । तिहीं कवणेपरी जाणिजें । मार्गांतें या ॥157॥
यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥21॥
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥158॥ हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावे । विशेषें आचरावें । लागे संतीं ॥159॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जे संपत्तिजात आघवें, हें हवनद्रव्य मानावें …
अर्थ
अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात, ते या जगतामध्ये तत्वत: श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. ॥151॥
कारण, कर्माच्याच योगाने जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली. लोकसंग्रहाकडे लक्ष देऊन देखील कर्म करणे तुला योग्य आहे. ॥20॥
पाहा, कर्ममात्राचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले. ॥152॥ अर्जुना, यास्तव कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरूर आहे. ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडेल. ॥153॥ कारण आपण आचरण केले असता या लोकांसाठी तो कित्ता होईल; आणि अर्थात सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. ॥154॥ पाहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळावले आणि म्हणून जे निरिच्छ झाले, त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरिता कर्म करणे प्राप्त आहे. ॥155॥ रस्त्याने अंधाच्या बरोबर पुढे चालणारा डोळस, अंधास सांभाळून घेऊन, त्याच्या बरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. ॥156॥ अरे, असे जर (ज्ञानी पुरुषाने) न केले तर, अज्ञानी लोकांना काय कळणार आहे ? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकाराने समजेल? ॥157॥
श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्याचेच इतर जन अनुकरण करतात. तो जी गोष्ट प्रमाण मानतो, त्याचेच लोक अनुकरण करतात. ॥21॥
या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात; आणि इतर सर्वसामान्य लोक त्याचेच आचरण करतात. ॥158॥ अशी स्थिती असल्यामुळे (ज्ञानी पुरुषाने) कर्म सोडणे बरोबर नाही. (इतकेच काय परंतू) संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. ॥159॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणोनि ऐकें पांडवा, हा स्वधर्मु कवणे न संडावा…


