वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
जें देहचि आपणपें मानिति । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥127॥ हे यज्ञोपकरण सकळ । नेणतसांते बरळ । अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥128॥ इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥129॥ जे संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥130॥ हें सांडोनिया मूर्ख । आपणपेंयांलागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥131॥ जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियां ॥132॥ हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जे जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥133॥
अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः । यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥14॥
अन्नास्तव भूतें । प्ररोह पावति समस्तें । मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥134॥ तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥135॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं । तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥15॥
मग वेदांते परापर । प्रसवतसे अक्षर । म्हणऊनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥136॥ परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुती । ऐकें सुभद्रापती । अखंड गा ॥137॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवती ॥16॥
ऐशी हे आदि हे परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागौनियां ॥138॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तुम्हीं देवतांतें भजाल, देव तुम्हां तुष्टतील…
अर्थ
आपण देहच आहोत, असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत, असे समजतात आणि ज्यास या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते ॥127॥ ते बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे, असे न समजता, त्या सर्व संपत्तीचा केवळ स्वत:साठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात; ॥128॥ इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात, ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने वस्तुत: पापच सेवन करतात, असे समज. ॥129॥ वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे, ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे, असे समजावे. मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी. ॥130॥ अशा रीतीने वागावयाचे टाकून, पाहा, ते मूर्ख लोक आपल्या स्वत:करिता नाना प्रकारची पक्वान्ने तयार करतात. ॥131॥ ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही. म्हणून ॥132॥ ते अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज; कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. ॥133॥
अन्नापासून भूते उत्पन्न होतात, पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञापासून पर्जन्य होतो आणि कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती आहे. ॥14॥
ही सर्व भूते अन्नापासून वाढतात आणि या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो. ॥134॥ तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. ॥135॥
कर्म हे वेदांपासून उद्भव पावले, असे जाण आणि परमात्मा वेदाचे कारण आहे. म्हणून सर्वव्यापी (सर्व विषयांचे प्रकाशन करणारा) वेद यज्ञामध्ये नित्य स्थिर आहे. (म्हणजे वेदाने चित्तशुद्धीकरिता यज्ञ म्हणजे विहित कर्म करावे, असे सांगितले आहे.) ॥15॥
दूर आणि जवळ असणारे जे ब्रह्म, ते वेदांना उत्पन्न करते, म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे. ॥136॥ अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे निरंतर राहाणे आहे. ॥137॥
हे अर्जुना, या प्रमाणे सुरु केलेल्या चक्राला अनुसरून जो इहलोकी वागत नाही आणि इंद्रियांमध्ये रममाण होतो, त्याचे आयुष्य पापमय होय. तो व्यर्थ जगतो. ॥16॥
अर्जुना, याप्रमाणे ही मुळातली परंपरा तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली. ॥138॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : …म्हणोनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेचि विनियोगिजे


