वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥67॥
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्याऽऽरभतेऽर्जुन । कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥7॥
जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥68॥ तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥69॥ तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥70॥ तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसें जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥71॥ तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥72॥ तैसा सामन्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥73॥ ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥74॥ अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूंते ॥75॥ तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी । मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥76॥
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः । शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेदकर्मणः ॥8॥
म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां ॥77॥ म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥78॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जया नैष्कर्म्यपदीं आस्था, तया उचित कर्म सर्वथा…
अर्थ
अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे. ॥67॥
(पण) हे अर्जुना, मनाने इंद्रियांचे नियमन करून, जो आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो (म्हणजे कर्मेंद्रिये कर्मात राबवतो) त्याची योग्यता विशेष होय. ॥7॥
जो अंतर्यामी निश्चळ आणि परमात्म्याच्या स्वरूपात गढलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो, ॥68॥ तो इंद्रियांना हुकूम करत नाही आणि विषय बांधतील, अशी त्यास भीती नसते. तो अधिकारपरत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म, त्याचा अनादर करत नाही. ॥69॥ कर्मेंद्रिये कर्मे करीत असली तरी, त्यांना तो पुरुष आवरीत नाही; पण त्यामुळे उत्पन्न होणार्या विकारांनी तो लिप्त होत नाही. ॥70॥ ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही आणि अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलीन होत नाही. ॥71॥ त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये रहातो. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही (प्रतिबिंबामुळे) पाण्याच्या संगतीत रहाताना दिसते, ॥72॥ त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर, त्याच्या स्थितीविषयी काहीच कल्पना करता येत नाही ॥73॥ अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल, तोच आशापाशरहित आणि मुक्त आहे, असे तू ओळख. ॥74॥ अर्जुना, जगामधे ज्याचे विशेष वर्णन केले जाते, असा तोच योगी होय. याकरिताच तू असा हो, म्हणून मी तुला म्हणतो. ॥75॥ तू मनाला आवरून धर आणि अंत:करणात स्थिर हो; मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत. ॥76॥
विहित असे जे कर्म आहेत ते तू करीत जा. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले. कर्म न करण्याने तुझी देहयात्राही सिद्धीला जाणार नाही. ॥8॥
कर्म टाकून देऊ, असे म्हणशील तर, विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत (होणे) देहधार्यास संभवत नाही. (असे जर आहे तर मग) शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे, याचा तू विचार कर. ॥77॥ म्हणून जे जे करणीय आणि प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे, ते तू फलाशा सोडून करीत जा. ॥78॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : कर्म पराधीनपणे, निपजतसे प्रकृतिगुणें…
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana,