वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥79॥ देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥80॥
यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । तदर्थ कर्म कौन्तेय मुक्तसङ्ग समाचर ॥9॥
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥81॥ हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मी रति घडे । तैंचि बंधु पडे । संसारिकु ॥82॥ म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्ञयाजन । जो करी तया बंधन । कहींच नाहीं ॥83॥ हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला । तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणोनियां ॥84॥ आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा । जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥85॥
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥10॥
तैं नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें । परी नेणतीचि तियें यज्ञातें । सूक्ष्म म्हणउनी ॥86॥ ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां । तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥87॥ तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ॥88॥ तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केंही न वचावे । तीर्थासी गा ॥89॥ योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥90॥ देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥91॥ अहेतुकें चित्तें । अनुष्ठां पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥92॥ तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्य तुम्हां एकु । ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥93॥ देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजाहो न संडील । तुमतें सदा ॥94॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कर्म पराधीनपणे, निपजतसे प्रकृतिगुणें…
अर्थ
अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक कौतुक आहे, ते तुला ठाऊक नाही. ते हे की, असे (अहंकाररहित आणि निष्काम बुद्धीने केलेले विहित. नित्य वा नैमित्तिक) कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते. ॥79॥ पाहा वर्णाश्रमधर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो, त्यास त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते. ॥80॥
स्वधर्मप्रीत्यर्थ कर्मावाचून दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते. त्याकरिता हे अर्जुना, (कर्मफलाविषयी) अनासक्त होऊन कर्म कर. ॥9॥
अरे बाबा, आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय, असे समज. म्हणून त्याचे आचरण करत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही. ॥81॥ स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणार्या पुरुषास संसारबंध प्राप्त होतो. ॥82॥ म्हणून स्वधर्माचे आचरण करणे, हेच नित्य यज्ञयाजन करण्यासारखे होय. जो असे स्वधर्माचरण करतो, तो केव्हाच बंधनात पडत नाही. ॥83॥ हे (कर्माधिकारी) लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले, म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या स्वाधीन झाले. ॥84॥ अर्जुना, याच संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो. ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली ॥85॥
पूर्वी ब्रम्हदेव यज्ञासहवर्तमान प्रजा उत्पन्न करून (त्या प्रजेला) म्हणाला की, या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या. हा तुमच्या इष्ट कामना पूर्ण करील. ॥10॥
तेव्हा नित्य यज्ञा- (कर्मा) सहित (कर्मासहित) सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले, परंतु यज्ञ (कर्म) सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्यकर्मांना मुळीच जाणत नव्हते. ॥86॥ त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली की, देवा, या लोकात आम्हाला आधार काय? तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, – ॥87॥ तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्ही सांगितला आहे. याचे आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. ॥88॥ (याखेरीज) तुम्हाला आणखी व्रते आणि नियम करण्याची जरुरी नाही, शारीराला पीडा देण्याची जरुरी नाही आणि दूर कोठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही. ॥89॥ योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधना अथवा मंत्रतंत्र इत्यादिकांचे अनुष्ठान कदाचित कराल तर, करू नका. ॥90॥ स्वधर्मे सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही. हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही. तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरणरूप यज्ञ करावा. ॥91॥ ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठतेने भजते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. ॥92॥ अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे, असे सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला. ॥93॥ पाहा स्वधर्माचे आचरण जर कराल, तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल. मग लोकहो, ही (स्वधर्मरूपी) कामधेनू तुम्हाला नेहेमी (केव्हाही) सोडणार नाही. ॥94॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्जुना तोचि योगी, विशेषिजे जो जगीं…