वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशीं ॥113॥ तैशीं त्रिभुवनींचीं दुःखें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥114॥ ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदतां । परी कल्पांतींही सर्वथा । प्राणिगण हो ॥115॥ म्हणऊनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रियें बरळों नेदावीं । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥116॥ जैसें जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे । हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥117॥ म्हणोनि तुम्ही समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावें पुढपुढती । म्हणिपत असे ॥118॥
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषैः । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥13॥
देखा विहित क्रियविधी । निर्हेतुका बुद्धी । जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ॥119॥ गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं । निमितादिकीं यजी । पितरोद्देश ॥120॥ या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेंशीं हवन करितां । हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥121॥ तें सुखे आपुलां घरीं । कुटुंबेसीं भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥122॥ तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधीं । जयापरी महारोगीं । अमृतसिद्धी ॥123॥ कां तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥124॥ म्हणोनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥125॥ हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे ॥126॥
हेही वाचा – Dnyaneshwari : …स्वधर्मानुष्ठान, ते अखंड यज्ञयाजन
अर्थ
रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाच्चे स्मशान वेढून टाकतात, त्याप्रमाणे मग त्याला (आपल्या धर्माचे आचरण टाकणाऱ्याला) सर्व पापे घेरतात. ॥113॥ त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दु::खे आणि अनेक प्रकारची पापे तसेच सर्व दैन्ये त्याच्याजवळ राहातात. ॥114॥ त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते आणि मग प्रजाहो, (कितीही) आक्रोश केला तरी कल्पाच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून मुळीच सुटका होत नाही ॥115॥ म्हणून स्वधर्माचरण सोडू नये; इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये; असा ब्रह्मदेवाने प्रजांना उपदेश केला. ॥116॥ ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की, त्याच क्षणी मरण येते, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने या स्वधर्माला सोडू नये. ॥117॥ म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे हेच वारंवार सांगणे आहे, ॥118॥
यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात. जे (यज्ञ न करता केवळ) स्वत:साठी पाकसिद्धी करतात, ते पापी लोक पाप भक्षण करतात. ॥13॥
पाहा निर्हेतूक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो; ॥119॥ गुरु, गोत्र आणि अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरिता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो; ॥120॥ या विहित कर्माचरणारूप यज्ञाने यज्ञपुरुषाचे ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील; ॥121॥ त्याचे त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो, ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते. ॥122॥ ते यज्ञातील अवशेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता महारोग (रोग्याला) सोडून जातात, त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात. ॥123॥ अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरूष आत्मभ्रांतीला यत्किंचितही वश होत नाही, त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. ॥124॥ म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे आणि मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. ॥125॥ अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसर्या तऱ्हेने वागू नये. अशी ही सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णांनी सांगितली. ॥126॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तुम्हीं देवतांतें भजाल, देव तुम्हां तुष्टतील…


