वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥53॥ देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥54॥ सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥55॥ ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मति । की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥56॥ हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले । हें असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥57॥ हें न ठकेचि जरी कांही । तरी सांडिले तें कायी । म्हणोनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमंतां ॥58॥ कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें । येरीं धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥59॥ देखें रथीं आरूढिजे । मग निश्चळा बैसिजे । तरी चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥60॥ कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥61॥ तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें । निष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥62॥ म्हणऊनि संगु जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरें ॥63॥
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥6॥
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥64॥ तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे । वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥65॥ ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । ओळखावे तत्त्वता । येथ भ्रांति नाहीं ॥66॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ये लोकीं दोन्ही निष्ठा, मजचिपासूनि प्रगटा…
अर्थ
जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत, मी कर्म टाकीन अथवा करीन, हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की, जेवढे म्हणून कर्म घडणे आहे, ते स्वभावत: गुणांच्या स्वाधीन आहे. ॥53॥ पाहा जेवढे म्हणून विहित कर्म आहे, तेवढे हट्टाने जरी करावयचे सोडून दिले तरी, इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय? ॥54॥ सांग, कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे काय? अथवा डोळ्यातील पाहाण्याचे सामर्थ्य गेले आहे काय? या नाकपुड्या बुजून वास घेईनाशा झाल्या आहेत काय? ॥55॥ अथवा प्राण आणि अपान, या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत काय? किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे काय? किंवा भूक, तहान इत्यादींची पीडा होण्याचे थांबले आहे काय? ॥56॥ जागृति आणि स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत काय? अथवा पाय चालायचे विसरले आहेत काय? हे सर्व असू दे! जन्म आणि मरण संपले आहे काय? ॥57॥ हे जर काही राहात नाही तर, मग त्याग तो काय केला? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणारांना कर्मत्याग (केव्हाही) घडत नाही. ॥58॥ कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होत असते. म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन, असा अंत:करणात अभिमान बाळगणे, हे व्यर्थ आहे. ॥59॥ पाहा, रथावर स्वार होऊन मग जरी स्वस्थ बसले तरी, तेथे बसणारा रथाच्या अधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालींमुळे त्यास प्रवास घडतो. ॥61॥ अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वत: हालचाल न करता वायूवेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत असते, ॥61॥ त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियांच्या द्वारा, नेहेमी कर्मे करीत असतो. ॥62॥ म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे, तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही; असे असूनही ‘त्याग करू’ असे जे कोणी म्हणतील तर, त्यांचा हट्ट मात्र उरणार आहे. ॥63॥
जो कर्मेंद्रिये नुसती आवरून मनात विषयांचे चिंतन करीत राहतो, तो अत्यंत मूढबुद्धी होय. त्याला दांभिक असे म्हणतात. ॥6॥
जे पुरुष आपल्या वाट्याला आलेले कर्म टाकतात आणि त्या योगे कर्मातीत अवस्थेला पोहोचू पाहातात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा विरोध करूनच! ॥64॥ त्यास कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांच्या अंत:करणात कर्तव्यबुद्धी असते; असे असूनही ते बाह्यात्कारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात, ते खरोखरच दैन्य आहे, असे समज. ॥65॥ अर्जुना, असे ते लोक खरोखरच विषयासक्त आहेत, असे नि:संशय समज. ॥66॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जया नैष्कर्म्यपदीं आस्था, तया उचित कर्म सर्वथा…