वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥139॥ तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ॥ जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥140॥ तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटळ । अकाळींचें ॥141॥ कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥142॥ म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥143॥ हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आले । मग उचित कां आपुलें । वोसंडावें ॥144॥ परिस पां सव्यसाची । मूर्ती लाहोनि देहाचि । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥145॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥17॥
देखें असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥146॥ जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला । म्हणोनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥147॥
नैव तस्य कृतेनार्थो माकृतेनेह कश्चन । न चास्य सर्वभूतेषु कंश्चिदर्थंव्यपाश्रयः ॥18॥
तृप्ती झालिया जैसीं । साधने सरती आपैसीं । देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्मे नाही ॥148॥ जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना । तंवचि यया साधना । भजावें लागे ॥149॥
तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर । असक्तो ह्याचरन् कर्म पमाप्नोति पुरुषः ॥19॥
म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥150॥
हेही वाचा – Dnyaneshwari : …म्हणोनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेचि विनियोगिजे
अर्थ
म्हणून जो उन्मत्त पुरुष, या लोकांमध्ये उचित अशा स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही ॥139॥ जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो, तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे, असे समज. ॥140॥ जसे भलत्याच वेळेला आलेली मेघांची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे अर्जुना, त्याचा जन्म आणि कर्म निष्फळ आहे; ॥141॥ किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे, असे समज. ॥142॥ म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया-वाचा-मने करून या एकाचेच आचरण करावे. ॥143॥ अरे, शरीर जरी प्राप्त झाले आहे, तरी ते पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे. असे आहे तर मग, आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाकावे? ॥144॥ अर्जुना ऐक, मनुष्यशरीर मिळाले असता जे कर्मांचा कंटाळा करतात, ते अडाणी आहेत. ॥145॥
पण जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रत असतो आणि आत्म्याच्या योगाने तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याला (काही) कार्य राहात नाही. ॥17॥
पाहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात गढलेला आसतो, तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. ॥146॥ कारण की पाहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो. म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. ॥147॥
इहलोकी त्याला कर्म केल्याने अथवा न केल्याने काही लाभ नाही. त्याला कोणत्याही प्राण्यापासून काही लाभ साधवयाचा नसतो. ॥18॥
पाहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट (सहजच) संपते. ॥148॥ अर्जुना, जोपर्यंत अंत:करणात ते ज्ञान उत्पन्न होत नाही, तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. ॥149॥
म्हणून सर्वदा अनासक्त होऊन कर्तव्य असे कर्म करीत राहा. कारण, अनासक्त होऊन कर्म आचरण करणारा पुरुष मोक्षपद मिळवितो. ॥19॥
म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर उचित जो स्वधर्म त्याप्रमाणे वाग. ॥150॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जे संपत्तिजात आघवें, हें हवनद्रव्य मानावें …


