Tuesday, March 17, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥30॥ आतां अठरा पर्वी भारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ॥31॥ म्हणोनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मी वायां । गर्व कां करूं ॥32॥ अहो गूळासाखरे मालेयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥33॥ एक जाणोनियां बोलती । एक ठायेंठावो जाणविती । एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं ॥34॥ हे ऐसे अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्य नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभू ॥35॥ कां एकाचि काठि तपिन्नली । एकीं सृष्टीवरी सृष्टी केली । एकीं पाषाण वाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें ॥36॥ एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं समुद्रा चुळीं भरिलें । तैसें मज नेणतयाकरवीं बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं ॥37॥ परि हें असो एथ ऐसें । रामरावण झुंजिन्नले कैसे । रामरावण जैसे । मीनले समरीं ॥38॥ तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें । या निवाडा तत्त्वज्ञु जाणें । जया गीतार्थु हातीं ॥39॥ एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले । आतां उत्तरखंड उपाइलें । ग्रंथाचें ऐका ॥40॥ जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ॥41॥

हेही वाचा – Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

अर्थ

आता असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढ म्हणून मतलब प्राप्त होतो, तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतामध्ये सापडतो. ॥30॥ आता भारताच्या अठरा पर्वांमध्ये जो काही अभिप्राय आहे, तो कृष्णार्जुनांच्या संवादामध्ये (गीतेत) प्राप्त होतो, आणि गीतेच्या सातशे श्लोकांमध्ये जो अभिप्राय आहे, तो एकट्या नवव्या अध्यायात आहे. ॥31॥ म्हणून नवव्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला, असे दाखविणारा लेखनसीमेचा शिक्का, त्यावर एकदम द्यावयास भ्यालेला जो मी, तो, नवव्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला, असा व्यर्थ अभिमान कशाकरिता धरू? ॥32॥ अहो, गूळ साखार आणि राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत, परंतु त्यामध्ये गोडीचे स्वाद जसे निरनिराळे आहेत, ॥33॥ (त्याप्रमाणे अठरा अध्याय हे एकाच गीतेचे आहेत आणि त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे, पण त्याच्या परिणामांकडे पाहिले तर, ते निरनिराळे आहेत. ते असे की,) काही अध्याय, अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाला जाणून त्याचे वर्णन करतात, काही अध्याय त्या त्या ठिकाणीच ‘तू ब्रह्म आहेस’ अशी जाणीव करून देतात आणि काही अध्याय जाणावयास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो. (ब्रह्मरूप होतो.) ॥34॥ असे हे गीतेचे अध्याय आहेत. परंतु नववा अध्याय शब्दाने सांगण्याच्या पलीकडचा आहे. तो देखील मी स्पष्ट करून सांगितला. महाराज, ही सर्व आपली शक्ती आहे. ॥35॥ एकाच्या (वसिष्ठ ऋषींच्या) काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला, एकाने (विश्वामित्रांनी) या जगाहून वेगळे जगच निर्माण केले. एकाने (नल वानराने) दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले. ॥36॥ एकाने (मारुतीने) आकाशात असलेल्या सूर्यास पकडले, एकाने (अगस्तीने) एका घोटातच समुद्र प्राशन केला. त्याप्रमाणे मी जो अजाण, त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेला नवव्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलविला. ॥37॥ परंतु हे असो. येथे असे आहे की, राम आणि रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगावयाचे असेल तर, जसे राम-रावण हे एकमेकास युद्धात भिडले तसे (असे सांगावे लागेल), ॥38॥ त्याप्रमाणे नवव्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला जो उपदेश, तो नवव्या अध्यायासारखाच आहे, असे माझे म्हणणे आहे. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे, त्या तत्ववेत्त्याला पटेल. ॥39॥ त्याप्रमाणे पहिल्या नऊही अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले. आता गीताग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे, तो ऐका. ॥40॥ या अध्यायात आता अर्जुनाला विशेष आणि सामान्य विभूती सांगितल्या जातील. ती कथा चातुर्याने आणि रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. ॥41॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!