वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
ते आनंदचित्रींचे लेप । नातरी महासुखाचें रूप । कीं संतोषतरूचें रोप । थांवलें जैसें ॥256॥ तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥257॥ हो कां जे शारदियेचिये वोले । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥258॥ तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृती बिहे । कृतांतु गा ॥259॥ वृद्धाप्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ॥260॥ वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवीं बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपम ॥261॥ कनकद्रुमाचां पालवीं । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥262॥ दांतही आन होती । परि अपाडें सानेजती । जैसीं दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥263॥ माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अणुमानिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचिया ॥264॥ करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें । पाखाळीं होती डोळे । काय सांगों ॥265॥ निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें । मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥266॥ तैशी पातिचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे । आधिलीचि परी होये । गगना कळिती ॥267॥ आइकें देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें । जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥268॥ मग समुद्रापैलाडी देखे । स्वर्गीचा आलोचु आइके । मनोगत वोळखे । मुंगियेचें ।।269॥ पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे । येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ॥270॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मग सप्तधातूंचां सागरीं, ताहानेली घोट भरी…
अर्थ
ते (योग्याचे शरीर) आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रोप आहे. ॥256॥ तो (योगी) सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजुकपणाचा भरास आलेला मळाच; ॥257॥ किंवा शरदऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय! ॥258॥ ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भितो. ॥259॥ म्हातारपण मागे फिरते, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था येते. ॥260॥ वय तर त्याचे एवढेसे, तथापि जेवढी कृत्ये बलवान पुरुष करू शकतो, तेवढी हा करतो, आणि त्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही ॥261॥ सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य कळी यावी, तशी चांगली नवी नखे येतात. ॥262॥ दातही नवे येतात. पण ते फार लहान असतात आणि ते असे दिसतात की, जणू काय दुतर्फा हिर्यांची रांगच बसली आहे. ॥263॥ ज्याप्रमाणे माणिकाचे अणू एवढाले कण असावेत, त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर रोमांचाची टोके वर येतात. ॥264॥ तळहात आणि तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात आणि डोळे किती स्वच्छ होतात, हे काय सांगू! ॥265॥ परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपेच्या गर्भात मावत नाहीत, म्हणून जसा शिंपेच्या दोन शकलांचा सांधा उकलतो ॥266॥ त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यांत न मावता, त्या पात्यांना व्यापून बाहेर निघण्यास पहाते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते. ॥267॥ अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो, परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो. कारण की, त्याच्यात पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश नसतात. ॥268॥ मग तो समुद्राच्या पलीकडचे पहातो, स्वर्गातील विचार ऐकतो, आणि मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. ॥269॥ वायुरूप घोड्यावर बसतो आणि पाण्यावर चालला तरी, पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्यास प्रसंगानुरूप प्राप्त होतात. ॥270॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसी आभाळाची बुंथी, करूनि राहे गभस्ती…


