वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
आइकें प्राणाचा हात धरूनि । गगनाची पाउटी करूनी । मध्यमेचेनि दादरेहूनि । हृदया आली ॥271॥ ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥272॥ जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची कंरडी । जे प्राणाची उघडी । जन्मभूमि ॥273॥ हें असो ते कुंडलि । हृदयाआंतु आली । तंव अनाहताचां बोलीं । चावळे ते ॥274॥ शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु ॥275॥ घोषाचां कुंडी । नादचित्रांची रूपडीं । प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥276॥ हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परी आतां कल्पितें कैचें आणिजे । परी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥277॥ विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणऊनि घुम ॥278॥ तया अनाहताचेनि मेघें । मग आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । फिटलें सहजें ॥279॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसी आभाळाची बुंथी, करूनि राहे गभस्ती…
अर्थ
अर्जुना ऐक. प्राणवायूचा हात धरून, आकाशाची पायरी करून, सुषुम्नारूप जिन्याने जी हृदयात आली. ॥271॥ जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे आणि जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला सावली केली आहे (आश्रय दिला आहे), ॥272॥ जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्म शिवाची संबळी आणि जी प्राणाची उघड उघड जन्मभूमी आहे ॥273॥ हे असो. ती कुंडलिनी हृदयात (अनाहत चक्रात) येते, तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते. ॥274॥ कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञान (तिच्याबरोबर) आले होते, त्या ज्ञानाने तो (अनाहत) शब्द किंचित ऐकला. ॥275॥ घोषाच्या (परा वाणीच्या) कुंडात नाद (मध्यमारूपी) चित्रांची रूपडी ॐकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात. ॥276॥ याची कल्पना करता येईल तर, समजून घेता येईल. पण आता कल्पना करणारे (मन) कोठून आणावे? तर त्या ठिकाणी काय वाजते, ते कळत नाही. ॥277॥ अर्जुना, पण ते तसे नव्हे. विसरून सांगण्याचेच राहिले, ते काय म्हणशील, तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही, तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो, असे समज. ॥278॥ मग त्या अनाहतरूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप उघडते. ॥279॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आइकें देह होय सोनियाचें, परि लाघव ये वायूचें…


